मृत्यु नंतरही सोसाव्या लागतात नरक यातना-कोहपरा गावातील मोक्षधामाची दयनीय अवस्था

155

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजुरा -तालुक्यातील कोहपरा गावामधील मोक्षधाम (स्मशानभूमी) सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून, मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेल्या शेडची पूर्णपणे जिरणावस्था झाली आहे. या अवस्थेमुळे अंत्यसंस्काराच्या वेळी नातेवाईकांना अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
शेडचे पत्रे गळून पडले आहेत, संरक्षक भिंती नाहीत, तसेच पावसाळ्यात पाणी साचून अंत्यसंस्कारात अडथळा निर्माण होतो. परिणामी, ज्या ठिकाणी शांतता, स्वच्छता व सन्मान असावा तिथे अस्वच्छता, बेबंदपणा आणि हालअपेष्टा यांचा विखारी अनुभव मृतांच्या नातेवाईकांना येतो. त्यामुळें मृत्यु नंतरही सोसाव्या लागतात नरक यातना असा अनुभव गावकऱ्यांना येत आहे. गावकऱ्यांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे या समस्येकडे लक्ष वेधूनही योग्य कारवाई झालेली नाही. एकीकडे आपण ‘स्वच्छ भारत’ आणि ‘सन्मानाने मृत्यू’ या संकल्पना मांडतो, परंतु गावातील मोक्षधामाच्या अवस्थेवरून प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच दिसत आहे.ग्रामस्थांनी संबंधित प्रशासन, पंचायत समिती व जिल्हा परिषदेने तातडीने लक्ष घालून मोक्षधामाची डागडुजी, शेडची नव्याने उभारणी व स्वच्छतेची व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी केली जात आहे.