

जॉर्जिया देशाची राजधानी असलेल्या बटूमी या शहरात पार पडलेल्या जागतिक महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत मराठमोळ्या दिव्या देशमुखने भारताच्याच कोनेरू हंपी हिला टायब्रेकरमध्ये २.५ – १.५ अशी आघाडी घेऊन विश्वविजेतेपद मिळवले आणि इतिहास घडवला. अवघ्या १९ वर्षाच्या दिव्याची ही कामगिरी स्वप्नवत अशीच आहे. तिच्या या कामगिरीने १३ कोटी मराठी माणसांचीच नाही तर १४५ कोटी भारतीयांची मान देखील अभिमानाने उंचावली आहे. हे विश्वविजेतेपद मिळवून दिव्याने आपणच ६४ घरांची नवी राणी असल्याचे सिद्ध केले. तिच्या कामगिरीचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे कारण ही स्पर्धा जेंव्हा सुरू झाली तेंव्हा तिला कोणीही जमेस धरले नव्हते. तिच्यापेक्षाही दिग्गज आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत जगभरातील १०७ बुद्धिबळपटू निवडले गेले होते. बाद फेरीने रंगलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीसाठी निवडलेल्या बुद्धिबळपटूत अव्वल तीन खेळाडू हे चीनचे होते. चौथी खेळाडू ही भारताचीच अंतिम फेरीत पोहचलेली कोनेरू हंपी होती. दिव्याचे स्थान पंधरावे होते. अंतिम फेरीसाठी आठ भारतीय आणि आठ चिनी खेळाडूंची निवड झाली होती. रशियाचेही काही खेळाडू अंतिम फेरीत होते. चीन, रशिया या देशातील खेळाडूंचा या स्पर्धेत दबदबा होता. भारताच्याही कोनेरू हंपी हिला विश्वविजेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजले जात होते पण नवख्या दिव्याला मात्र कोणीच या स्पर्धेचे संभाव्य विजेते म्हणून संबोधले नव्हते मात्र जशीजशी स्पर्धा पुढे सरकत गेली तशीतशी दिव्याची कामगिरी सरस ठरत गेली. आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करत दिव्या पुढे जात होती. अंतिम फेरी चीनच्या दोन खेळाडूत होईल अशी स्पर्धेच्या सुरवातीस जी शक्यता वर्तवण्यात आली होती ती फोल ठरवत दिव्या आणि कोनेरू यांनी सर्वांना चकित करून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत दोन भारतीय खेळाडू असल्याने हा विश्वचषक भारताकडेच राहील हे स्पष्ट झाले. अंतिम फेरीत दिव्याची गाठ अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हंपी हिच्याशी पडली. ३८ वर्षीय ग्रँडमास्टर कोनेरू हंपी ही भारताचीच नव्हे तर जगातील दिग्गज बुद्धिबळपटू आहे. तिने याआधी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. अंतिम फेरीपूर्वी कोनेरूच सर्वाची हॉट फेवरेट होती कारण १९ वर्षाची दिव्या तिच्यापुढे अतिशय नवखी होती. कोनेरूने २००२ साली जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तीन वर्षांनी दिव्याचा जन्म झाला होता. कोनेरूकडे अनुभव होता तर दिव्याकडे आत्मविश्वास होता. उपांत्य फेरीत दोघींनी चीनच्या खेळाडूंवर मात केली होती. अंतिम फेरीच्या सुरुवातीचे दोन्ही डाव बरोबरीत सुटले. टायब्रेकरच्या दुसऱ्या डावात दिव्याने वर्चस्व राखले. तिने हा डाव ७५ चालित जिंकला आणि विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली. अंतिम फेरीत अनुभवावर आत्मविश्वासाने मात केली आणि दिव्या बुद्धिबळाची नवी राणी ठरली. हा विश्वकप जिंकणारी दिव्या ही भारताची चौथी खेळाडू ठरली. याआधी हा किताब कोनेरू हंपी , रमेशबाबू वैशाली आणि द्रोणवली हरिका यांनी जिंकला होता. या विजेतेपदाबरोबर दिव्या आता ग्रँडमास्टरही बनली आहे. ग्रँडमास्टर ठरणारी ती भारताची चौथी खेळाडू ठरली आहे.
अर्थात दिव्याला मिळालेले हे यश एका रात्रीत मिळालेली नाही त्यासाठी तिला मोठा त्याग आणि परिश्रम करावे लागले आहे. ज्या वयात मुले टीव्हीवर कार्टून पाहण्यात व्यग्र असतात त्या वयात तिने बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली. बुद्धिबळासाठी ती टीव्ही आणि मोबाईलपासून दूर राहिली. दिव्याने बुद्धिबळावर लक्ष केंद्रित करावे म्हणून तिच्या पालकांनी घरातील टीव्ही बंद केला. बुद्धिबळात आवड निर्माण झाल्यावर दिव्याने अवघ्या पाचव्या वर्षी पहिले विजेतेपद मिळवले. पाचव्या वर्षी बुद्धिबळात पहिले विजेतेपद मिळवणाऱ्या दिव्याने पुढे आपल्या विजेतेपदाचा धडाका सुरू केला. दिव्याने २००२ साली महिला बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आणि त्यानंतर पुढील वर्षी आशियाई स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. दिव्या अंडर २० विश्वचषक स्पर्धेची ज्युनियर चॅम्पियन देखील ठरली आहे. तिचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादाई आहे. तिचे हे विजेतेपद देशातील किशोरवयीन मुलांसाठी प्रेरणादाई आहे. तिच्यामुळे आता ही मुले देखील बुद्धिबळाकडे वळतील आणि भविष्यात भारताला आणखी दिव्या मिळतील यात शंका नाही. जागतिक विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून ६४ घरांची नवी राणी बनलेल्या मराठमोळ्या दिव्या देशमुख हिचे विश्वविजेतेपदासाठी मनापासून अभिनंदन!!!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५



