शोषणमुक्तीचे शिलेदार : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

109

तुकाराम भाऊराव ऊर्फ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील वाटेगाव या लहान गावात झाला. अण्णाभाऊ साठे हे एक झपाटलेले लेखक होते. अण्णाभाऊंचे वेगळेपण म्हणजे त्यांनी कुठलेही औपचारिक शालेय शिक्षण घेतले नव्हते. शाळेची पायरीदेखील न चढलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. त्यांनी ३७ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, ११ पोवाडे, ३ नाटके, शेकडो गाणी, लावण्या, छकडी अशी विपुल साहित्यसंपदा निर्माण केली आहे. त्यापैकी सात कादंबऱ्यांवर नामवंत दिग्दर्शकांनी मराठी चित्रपटही काढले. अण्णाभाऊंच्या ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला. तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि.स.खांडेकर यांनीही या कादंबरीचे कौतुक केले होते. केवळ वीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी हे विपूल साहित्य निर्माण केले. ही खरोखरी अचंबित करणारी गोष्ट आहे. 

सुरुवातीस ‘लोकयुद्ध’, ‘युगांतर’, ‘मराठा’ सारख्या दैनिकांमध्ये त्यांनी वृत्तांत लेखन, मुलाखती, लेख लिहिले. ‘वाट्टेल ते’ आणि ‘हवे ते’ ही सदरे लिहिली. पहिली कथा कम्युनिस्ट पक्षाच्या ‘मशाल’ साप्ताहिकात लिहिली. अवतीभोवती पसरलेले अफाट दु:ख, दारिद्रय व अज्ञान हेच त्यांच्या चिंतनाचे व लेखनाचे विषय होते. अण्णाभाऊंनी त्यांच्या आयुष्यातील काही वर्षे मुंबईच्या घाटकोपरमधील चिरागनगर या झोपडपट्टीत घालविली. तेथील गरीब, व्यसनी, व्यभिचारी, चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या, गुंड, मवाली, उपेक्षित, भटक्या माणसांचे जगणे, त्यांचा जीवनसंघर्ष अण्णाभाऊंच्या साहित्यात आढळतो. याबात ते एका ठिकाणी म्हणत्तात, ‘जे मी स्वत: जगलो आहे, पाहिलं आहे आणि अनुभवलं आहे, तेच मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या साहित्यातील बऱ्याच व्यक्तिरेखा मला प्रत्यक्ष भेटलेल्या आहेत.

अण्णाभाऊंच्या साहित्यातील वैविध्य, भाषेवरील पकड पाहिली की कोणीही अचंबित होईल एवढे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत आहे. अण्णाभाऊंनी ‘स्मशानातील सोनं’, ‘कोंबडीचोर’, ‘बरबाद्या कंजारी’, ‘रामोशी’, ‘वळण’, ‘सापळा’, ‘उपकाराची फेड’ , ‘मरीआईचा गाडा’, ‘बंडवाला‘ अशा अनेक कथांमधून स्वतंत्र बाण्याच्या बंडखोर नायिका व तळाच्या जात-वर्गातील लढाऊ नायक निर्माण केले. ‘फकिरा’ ही त्यांची कादंबरी ब्रिटिश जुलमी राजवटीच्या विरोधात भारतीय जनतेचा प्रातिनिधीक हुंकार मांडते. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. अण्णाभाऊंचे साहित्य चौदा भारतीय भाषांसह इंग्रजी, रशियन, फ्रेंच, झेक आदी जागतिक भाषांतही अनुवादित झालेले आहे. न्यायाधिष्ठित समाजरचनेचा आग्रह अण्णाभाऊंच्या संपूर्ण साहित्यात ओतप्रोत भरला आहे. त्यांनी आपल्या गाण्यांतून, पोवाडय़ांतून अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. बंगालचा दुष्काळ, तेलंगणा संग्राम, पंजाब-दिल्लीचा पोवाडा, अंमळनेरचे हुतात्मे, काळ्या बाजाराचा पोवाडा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील मुंबईची लावणी, माझी मैना, कामगार चळवळीवरील ‘एकजुटीचा नेता’ ते हिटलरच्या फॅसिझम विरोधात स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, चिनी क्रांतीवरील ‘चिनी जनांची मुक्तिसेना’ हे गौरवगान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गाजलेले ‘जग बदल घालूनी घाव-सांगुनी गेले मला भीमराव’ हे गाणे, अशी अनेक गाणी, कवने, पोवाडय़ांतून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले आहे.

तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. तमाशाबंदीच्या कचाट्यातून सुटण्यासाठी अण्णाभाऊंनी ‘लोकनाट्य’ ही संज्ञा वापरली आणि अकलेची गोष्ट, खापऱ्या चोर, देशभक्त घोटाळे, शेटजीचे इलेक्शन, माझी मुंबई इत्यादी लोकनाट्ये लिहून तो शब्द रूढ केला. या लोकनाट्यातून आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्न त्यांनी मांडले. भांडवलदार, शेतकऱ्यांचे शोषण करणारे सावकार, शेटजीभटजी हे त्यांच्या टीकेचे लक्ष्य होते. तमाशाच्या प्रारंभी होणाऱ्या गणेश वंदनालाही त्यांनी फाटा दिला आणि प्रथम वंदू भूचरणा व छत्रपती शिवाजी राजासारख्या शूर पुरुषाला वंदन केले. थोडक्यात त्यांनी देवाऐवजी माणसाला वंदन करण्याची नवी प्रथा पाडली. तमाशात गवळणींची जी अश्लील भाषेत टिंगल-टवाळी चालायची तिलाही त्यांनी काट दिला. 

रशियाच्या इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटी च्या निमंत्रणावरुन ते १९६१ साली रशियात गेले. त्यांवर त्यांनी लिहिलेले प्रवासवर्णन लोकप्रिय झाले. त्यांचे व्यक्तिमत्व विविध कलागुणांनी भरलेले होते. ते उत्तम अभिनय करीत. हातात डफ घेऊन शाहिरी कवने मोठ्या तडफेने गात. बुलबुल, बासरी, हार्मोनियम अशी वाद्येही ते वाजवीत. दांडपट्टा फिरवीत. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजविण्याचे महत्वपूर्ण काम शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र यांच्यासह सीमा प्रदेशातील विविध भागांतील हजारो ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले. त्याच्यामुळे लोक प्रेरित झाले.

अनेक नामवंत साहित्यिकांच्या वाट्याला उपेक्षा आली तशी त्यांच्या हयातीत उपेक्षाच आली. अण्णाभाऊंचे साहित्य रूपवादी, रंजनपर, परधार्जिणे आणि भडक आहे, ते साहित्यबाह्य प्रेरणेवर आधारलेले आहे अशी टीका झाली. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. मराठी ‘कादंबरीचे शतक’ लिहिणाऱ्या कुसुमावती देशपांडे यांनी तर कोण हे अण्णाभाऊ साठे ? असा प्रश्न केला होता. 

अण्णाभाऊंचे बरेच साहित्य प्रसिद्ध झालेले असले तरी अजूनही बरेच साहित्य अप्रकाशित आहे किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संघर्ष हा अण्णाभाऊंच्या साहित्याचा प्राणबिंदू आहे. अण्णाभाऊंच्या कथा-कादंब-यांमधला संघर्ष शोषण आणि व्यवस्थेच्या विरुद्ध आहे. तो दलित-पीडित-शोषित-वंचितांसाठी आहे. तो त्यांना न्याय व सन्मान मिळवून देण्यासाठी आहे. शोषणमुक्ती हा त्यांचा ध्यास होता. केवळ महाराष्ट्र नव्हे तर साऱ्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व कष्टकरी, दलित, शोषित, पीडित यांचे शोषण संपविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. वर्गविरहित समाजाचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आपले सारे आयुष्य पणाला लावले. अण्णाभाऊंचा शेवटचा काळ मात्र हलाखीत गेला. दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला आले. विपन्नावस्थेत १८ जुलै १९६९ रोजी गोरेगावच्या सिध्दार्थनगरात त्यांचे निधन झाले. अण्णाभाऊ ख-या अर्थाने शोषितांसाठी लढणारे साहित्यिक होते.

✒️सुरेश मंत्री(अंबाजोगाई)मो:-९४०३६५०७२२