

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*
राजुरा- राजुरा शहरालगतचा बामणवाडा परिसर अक्षरशः पाण्याखाली! कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने स्नेहदीप नगर, स्टेला मॅरीस स्कूल आणि बामणवाडातील आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये हाहाकार माजला आहे. परिसरात जिकडे तिकडे पाणीच पाणी, रस्ते चिखलमय झाले, शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना , नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे.
यामागे फक्त पाऊसच नाही तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि प्रशासनाचा निष्काळजी व नियोजनशून्य कारभार हेही तितकेच जबाबदार आहेत. राष्ट्रीय महामार्ग एन.एच. ९३०(ड) च्या बांधकामामुळे पावसाळ्यात पाणी नैसर्गिक प्रवाहाऐवजी थेट वस्त्यांकडे वळते. चुकीचे ड्रेनेज, बंद नाले आणि बामणवाडा तलावाचे अयोग्य खोलीकरण यांनी परिस्थितीचे रूपांतर आपत्तीमध्ये केले आहे.
आज सकाळीच चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करत पीडितांच्या समस्या जाणून घेतल्या. चिखलातून व पाण्यातून चालत नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या धोटे यांनी “ही परिस्थिती प्रशासनाच्या दुर्लक्षाची थेट परिणती आहे” असा आरोप करत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक अभिजित जिचकर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अभिषेक पुल्लावार यांना तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
“जनतेचा संयम संपत चालला आहे. जर तात्काळ पाणी निचरा, रस्त्यांची दुरुस्ती, आणि पूर टाळण्यासाठी कायमस्वरूपी योजना राबवली नाही, तर उग्र जनआंदोलन अपरिहार्य ठरेल,” असा इशारा देत धोटे यांनी आंदोलनाची ठिणगी पेटवण्याची तयारी दर्शवली आहे. स्थानिक नागरिक आता एकाच सुरात त्यांच्या भुमिकेला पाठिंबा दिला आहे.
यावेळी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, बामणवाडा च्या सरपंच भारती पाल, ग्रा. प. सदस्य अभिलाष परचाके सर्वांनंद वाघमारे, जगदीश पाल, मंगेश गेडाम, कविता उपरे, सुरेश डाखरे , भास्कर चौधरी, कुरूमदास पावडे, जनार्दन मेश्राम, सुजाता मेश्राम, अशोक ठाकरे, पदमाँ तेलकापलीवर, वासुदेव सिडाम यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.



