युवापिढी ऑनलाइन जुगारच्या विळख्यात       

106

सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे आणि या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल ही जीवनावश्यक गरज बनली आहे. आजची तरुण पिढी मोबाईलच्या इतकी आहारी गेली आहे की या तरुणांना मोबाईलचे व्यसनच जडले आहे. आज प्रत्येक तरुणाकडे स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये इंटरनेटवर चालणारे अनेक प्रकारचे गेम असतात. या गेमने तरुणांना अक्षरशः वेड लावले आहे. कॅण्डी क्रश, ब्ल्यू व्हेल, अँग्री बर्ड, पोकोमेन, पब्जी असे ऑनलाइन गेम इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. ऑनलाइन रमी गेम हा देखील त्यापैकीच एक गेम. या ऑनलाइन रमी गेमच्या विळख्यात तरुणाई अडकली आहे. ऑनलाइन रमी गेम खेळण्याचे वेड तरुण पिढीला आर्थिक नुकसान करणारे ठरत आहे. मोबाईलवर खेळला जाणारा हा गेम म्हणजे एकप्रकारचा जुगाराच आहे. हातात असलेल्या मोबाईलवर ऑनलाइन रमी खेळण्याचे अनेक एप्लिकेशन उपलब्ध आहेत. घरी, शेतात, नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी अनेकजण एकत्र येऊन ऑनलाइन रमी खेळताना दिसत आहे.

ऑनलाइन रमी हा एकप्रकारचा जुगार असून या जुगारात तरुण पिढी पुरती अडकली असून त्यांना त्यातून बाहेर काढण्याऐवजी चित्रपट तारे आणि क्रिकेट खेळणारे खेळाडू या ऑनलाइन रमी गेमची टीव्हीवर जाहिरात करून तरुण पिढीला जुगारच्या गर्तेत ढकलत आहे. चित्रपट तारे असोत की क्रिकेटपटू हे तरुणांचे आयडॉल असतात. त्यांच्या सर्व गोष्टींचे तरुण मुले अनुकरण करत असतात म्हणूनच ऑनलाइन रमी चालवणाऱ्या कंपन्या या सिलिब्रेटींना करोडो रुपये देऊन आपली जाहिरात करायला लावतात मात्र या सिलिब्रेटींनी आपण पैशासाठी तरुण पिढीला कोणत्या मार्गावर नेत आहोत याचा विचार करावा. केवळ पैसे कमावणे हा सिलिब्रेटींचा उद्देश नसावा सामाजिक दायित्व देखील तितकेच महत्वाचे आहे. चित्रपट तारे आणि क्रिकेटर यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून ऑनलाइन रमीच्या जाहिराती बंद कराव्यात. ऑनलाइन जुगारच्या विळख्यात अडकल्याने तरुणांना मोठ्या आर्थिक नुकसानिस सामोरे जावे लागत आहे. ऑनलाइन रमी गेमच्या नादाला लागून अनेकजण कंगाल झाले आहेत.

ऑनलाइन रमी गेममुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत. ऑनलाइन रमी गेमच्या विळख्यात अडकल्याने अनेक कुटुंबे बेघर झाले आहेत. ऑनलाइन रमी खेळून अनेक तरुण कर्जबाजारी झाली आहेत. ही कर्जे फेडण्यासाठी पालकांनी आपली घरे व शेती विकली आहे. सहज पैसे कमवण्याचे आमिष दाखवून लोकांच्या घामाची कमाई लुटली जात आहे. ऑनलाइन रमी खेळताना पैसे हरल्याने तरुणांमध्ये नैराश्य येत आहे. यातून काही तरुणांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. या गेममुळे हिंसाचार देखील वाढला आहे. दक्षिणेकडच्या राज्यांनी ऑनलाइन गेमवर बंदी घातली आहे. कर्नाटक सरकारने तसा कायदाच केला आहे. केरळ, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यातही ऑनलाइन रमीवर बंदी आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात मात्र अजूनही ऑनलाइन रमीवर बंदी नाही. गेल्या वर्षी झालेल्या पावसाळी अधिवेशनात देखील हा प्रश्न चर्चेत आला होता मात्र न्यायालयाने ऑनलाइन रमीवर बंदी घालण्यास नकार दिल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. न्यायालयाने जरी ऑनलाइन रमीवर बंदी घालण्यास नकार दिला असला तरी महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढून तसा कायदा करावा. सरकारकडे प्रचंड बहुमत आहे शिवाय विरोधी पक्ष देखील या अध्यादेशाला पाठिंबाच देतील त्यामुळे अध्यादेश काढून ऑनलाइन रमीवर बंदी घालण्याचा कायदा महाराष्ट्र सरकारला करता येऊ शकतो. राज्यातील तरुणांना ऑनलाइन रमी या जुगारातून वाचवायचे असेल आणि तरुणांना ऑनलाइन जुगाराच्या विळख्यातून सोडवायचे असेल तर महाराष्ट्र सरकारने ऑनलाइन रमीवर बंदी घालणारा कायदा करायलाच हवा.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५