

▪️चक्रवर्ती सम्राट अशोक आदर्श बुद्धविहार स्पर्धेचे मूल्यांकन संपन्न
✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.9जुलै):- चक्रवर्ती सम्राट अशोकांनी आपल्या राजवटीत ८४ हजार स्तूपांची निर्मिती केली.या स्तूपांतून समता,बंधुता,प्रेम साऱ्या जगभर प्रसारित करण्याचे कार्य त्याकाळी झाले.आजही अनेक बुद्धविहारांतून सामाजिक समतेचा संदेश दिल्या जातो.बुद्धविहारे ही भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिप्रेत असणारी धम्म चळवळीची केंद्रे व्हावीत,या विहारांमधून सामाजिक चळवळीचे कार्य सातत्याने होत रहावे या उद्देश्याने चिमूर तालुक्यातील बुद्धविहारांकरिता चक्रवर्ती सम्राट अशोक आदर्श बुद्धविहार स्पर्धेचे आयोजन वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान या संस्थेकडून करण्यात आले.या स्पर्धेकरिता बुद्धविहार समित्यांकडून अर्ज मागविण्यात आले. तालुक्यातील ७० बुद्धविहारांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला.
संस्थेने या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या बुद्धविहारांना प्रत्यक्ष भेट देत बुद्धविहार समिती सदस्यांसोबत संवाद साधत बुद्धविहारांचे मूल्यांकन केले.बुद्धविहार समितीच्या पदाधिकाऱ्यांना बुद्धविहारात विविध उपक्रम राबविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. बुद्धविहारात वाचनालय असावे,तिथे ग्रंथवाचन व्हावे,बुद्ध वंदना रोज व्हावी,विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका निर्माण कराव्यात,बुद्ध विहारात विचारांचं आदानप्रदान व्हावं त्यासाठी सर्वांनी एकत्र यावं या बाबी बुद्ध विहारात प्रामुख्याने राबवण्यासंदर्भात वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. भूपेश पाटील यांनी मूल्यांकनप्रसंगी बुद्ध विहार समिती सदस्यांना आवाहन केले.
स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त विहाराला १० हजार रुपये रोख,१० हजार रुपयांचा एक संगणक आणि ५ हजार रुपयांची पुस्तके भेट देण्यात येणार असून विशेष उल्लेखनीय बाब असणाऱ्या बुद्धविहारांना विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. सहभागी सर्व बुद्ध विहारांना बावीस प्रतिज्ञाचे सन्मानचिन्ह आणि भारताचे संविधान हा ग्रंथ भेट देण्यात येणार आहे अशी माहिती वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे सचिव सुरेश डांगे,सदस्य हरी मेश्राम,रामदास कामडी,विरेंद्र बन्सोड,सुधाकर गणवीर,प्रियानंद गेडाम,नितीन पाटील यांनी दिली आहे.



