

▪️प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण..
✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)
उल्हासनगर(दि.13ऑगस्ट):- मध्य रेल्वेने वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून मुंबईतील लोकल सेवा अधिक सोयीस्कर आणि सक्षम करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते खोपोलीदरम्यान १५ डब्यांच्या लोकल गाड्यांची सेवा वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून, या संदर्भातील कामे वेगाने सुरू आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, ३१ ऑगस्ट ही अंतर्गत अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सीएसएमटी-कल्याण दरम्यान धीम्या आणि जलद मार्गावरील दहा स्टेशनांवर एकूण २६ प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली जाणार आहे. तसेच, कल्याण – कसारा आणि खोपोलीदरम्यानच्या २४ स्थानकांवरही प्लॅटफॉर्म वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे वाहतूक क्षमतेत तब्बल २५ टक्क्यांची वाढ होणार असून, प्रवाशांना गर्दीच्या वेळीही तुलनेने आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.
रेल्वे प्रशासनानुसार, जलद मार्गावरील विक्रोळी, कळवा, मुंब्रा आणि दिवा ही स्थानके १५ डब्यांच्या लोकल गाड्यांसाठी सज्ज केली जात आहेत. तर धीम्या मार्गावरील शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, वासिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी, उंबरमाळी, कसारा, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, शेलू, भिवपुरी, कर्जत, पळसदरी, डोलावली, लवजी आणि खोपोली या स्थानकांवरही प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम सुरू आहे.
या निर्णयामुळे कल्याण, कसारा आणि खोपोली मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गर्दीच्या वेळी होणारी गुदमरून जाणारी परिस्थिती कमी होईल, तसेच रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे जाळ्यातील हा बदल प्रवाशांच्या सोयीसाठी ऐतिहासिक ठरण्याची चिन्हे आहेत.
तसेच या निर्णयाचा प्रवाशी वर्गाकडून आनंद व्यक्त केला असून 1 डब्बा शालेय मुलांसाठी सुद्धा आरक्षित करण्यात यावा अशी मागणी सुद्धा केली आहे.



