२५ वर्षांनी एकत्र आले राजुरा झेडपीतील विध्यार्थी : स्नेहमिलन सोहळ्यात दिला जुन्या आठवणींना उजाळा

120

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.11ऑगस्ट):– जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय, राजुरा येथे शैक्षणिक सत्र १९९८ – १९९९ यावर्षात इयत्ता ११ वीत प्रवेश घेऊन सन २००० या ऐतिहासिक वर्षी इयत्ता बारावी उत्तीर्ण होऊन विविध क्षेत्रात आपआपल्या उत्तुंग आणि यशस्वी जीवन प्रवासाची सुरुवात करणाऱ्या वर्गमित्रांनी तब्बल २५ वर्षांनी जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय (झेडपी ज्युनियर कॉलेज) राजुरा येथे एकत्रित येऊन आपल्यावर ज्ञान, विज्ञान, साहित्य, करिअर आणि मानवी मुल्यांची जपूनकीच्या संस्कारांची रूजवणूक करणाऱ्या गुरूजनांचे, जुन्या दिवसांचे स्मरण केले, दिवंगत प्राचार्य मार्कंड राऊत यांना मौन श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर ओमसाई मंगल कार्यालय राजुरा येथे स्नेहमिलन सोहळा मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात आला.

        यावेळी सर्वांनी एकत्रित येऊन आपल्यातील सुप्त कलागुणांना, जुन्या- नव्या अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला, अनेक वर्ग मित्र, मैत्रिणींनी विविध नृत्य, संगीत, गीत, कविता, नाट्य, खेळ अत्यंत मोकळेपणाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात सादर केले. आपल्या मनोगतातून जुन्या आठवणी जाग्या केल्या. यावेळी सर्वांनी सन्मानचिन्ह, गुलाब पुष्प देऊन एकमेकांचे उत्स्फूर्त स्वागत केले, गौरव केला. यावेळी पार पडलेल्या स्नेहमिलन सोहळ्याचे सुत्रसंचालन प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले. प्रास्ताविक सुजीत पोलेवार यांनी तर आभार प्रदर्शन रविंद्र राजुरकर यांनी केले. 

        यावेळी बादल बेले, देविदास वांढरे, प्रा. प्रफुल्ल शेंडे, सुजित पोलेवार, रवींद्र राजूरकर, बंडू उपरे, शंकर दुवाशी, दिपक झाडे, विजय डोंगरे, प्रा. दुषण भोंगळे, रामकिशन चिडे, संतोष जुलमे, अरविंद करमनकर, दिलीप चापले, रुपेश काकडे, सोनाली दुध्दलवार, विणा मोहुर्ले, शुभांगी चौधरी, रंजना हिरादेवे, रेहाना परवीन, सारिका पायतडे, सविता मत्ते, अर्चना रागीट, कल्पना अडवे, आम्रपाली रामटेके, रतिशा ठेंगणे, वर्षा रामटेके यासह अनेक वर्गमित्रांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच आपल्या निष्कपट, पावन मैत्रीला यापुढेही कायम जपत एकमेकांच्या सुख – दुःखात सहभागी होत राहण्याचा आणि सर्वांच्या सोईनुसार ठराविक काळानंतर अशाच पद्धतीने सर्व वर्ग मित्र मैत्रिणींना सहभागी करून स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वानी सक्रिय सहभाग आणि परिश्रम घेतले.