धार्मिक चळवळीची दिशा निश्चित असली पाहिजे !

115

भारतीय बौद्ध महासभा हि मातृसंस्था डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली. संस्था स्थापन करताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संस्थेची ध्येय आणि उद्दिष्टे ठरवून घेतली या ध्येय आणि उद्दिष्टांना पुर्ण करण्यासाठी त्यांनी पुढील आयुष्य अर्पण करण्याचा दृढ संकल्प केला. प्रबुद्ध भारत निर्माण करणे हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या धार्मिक चळवळीची दिशा निश्चित असेल तरच प्रबुद्ध भारत निर्माण होऊ शकतो.

    डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या दृढ संकल्पाला आज ६९ वर्षे पुर्ण झाली आहेत. समाज प्रबुद्ध झाला का ? धम्म प्रचारक प्रबुद्ध झाला का ? या प्रश्नांचा आम्ही कधी विचार केला आहे का ? या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. कारण आम्ही बौध्दाचार्यांच्या धम्म ज्ञानाची कधीही चिकित्सा केली नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की धम्म प्रचारक विद्वान असला पाहिजे. ती विद्वत्ता तपासून पाहाण्याचा प्रयत्न भारतीय बौद्ध महासभा झोन क्रमांक ५ च्या वतीने २०२२ साली कार्यशाळेचे आयोजन करून केली होती. झोन अंतर्गत असणाऱ्या केवळ ७० टक्के बौध्दाचार्यांनी सहभाग नोंदवला होता. ३० टक्के बौध्दाचार्यांनी सहभाग घेतला नाही. ७० टक्के बौध्दाचार्यांच्या पैकी केवळ ५० टक्के बौध्दाचार्य बेसिक धम्म सांगू शकले हा धम्म प्रचारकांचा बौध्दीक अहवाल आहे. असे वास्तव असेल तर प्रबुद्ध भारत निर्माण होणार होईल का ? 

   भारतीय बौद्ध महासभेच्या बौध्दाचार्य प्रशिक्षण शिबीरात सहभागी होऊन बौध्दाचार्य झालेले उच्च शिक्षित, डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, वकील, पोलिस, उद्योजक आज ते कुठे आहेत ? याची चाचपणी आम्ही कधीही केली नाही. मागील दोन वर्षांपूर्वी मी स्वतः एक लेख लिहिला होता *”समाजातील उच्च शिक्षित वर्ग धार्मिक चळवळीत येत नाही”* याची कारणे मी स्पष्ट केली होती. ती म्हणजे समाजातील तरूणांनचे प्रश्न आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक आहेत या प्रश्नांना घेऊन आद डॉ भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्वांचे चर्चा सत्र आयोजित करून त्यांना धार्मिक चळवळीत कसे घेऊन येता येईल याची साधक बाधक चर्चा होणे आवश्यक आहे. परंतु तसे आजपर्यंत घडले नाही.  

   भारतीय बौद्ध महासभेतील तळागाळातील धम्म प्रचारक आणि समता सैनिक दलाचा सैनिक यांच्या सुचना, समस्या, तक्रारी विषयी आपण गंभीर पणे कधी विचारच केला नाही.

   आद भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी एक खंत व्यक्त केली ती म्हणजे आम्ही आर्थिक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या सक्षम नाही त्यामुळे महाबोधी विहाराचा प्रश्न सोडविण्यासाठी अडचणी येत आहेत. 

   आम्हाला चळवळ सक्षम करण्यासाठी अर्थकारणावर प्रथम लक्ष केंद्रित करावे लागेल. भारतभर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे संघटनात्मक काम सुरू आहे. अर्थकारण उभे करणे आणि ते मजबूत करणे अवघड नाही. भारतीय बौद्ध महासभेची बॅंक स्थापन करून आद डॉ भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांना बॅंकचे चेअरमन करून आर्थिक क्षेत्रात आपण यशस्वी होऊ शकतो हे आपण नाकारू शकत नाही. कारण बौध्दाचार्यांचा आणि समाजाचा थेट संपर्क आहे. आणि आद डॉ भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेब हे समाजातील प्रत्येक पक्ष संघटना संस्था यांच्या मध्ये लोकप्रिय व्यक्तीमत्व आहे. 

   प्रस्थापित समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे कारण त्यांच्या हक्काच्या आर्थिक संस्था आहेत. ते कधीही विस्थापितांची मदत घेत नाहीत तर उलट विस्थापितांना त्यांच्या ओळचंडीला जावे लागते. हे चित्र बदलण्यासाठी आपण अर्थकारण सक्षम करणे आवश्यक आहे.

   धार्मिक चळवळीत बौद्ध भिक्खूंची कमतरता आहे. ती कमतरता भरून काढण्यासाठी संस्थेतील उत्कृष्ट प्रवचनकारांना दहा दिवस श्रामणेर प्रवज्जा देऊन समाजामध्ये चारिका करण्यासाठी पाठविण्याचा ठराव मंजूर करण्यात यावा जेणेकरून समाजात बौद्ध भिक्खू विषयी आस्था निर्माण होईल. धम्माच्या जागृती तून स्वयं स्फुर्तीने बौद्ध भिक्खू निर्माण होतील. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्म वाणीमुळे राजा महाराजा, शुद्र, अतिशुद्र, डाकू बौद्ध भिक्खू झाले हा धम्म प्रचाराचा प्रभावी मार्ग आहे. 

    बौध्दाचार्यांचा बौध्दीक स्तर उंचावण्यासाठी सातत्याने सेमिनारीचे आयोजन करणे आवश्यक आहे. समता सैनिक दलातील सैनिकांच्या अनेक समस्या आहेत त्या समस्यांना मनमोकळेपणाने समजून घेण्यासाठी येणाऱ्या काळात *”समता सैनिक दल- संवाद परिषद”* आयोजित करण्याचा संकल्प आहे. 

   संस्थेचे प्रभावी कामकाज तेंव्हाच होईल जेव्हा संस्थेचे चारही विभाग मुक्त पणे आणि टिमवर्क ठेवून काम करतील. धार्मिक कार्यात दबाव आणि हस्तक्षेप असेल तर मुक्त पणे काम ही होऊ शकत नाही आणि टिमवर्क हि होऊ शकत नाही हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

✒️शब्दांकन:-मंगेश अडसुळे(मुबंई)मो:-9833613374

▪️संकलन:-सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100