

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.25जुलै):-येथील श्री संत जनाबाई महाविद्यालयात मंगळवार रोजी प्रतिवर्षीप्रमाणे संत जनाबाई पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत जनाबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.आत्माराम टेंगसे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकरराव गुट्टे,संत जनाबाई शिक्षण संस्थेचे सचिव ॲड.संतोष मुंडे,अनिल यानपल्लेवार व्यासपीठावर उपस्थित होते.
आज घडीला संत साहित्यामध्ये संत जनाबाईचे साहित्य उपेक्षित असून संत जनाबाईचे साहित्य समाजापर्यंत पोहोचण्यासाठी विद्यापीठामध्ये संत जनाबाई अध्यासन केंद्र सुरू होणे गरजेचे आहे.समाजाच्या उन्नतीसाठी, स्त्रियांना समाजामध्ये स्थान मिळण्यासाठी जनाईच्या चरित्रांचा अभ्यास युवकाने करणे गरजेचे आहे त्यासाठी एक स्वतंत्र अभ्यासक्रम सुद्धा तयार होणे गरजेचे आहे असे विचार डॉ.जी.डी.बापूलाल महाविद्यालय, कुंडल तालुका पनुस जिल्हा सांगली येथील प्राध्यापक डॉ.धनंजय होनमने यांनी मांडले.
संस्थेचे सचिव ॲड.संतोष मुंडे यांनी संत जनाबाई महाविद्यालयामध्ये प्रतिवर्षी संत जनाबाई पुण्यतिथी साजरी करण्याचा मुख्य उद्देश हा संत जनाबाईचे चरित्र विद्यार्थ्यांना पोहोचविणे आहे असे विचार मांडले.आ.रत्नाकरराव गुट्टे यांनी संत जनाबाई संस्थानासाठी शासनाकडून भरघोस निधीची तरतूद केली जाईल असे आश्वासन दिले.अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.टेंगसे यांनी आज महाविद्यालयामध्ये मुलापेक्षा मुलींची संख्या जास्त दिसत आहे हे खरं संत जनाबाईच्या विचाराचे यश आहे असे विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.धूत यांनी केले.संचलन प्रा.डॉ.सचिन खोकले तर आभार प्रा.विजय बेरळीकर यांनी मानले.यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत सातपुते,प्रा.डॉ.मुंजाजी चोरघडे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग, महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.



