

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*
राजुरा :– दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी उपजिविकेसाठी कंडक्टर म्हणून काम करणारा, पेठ वॉर्ड राजुरा येथील आदिवासी तरुण अजय शंकर आत्राम याचा वरूर रोडवर रात्री दिड ते दोनच्या सुमारास आयसर व ट्रक यांच्या झालेल्या भीषण अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
घडलेला हा अनर्थ संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळवून गेला. आई, पत्नी आणि एक ते दीड वर्षांची चिमुकली मुलगी यांचे आधारस्तंभ हरपले.
या हृदयद्रावक प्रसंगी मृतकाच्या कुटुंबियांची उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे भेट घेऊन चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांनी त्यांना धीर दिला. धोटे यांनी मृतकाच्या आई, पत्नी व लहानग्या मुलीला सांत्वन करताना डोळ्यांतून अश्रू अनावर झाले.
सदर अपघातातील दोषी ट्रान्सपोर्टर मालकांकडून तातडीने योग्य मदत मिळावी, यासाठी त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ठाम मागणी केली.
या दुःखद प्रसंगी आदिवासी नेते महिपाल मडावी, रवी आत्राम, माजी नगरसेवक गजानन भटारकर, जिल्हा महासचिव एजाज अहमद यांसह काँग्रेस पदाधिकारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून कुटुंबीयांना धीर दिला. तरुण अजय आत्राम यांच्या अकाली निधनाने राजुरा तालुक्यातील आदिवासी समाजात शोककळा पसरली आहे.



