

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.20ऑगस्ट):- सुमारे तीस वर्षांपूर्वी शाळेत असतांना ज्या हाताने वर्ग सजावट सारखा अनोखा उपक्रम राबवला त्याच हाताला आज वर्ग सजावटीचे परीक्षण करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले.
शाळेच्या शैक्षणिक परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा छोटूभाई पटेल हायस्कूल,चंद्रपूर येथे शैक्षणिक सत्र 2025 -26 करिता वर्ग सजावट सारखा अनोखा उपक्रम राबविला गेला या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे
या उपक्रमाचे परीक्षण करण्यासाठी छोटूभाई पटेल हायस्कूल माजी विद्यार्थी संघातील विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
ज्या शाळेत काही वर्षांपूर्वी ज्ञानाची प्राप्ती झाली, ज्या शाळेत काही वर्षांपूर्वी स्वतःच्या हाताने वर्ग सजवण्यात आले होते. त्याचं शाळेत आज चक्क वर्ग सजावटीचे मूल्यांकन करण्यासाठी परीक्षक म्हणून येण्याचे सौभाग्य प्राप्त झाल्यामुळे माजी विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह वाहत होता , या अनोख्या सन्मानामुळे माजी विद्यार्थ्यांना गहिवरून आले होते.
माजी विद्यार्थ्यांमध्ये परवीन पठाण, सागर कुंदोजवार, जितेंद्र मशारकर, शाम कोतंमवार आणि विशाल वाटेकर यांच्या सहभाग होता. यांनी परीक्षण करून निकाल मुख्याध्यपिका कांत मॅडम याचेकडे सादर केला.
यावेळी माजी विद्यार्थी संघातर्फे आशिष धर्मपुरीवार, पराग जवळे, अभिषेक आचार्य, धीरज साळुंके, चंद्रकांत कोतपल्लीवार, प्रफुल्ल देमेवार यांचे तसेच छोटू भाई पटेल हायस्कूल माजी विद्यार्थी संघाच्या संपूर्ण सदस्यांचे विशेष सहकार्य प्राप्त झाले.
या सन्मानाकरिता माजी विद्यार्थ्यांनी छोटूभाई पटेल हायस्कूल शाळेचे संचालक श्री जितेनभाई (लोटी) पटेल, मुख्याध्यापिका सौ.कांत मॅडम, उपमुख्याध्यापक मानकर सर यांचे विशेष आभार मानले.



