

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
▪️बहुजन समाज पार्टीतर्फे जयंती समारोह
म्हसवड/सातारा(दि.28जून):- राजर्षी शाहू, महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा सांभाळत असताना अनेक मुद्दे लक्षात येतात,jत्यांच्या विचारातून अनेकांना जीवनाची दिशा मिळाली आणि यामुळेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज बहुजनांचे पालक तर सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ वाटतात, असे प्रतिपादन बसपाचे समन्वयक, महाराष्ट्राचे प्रभारी माजी खासदार राजाराम जी यांनी केले. ‘बसप’तर्फे राजर्षी शाहू जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. येथील आयर्विन मल्टिपर्पज हॉलमध्ये मुख्य सोहळा झाला. त्यात ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘हक्क, अधिकार, मान यांची भाषा करताना आपली भूक बाजूला ठेवावी लागते, तरच समाज परिवर्तन होते. राजर्षी शाहूंच्याबद्दल बोलण्यासाठी वेळ कमी पडेल. या महापुरुषांच्या संघर्षातून एकनिष्ठ महाराष्ट्र घडला आहे.
त्यांच्या विचाराचा वारसा आपण जपून आपले कर्तव्य पार पाडू. आज त्यांच्या नगरीमध्ये आल्यावर आपण धन्य झालो.’
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॅड. सुनील डोंगरे म्हणाले, ‘राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक लोकशाहीचा इतिहास जागृत ठेवला आहे. लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते.’ राजर्षी शाहू महोत्सवात सुप्रसिद्ध गायिका निशा भगत आणि विशाल यांच्या भीम गीतांच्या कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. दयानंद मेटकर यांच्या चमूच्या वतीने फुले शाहू-आंबेडकर यांच्या जीवनपटावर सादरीकरण केले. तर माजी मुख्यमंत्री मायावती यांच्यासारखी वेशभूषा धारण करीत नागपूरच्या कलाकारांकडून केलेले सादरीकरण आणि पोवाडे-मर्दानी खेळांनी सर्वांचे लक्ष वेधले.
या जयंती समारोहासाठी किरण अल्हाट, हुलगेश चलवादी, अॅड. संजीव सदाफुले, मुकुंद सोनवणे, संदीप शिंदे, अमर शिंदे, अजय कुरणे, रवींद्र कांबळे, मारुती कसबे, श्रीकांत कांबळे, सुरेश आठवले, चंद्रशेखर कापशीकर, श्याम पाखरे, जिल्ह्यातील व विविध जिल्ह्यामधून बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



