

(श्रावणांत सणांची रेलचेल)
श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला ‘श्रावण’ असे नाव मिळाले आहे. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेतला श्रावण महिना हा जुलैच्या उत्तरार्धात पौर्णिमेपासून सुरू होतो आणि ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात पुढील पौर्णिमेच्या दिवशी संपतो. तमिळ कॅलेंडरमध्ये तो ‘अवनी’ म्हणून ओळखला जातो आणि तो सौर वर्षाचा पाचवा महिना असतो. चंद्र धार्मिक कॅलेंडरमध्ये श्रावण हा अमावस्येपासून सुरू होतो आणि तो वर्षाचा पाचवा महिना असतो. श्राबोन हा सौर बंगाली कॅलेंडरचा चौथा महिना आहे, तसेच नेपाळी कॅलेंडरचा चौथा महिना असतो. श्रावण हा वर्षा ऋतुचा (पावसाळ्याचा) दुसरा महिना असतो.
साधारणतः 8 किंवा 11 आणि क्वचित 19 वर्षांनी अधिक श्रावेतो. त्या महिन्यात येणाऱ्या शुक्ल किंवा वद्य या दोन्ही एकादश्यांना कमला एकादशी हे नाव आहे. उत्तर हिंदुस्थानात या एकादश्यांना अनुक्रमे पद्मिनी आणि परम एकादशी म्हणतात. एकादश्या वगळल्या तर अधिक श्रावणात कोणतेही हिंदू सण किंवा व्रताचे दिवस येत नाहीत. ज्यावर्षी अधिक श्रावण असतो त्यावर्षी पाच महिन्यांचा चातुर्मास असतो. चातुर्मासात लग्ने होत नसल्याने ती अधिक श्रावणातही होत नाहीत. श्रावण महिन्याला सर्व सणांचा राजा म्हटले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू आणि जैनधर्मीयांची परंपरा आहे. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. संपूर्ण भारतीय उपखंडासाठी श्रावण महिना खूप महत्त्वाचा आहे कारण तो नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडलेला आहे. श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागांची पूजा करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत प्रचलित आहे.
तसेच रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा हा सण हिंदू महिन्यांपैकी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी समुद्रकिनारी राहणारे लोक वरुणदेवते प्रित्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी मासेमारी करणारे महाराष्ट्रातले कोळी व समुद्राशी निगडित असलेल्या व्यवसायांतील इतर लोक समुद्राची पूजा करून त्यास नारळ अर्पण करतात. पावसाळ्यात बंद असलेले मासे पकडणे या दिवसापासून परत सुरू होते. ज्या कुटुंबात रोजच्या खाण्यात नारळ नसतो, त्याही मराठी घरांमधून या दिवशी नारळीभात, नारळाच्या वड्या यांसारखे नारळापासून बनलेले खाद्य पदार्थ बनवतात. याच दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते त्यावरून या पौर्णिमेला राखी पौर्णिमा असे म्हणतात. ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते, कारण या दिवशी सुताची पोवती करून ती विष्णू, शिव, सूर्य इत्यादी देवतांना अर्पण करतात व मग कुटुंबातील स्त्री-पुरुष ती पोवती हातात बांधतात.
या दिवशी श्रवण नक्षत्र असल्याने ब्राह्मण पुरुष उपाकर्म करून नवीन यज्ञोपवीत धारण करतात. या विधीला श्रावणी असे नाव आहे. श्रावणी ही श्रावण पौर्णिमेलाच करतात असे नाही, श्रावणी हस्त नक्षत्रात चंद्र असताना ‘श्रावण शुक्ल पंचमी’लाही असू शकते. पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्यास श्रावण पौर्णिमेला श्रावणी नक्कीच करत नाहीत. ऋग्वेद्यांची श्रावणी, यजुर्वेद्यांची श्रावणी, तैत्तिरीय शाखा व तिच्या अंतर्गत येणाऱ्या हिरण्यकेशी उपशाखेच्या ब्राह्मणांची श्रावणी या वेगवेगळ्या दिवशी असू शकतात. श्रावण महिन्यात लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असेल, तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा असते. राखी पौर्णिमेच्या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्याच्या चंपावत जिह्यातल्या देईपुरी इलाख्यात बरही देवीला खुश करण्यासाठी गावातल्या दोन गटांत एकमेकांवर दगडफेक होते. दगडफेकीत अनेकजण घायाळ होतात. 2019 साली 120 लोक जखमी झाले होते. मात्र हायकोर्टाने दगडफेकीवर बंदी आणल्याने काही लोकांनी दगडांऐवजी सफरचंदे फेकून मारली.
उत्तर भारतात या महिन्यात झुलन यात्रा, रक्षाबंधन, जन्माष्टमी व नंदोत्सव हे उत्सव विशेष महत्त्वाचे मानतात. झुलन जत्रा हा दोलोत्सव आहे. पौर्णिमेच्या दिवशी राधा व कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसवून झोके देतात व स्त्रिया त्यांच्यासंबंधी गीते गातात. हा उत्सव एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत चालतो. कृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव करतात. नंदाला पुत्र झाला असे समजून या दिवशी हळदी-कुंकू मिसळलेले पाणी पिचकारीने उडवतात. श्रावण मास सुरू झाला आहे आणि या महिन्याचा पहिला सोमवार निमित्त ‘श्रावण सोमवार’ च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !
✒️प्रविण बागडे(नागपूर)मो:-9923620919



