रोटरी क्लब राजुरा आयोजित ‘बाल चेतना’ तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर यशस्वीपणे संपन्न

49

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.19जुलै):- रोटरी क्लब राजुरा व आर्ट ऑफ लिविंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बाल चेतना’ या तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिनांक १६ जुलै ते १८ जुलै २०२५ या कालावधीत गोपिकाबाई सांगडा पाटील आश्रम शाळा, राजुरा येथे करण्यात आले. या शिबिराचे मार्गदर्शन आर्ट ऑफ लिविंगच्या प्रशिक्षिका सौ. नीताताई राऊत यांनी केले.

या शिबिरामध्ये शाळेतील सुमारे २०० विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. विद्यार्थिनींना अभ्यासाचे नियोजन, दिनचर्या, योगाचा जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम, प्राणायामाचे महत्त्व, तसेच विविध कला-कौशल्यांची ओळख अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान मुलींनी आनंदाने, हसतमुखाने सहभाग घेत ज्ञानग्रहण केले. शिबिराच्या शेवटी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर समाधान आणि उत्साह स्पष्टपणे दिसून येत होता.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. छायाताई मोहितकर मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. बारसागडे मॅडम व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मोलाचे योगदान लाभले.

शिबिराच्या सांगता सोहळ्यात रोटरी क्लब राजुराच्या वतीने प्रशिक्षिका सौ. नीताताई राऊत यांचा शाल, श्रीफळ देऊन क्लबचे सचिव श्री. राजू गोखरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. छायाताई मोहितकर मॅडम यांचा क्लबचे अध्यक्ष श्री. निखिल चांडक व माजी अध्यक्ष श्री. कमल बजाज यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या प्रसंगी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष श्री. सारंग गिरसावळे, श्री. कमल बजाज, सदस्य श्री. किरण ढुमणे, श्री. मयूरजी बोनगीरवार, सहसचिव श्री. विनोदजी चणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव श्री. राजू गोखरे यांनी केले. समारोप तुळशी गीताने करण्यात आला.