कृषी कन्यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम बोर्डो पेस्ट तयार करून शेतकऱ्यांना रोगप्रतिबंधक उपायांचे मार्गदर्शन

99

✒️सिध्दार्थ दिवेकर(विशेष प्रतिनिधी) 

उमरखेड(दि.8ऑगस्ट):-डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कार्यरत असलेल्या उमरखेड येथील कृषी महाविद्यालयातील कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) अंतर्गत एक अभिनव व उपयुक्त उपक्रम राबवत ‘बोर्डो पेस्ट‘ तयार केली आणि शेतकऱ्यांना त्याच्या वापराबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन केले

फळझाडांना होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी बोर्डो पेस्ट अत्यंत प्रभावी ठरते. विशेषतः झाडाच्या बुंध्यावर लावल्यास ती झाडांना होणाऱ्या जखमा, छाटणीनंतर होणारे संसर्ग, तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रसार रोखण्यास मदत करते. ही पेस्ट कॉपर सल्फेट व काळीचा चुना यांच्या योग्य प्रमाणातील मिश्रणातून तयार केली जाते. या मिश्रणात औषधी गुणधर्म असून, यामुळे झाडांचे आरोग्य टिकवून उत्पादनक्षमतेत वाढ होते. यामुळे शेतकऱ्यांना रासायनिक औषधांचा अतिरिक्त खर्चही वाचतो. हा उपक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी प्राचार्य प्रा. एस. के. चिंतले, RAWE कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. बी. इंगळे, तसेच वाय. एस. वाकोडे, ए. एस. राऊत, व विषयतज्ज्ञ एस. एन. अंभोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कृषीकन्यांनी शेतकऱ्यांपुढे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक मांडून, झाडांना पेस्ट लावण्याची पद्धत समजावून दिली आणि त्याचे फायदे विशद केले. या उपक्रमात कृषीकन्या उर्मिला सुभाष कांबळे, अचल अनिल ठक, सेजल संजय राऊत, निकिता विलास साबळे, नवनिता राजू राठोड, विधी लक्ष्मण बागडे, प्रांचिता रुस्तुम हिरे, पायल सिद्धार्थ कांबळे यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

कार्यक्रमाचे यजमान शेतकरी श्री. बाबाराव शामराव शिंदे यांनी कृषीकन्यांनी घेतलेल्या मेहनतीचे विशेष कौतुक करत, अशा उपक्रमांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक व पर्यावरणपूरक शेतीसंदर्भात जागरूकता मिळते, असे मत व्यक्त केले.

कृषीकन्यांच्या या उपक्रमामुळे एकीकडे शेतकऱ्यांना पर्यायी, कमी खर्चिक आणि नैसर्गिक उपायांचा परिचय झाला, तर दुसरीकडे विद्यार्थिनींच्या व्यावसायिक क्षमतेलाही दिशा मिळाली. हा उपक्रम ‘शिकताना शिकवणे आणि शिकवताना समजून घेणे’ याचा आदर्श उदाहरण ठरतो.