नाशिक गणपती विसर्जन मिरवणुक तब्बल सोळा तास मध्यरात्री १ वाजता सांगता, पंचवीस मंडळांचा सहभाग.

56

 

नाशिक शांतारामभाऊ दुनबळे
नाशिक-: नाशिक शहरातील ढोल-ताशांच्या निनादात विघ्नहर्त्यावर फुलांची उधळण करुन भरपावसात जड अंतः करणाने नाशिककरांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. त्याचवेळी शनिवारी शहरातील पारंपरिक मुख्य गणेश विसर्जन मिरवणूकही अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडली.
पोलिसांचा ‘पॉईंट टू पॉईंट’ कडेकोट पहारा आणि मंडळांना मिरवणूक पूर्ण करण्यासाठी दिलेला विहित अवधी यामुळे मिरवणूक शांततेत पार पडली. कुठेही अप्रिय घटना घडल्याचे दिसून आले नाही. नियमांचे तंतोतंत पालन करुन मुख्य मिरवणुकीत मार्गस्थ झालेल्या मंडळांनी पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार मध्यरात्री बारा वाजता डीजे बंद करुन पारंपरिक वाद्यांच्या तालावर जल्लोष सुरू ठेवला. पहिल्यांदाच तब्बल सोळा
तासांनी मध्यरात्री एक वाजता विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली.
भद्रकाली येथील वाकडी बारव येथून शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता नाशिक महापालिकेच्या ‘श्रीं’ची आरती करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. जलसंसाधन मंत्री गिरीश महाजन, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार देवयानी फरांदे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके, नितीन जाधव, संगीता निकम यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, माजी महापौर विनायक पांडे यांसह मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या गणपती पाठोपाठ मानाच्या
मंडळांची मिरवणूक पुढे सरकली. ढोलपथकांची सलामी दिली असतानाच पावसाच्या हलक्या सरींमुळे मिरवणूक पुढे सरकली. सकाळी साडेअकरा ते सायंकाळी पाचपर्यंत पावसामुळे मंडळांचे पदाधिकारी, ढोल वादक व पोलीस यंत्रणेशिवाय मिरवणुकीत नाशिककरांचा सहभाग तुरळक होता. सायंकाळी सहानंतर नाशिककरांची पावले मिरवणुकीकडे वळली. मानाचे गणपती ‘वेळेत’ मार्गस्थ झाल्याने सोहळ्याची रंगत वाढली. त्यातच पोलिसांनी मध्यरात्री बारानंतरही पारंपरिक वाद्यांसह मिरवणुकीला परवानगी दिल्याने मंडळांचा उत्साह अधिक वधारला. काहीसा गोंगाट व किरकोळ वाद वगळता अतिशय शिस्तबद्धरित्या रात्री ठीक एक वाजता मिरवणुकीची सांगता करण्यात आली. वेळेत प्रारंभ झालेल्या मिरवणुकीतील सर्व मंडळांनी ‘टाइम स्लॉट’ चे पालन करण्यावर भर दिला. एका चौकांत वीस मिनिटे वादन करण्यासह डीजेचाही आवाज मर्यादित ठेवला.
रात्री आठपर्यंत पहिल्यांदाच सर्व मंडळे दूध बाजाराच्याही पुढे पोहोचल्याचे दिसून आले. तर, शिवसेवा मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत शंकर भगवान, हनुमान यासह देवीदेवतांच्या अवतारात कलाकार सहभागी झाले. हरियाणा येथून आलेल्या कलाकारांसोबत फोटो घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली. या कलाकारांनी सादर केलेले भस्म व अग्नी नृत्य मिरवणुकीचे आकर्षण ठरले. दरम्यान, रात्री साडेसहानंतर मिरवणुकीत तरुणाईसह कुटुंबीयांची गर्दी वाढली. ढोलपथकांच्या साखळी मुळे मेहेर, अशोक स्तंभ, सांगली बँक सिग्नल, रविवार कारंजा या ठिकाणी नागरिकांना पुढे चालणेही शक्य नव्हते. साध्या वेशातील पोलिसांसह महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी त्वरित मंडळांना पुढे जाण्याच्या सूचना केल्या. शहरातील पोलीस ठाण्यांच्या गणेशमूर्तीचे शुक्रवारी शनिवारी ढोलताशांच्या निनादात थाटात विसर्जन करण्यात आले