जागर स्वतःचा-खरी नशा मुक्ती हीच खरी स्वातंत्र्याची सुरूवात

53

 

आपण स्वातंत्र्याच्या अमृतकाळात जगतो आहोत. पण खरंच आपण “मोकळे” आहोत का? शरीराने आपण मोकळे असू शकतो, पण मनाने? विचारांनी? जीवनशैलीने?
आज आपल्या समाजाला पोखरणारी एक अदृश्य साखळी आहे-नशेची. ही नशा केवळ दारू, सिगारेट, तंबाखू एवढीच राहिलेली नाही. ही नशा आहे, असंतुलित तंत्रज्ञान वापराची, अविरत चिंता व विचारांची, तुलनेच्या आणि अपूर्णतेच्या मानसिकतेची.
शासनाच्या “नशा मुक्ती अभियानाने” या समस्येच्या मुळाशी जाऊन समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण हा बदल खरं तर व्यक्तीपासून समाजाकडे जाणारा असायला हवा.

नशेचा नववेध-आधुनिक गुलामी
आजच्या युवकाचे आयुष्य ‘डोळे उघडल्यापासून डोळे मिटेपर्यंत’ स्क्रीनवर केंद्रित असते. सतत मोबाइल, सोशल मिडिया, रील्स, गेम्स यामध्ये तो हरवलेला असतो.

ही नशा शरीर झपाटून टाकत नाही, पण ती मन गिळते. ती स्वप्न दाखवते, पण स्वप्नपूर्तीच्या शक्तीला हरवून टाकते. ती माहिती देते, पण ज्ञानाची खोलता हिरावून घेते.
दुसरीकडे, अती विचार- ‘ओव्हरथिंकिंग’- ही आजची नवी नशा आहे. प्रत्येक गोष्टीत शक्यता, भीती, शंका शोधत बसतो.
भूतकाळात हरवलेला, भविष्याची चिंता करणारा आणि वर्तमान विसरलेला माणूस कधीही खरा “जगणारा” नसतो.

नशा मुक्ती म्हणजे काय?

नशा मुक्ती म्हणजे केवळ पदार्थांचा त्याग नाही-ती एक मानसिक, वैचारिक आणि भावनिक स्वातंत्र्याची सुरुवात आहे.
ती म्हणजे स्वतःला ओळखणं, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं आणि जगात सकारात्मक फरक घडवण्याच्या दिशा निवडणं.
काय करता येईल? – परिवर्तनाची दिशा
🔹 डिजिटल उपवास: आठवड्यातून एक दिवस सोशल मिडिया पासून दूर रहा. ती शांतता अनुभवाचं.
🔹 मनाच्या आरोग्याकडे लक्ष: योग, ध्यान, चालणे, नैसर्गिक संवाद-हे तुमच्या मनाला नशेपासून लांब ठेवू शकतात.
🔹 आपण एक आदर्श बनूया: तुमचं स्वतःचं वर्तन समाजाला प्रेरणा देतं. मुलं पाहतात, शिकतात, आणि वागतात.
🔹 शिक्षण आणि चर्चेचा भाग बनवा: शाळा, महाविद्यालये, ग्रामसभा, सोशल मीडिया- सगळीकडे ही चळवळ रुजवा.
🔹 सकारात्मक व्यसन निर्माण करा: वाचन, कला, संगीत, स्वयंसेवा, खेळ- हीच खरी “उन्नत नशा” आहे.
उद्याचं चित्र-तुमच्यामुळे उजळू शकतं
कल्पना करा एक अशा समाजाची –
● जिथे मुलं मोबाइलऐवजी मैदानी खेळात रमलेली असतील
● युवक आत्मभान आणि आत्मनिर्भरतेने झपाटलेले असतील
● महिला, वृद्ध, शेतकरी सर्वजण परस्पर संवादाने एकमेकांना आधार देत असतील
● नशा हा शब्द फक्त इतिहासात उरलेला असेल! हे चित्र साकार होऊ शकतं- जर प्रत्येकाने स्वतःच्या मनातला गोंधळ ओळखून आपली जबाबदारी उचलली, तर.
उपसंहार: “बदल होण्यासाठी थांबू नका-बदल स्वतः बना.”
शासन योजना आणेल, नियम बनवेल, प्रचार करेल. पण खरी क्रांती होईल ती व्यक्तीच्या जागृतीने.
नशा मुक्त भारत घडेल तेव्हा, जेव्हा आपण एक एक नागरिक स्वतःच्या जीवनात आत्मशोध आणि आत्मसन्मान रुजवेल.
कारण नशेपासून मोकळं होणं म्हणजेच-खरं स्वातंत्र्य मिळणं.

राहुल डोंगरे, ‘पारस निवास’, शिवाजी नगर तुमसर जि.भंडारा
मो. 9423413826