

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.21जुलै):- ॲड. यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी, राजुरा द्वारा संचलित ॲड.यादवराव धोटे महाविद्यालयात आज दिनांक 21 जुलै 2025 रोजी स्व.ॲड यादवराव धोटे उर्फ बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष व राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ॲड. संजय धोटे होते. यासह प्रमुख पाहूणे म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष सतीश धोटे, महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या स्मिता जोगी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी बाबूजींच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देत त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मंचावर संस्थेचे सचिव डॉ. अर्पित धोटे, अनुराधा धोटे, संध्या धोटे, अमेय धोटे, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मीनाक्षी कालेश्वरवार, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा पोडे, तसेच पर्यवेक्षक प्रा.इर्शाद शेख यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर बाबूजींच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
मान्यवरांच्या हस्ते रोपट्यांचे रोपण करताना, जणू त्यांच्या विचारांची मुळे नव्या पिढीत रोवली जात आहेत, अशी प्रत्येकाच्या मनात भावना दाटून आली.
या वृक्षारोपणाच्या माध्यमातून बाबूजींच्या हरितदृष्टीची, निसर्गप्रेमाची आणि भविष्यासाठीच्या चिंतनशीलतेची एक जिवंत आठवण उभी राहिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वर्षा पोडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रणिता पानसे यांनी अत्यंत सुरेख पद्धतीने पार पाडले, तर प्रा. आसावरी धोटे यांनी आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व कर्मचारी वर्ग यांनी परिश्रमपूर्वक सहभाग घेतला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.



