कृषीपंपधारक शेतकऱ्यांची महावितरणसोबतची बैठक फिस्कटली ; स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर होणार आमरण उपोषण… स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा या आंदोलनाला पाठिंबा..

585

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100*

 

म्हसवड (सातारा ) : जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वातंत्र्यदिनी महावितरण विरोधातल्या विविध प्रश्नावर जांभुळणी परिसरासह माण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन स्थगित करण्याबाबत विनंती करण्यासाठी आणि प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महावितरणच्या वडूज कार्यालयामध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या बरोबर बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा झाली परंतु कोणताही तोडगा निघाला नाही.

गेली तीन ते चार वर्षें आमच्या कृषीपंपाना पुरेशा प्रमाणामध्ये वीज पुरवठा होत नाही. याबाबत आम्ही सातत्याने तोंडी आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे याबाबतची कल्पना सातारा महावितरणचे मुख्य अभियंता कार्यालयाला दिली आहे. मात्र आमच्या मागण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले आहे. पुरेशा प्रमाणामध्ये विद्युत पुरवठा होत नसल्याने आम्हाला शेती करणे अवघड झाले आहे, त्यामुळे आमच्या जगण्याचे आणि उदरनिर्वाहाचे साधन संपुष्टात आले आहे. याबाबत वारंवार विनंती करून सुद्धा प्रशासन ऐकत नसल्यामुळे शेवटचा भिमटोला देण्यासाठी स्वातंत्र्यदिनी आम्ही आंदोलन करत आहोत अशी भूमिका जांभुळणी सह माण तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. यावेळी महादेव केंगार, मधुकर कोळेकर, योगेश झिमल, हणमंत काळेल, समाधान काळेल, महेश करचे उपस्थित होते.

जिल्ह्यातील संपूर्ण महावितरण कार्यालयाचे अधिकारी केवळ बैठका घेण्यामध्ये मशगुल आहेत. आमच्या खालील मागण्या वेळेत पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही आंदोलन करण्यावर ठाम आहोत अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी जाहीर केली आहे

मुख्य मागण्या:

1. महावितरणने आश्वासन दिलेले माण- खटाव मधील 18 अतिरिक्त डीपी तातडीने बसवावेत.
2. शेनवडी सबस्टेशन सह संपूर्ण माण-खटाव मध्ये शेतीसाठी पुरेशा दाबाने आणि सलग 8 तास वीजपुरवठा करावा.
3. ट्रान्सफॉर्मर वारंवार जळण्यास आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
4. महावितरणने माण – खटाव मध्ये पायाभूत सुविधा तातडीने वाढवून वीज पुरवठा सुरळीत होईल याची दक्षता घ्यावी.
5. महावितरने दहिवडी येथे विभागीय तर म्हसवड येथे उपविभागीय कार्यालय तातडीने सुरु करावे.

खटाव तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुद्धा महावितरण विरोधामध्ये विविध प्रश्नांवर तीव्र आंदोलने पुकारली आहेत. या आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी संघटनेने सुद्धा या आंदोलनांमध्ये उडी घेण्याचे जाहीर केले आहे. या शेतकऱ्यांसोबत महावितरण मधील बैठकीला खटाव-माण संपर्कप्रमुख शरद खाडे आणि खटावचे तालुका अध्यक्ष दत्तू काका घार्गे यांनी हजेरी लावली. हा प्रश्न तातडीने सोडवला नाही तर या शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आश्वासन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिले आहे.