

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.12जुलै):- आपल्या पाल्याच्या प्रगतीचा आढावा घेण्याचा अधिकार प्रत्येक पालकांना आहे. विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्यात समन्वय राहण्यासाठी पालकसभा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्या अनुषंगाने आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये परीक्षा झाल्यावर एका आठवड्यात पालक सभा आयोजित करण्यात येणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रकल्प सनियंत्रण कक्षाची सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत जिल्ह्यातील शैक्षणिक सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नूतन सावंत, शिक्षणाधिकारी अश्विनी केळकर, राजेश पाताळे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विनित मत्ते, अधिव्याख्याता वैशाली येगलोपवार, उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख, गटशिक्षणाधिकारी व सर्व विषय सहायक उपस्थित होते.
पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्यात समन्वय रहावा व पालकांना आपल्या पाल्याची प्रगती व अडथळे यांची माहिती व्हावी, यासाठी संपूर्ण जिल्ह्यात परीक्षा झाल्यावर एका आठवड्यात पालकसभांचे आयोजन करावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. शाळेत घेण्यात येणाऱ्या चाचण्यांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेले गुण पालकसभेत पेपर दाखवून देण्यात येणार आहे. या पालकसभा 31 ऑगस्ट व 31 नोव्हेंबर 2025 तसेच 31 जानेवारी व 31 एप्रिल 2026 ला घेण्यात येणार आहे.
पालक सभा वर्ग स्तरावर आयोजित करण्यात येईल. प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी आपल्या तालुक्यात होणाऱ्या पालकसभांचे नियोजन करतील. संपूर्ण जिल्ह्यातील पालकसभेत सुसूत्रता राहावी, यासाठी जिल्हा स्तरावर सूचनापत्रक निर्गमित करण्यात येईल. पालक सभेचे आयोजन प्रभावी पद्धतीने होत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी जिल्हा, तालुका व केंद्र स्तरावरील प्रशासकीय यंत्रणेच्या भेटीचे नियोजन करण्यात येईल, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.



