

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.2जुलै):- जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 30 पेक्षा जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांचा तसेच एकल विशेषत: (Single Speciality) असलेल्या 10 खाटांच्या रुग्णालयांचा एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना यांच्या पॅनलवर समावेश करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल आणि जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होईल.
*पात्र एकल विशेषता 10 खाटांचे रुग्णालय :* 1) नाक, कान, घसा 2) नेत्रविकार 3) अस्थिव्यंग आणि पॉलिट्रॉमा 4) भाजणे 5) बालरोग शस्त्रक्रिया 6) कर्करोग उपचार युनिट्स 7) नवजात आणि बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन युनिट्स 8) हिमोडायलिसिस मूत्रपिंडशास्त्र युनिट्स
*पॅनलवर समावेश प्रक्रिया :* 30 पेक्षा जास्त खाटा असलेली रुग्णालये आणि एकल विशेषता असलेली 10 खाटांची रुग्णालये, जी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य हमी सोसायटी निकषांची पूर्तता करतील, अशी रुग्णालये आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनांच्या पॅनलवर समावेशासाठी पात्र ठरतील. यामध्ये आधुनिक वैद्यकीय उपकरणे, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि उच्च दर्जाची रुग्णसेवा यांचा समावेश आहे.
*लाभ :* पॅनलवरील रुग्णालयांमध्ये या दोन्ही योजनांतर्गत लाभार्थ्यांना मोफत उपचार मिळतील. यामुळे गंभीर आजारांवरील उपचार परवडणारे होतील आणि रुग्णांवर पडणारा आर्थिक भार कमी होईल.
*अर्ज प्रक्रिया :* रुग्णालयांनी पॅनलवर समावेशासाठी https://www.jeevandayee.gov.in (MJPJAY) या संकेतस्थळांवर ऑनलाइन अर्ज करावा. तसेच, चंद्रपूर जिल्हा रुग्णालय जिल्हा समन्वयक किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क साधावा.
*जिल्हा प्रशासनाचे आवाहन :* जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना मोफत व उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा देण्यासाठी पात्र खाजगी रुग्णालयांनी आयुष्मान भारत व म. फुले जनआरोग्य योजनांच्या शासकीय पॅनलकरीता प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नागरिकांना जवळील पॅनलवरील रुग्णालयांची माहिती https://www.jeevandayee.gov.in या संकेत स्तळावर उपलब्ध आहे.
*संपर्क :* अधिक माहितीसाठी किंवा पॅनलवर समावेशासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 9136158619 वर संपर्क साधावा किंवा https://www.jeevandayee.gov.in वर भेट द्यावी, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.



