

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*
राजुरा :- राजुरा विधानसभा क्षेत्रातील धडाकेबाज कामगार नेते सुरज ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाची विचारधारा, विरोधी पक्षनेते जननायक खा. राहुल गांधी व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी सुरज ठाकरे व त्यांचे सहकारी राहुल चव्हाण यांना काँग्रेसचा दुपट्टा परिधान करून पक्षात स्वागत केले. कामगारांच्या हक्क व समस्यांवर सतत लढा देत आलेल्या सुरज ठाकरे यांच्या अनुभवाची दखल घेत, काँग्रेस पक्षाने त्यांना कामगारांच्या प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी सोपवली आहे.
यावेळी सुरज ठाकरे म्हणाले की, “काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांच्या न्यायासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून, त्यांच्या प्रत्येक हक्कासाठी संघर्षाची परंपरा कायम ठेवणार आहे.” यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक व माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, साईनाथ बतकमवार, माजी नगरसेवक हरजीतसिंग संधु, अंबादास भोयर, केशव बोढे, अशोक राव, धनराज चिंचोलकर यांसह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



