समकीत श्रद्धेचा अभ्यास म्हणजे आत्मकल्याणाचा मार्ग…

56

 

 

 

 

 

चांगली संगत आत्मोत्कर्षाला प्रेरणा देते, वाईट संगत असेल तर सद्गुणांचा नाश करते. ‘समकीतचे ६७ के बोल’ स्पष्ट करताना “श्रद्धान” या विषयावर प.पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा. यांनी आजच्या धर्मप्रवचनात सखोल विवेचन केले. सम्यक श्रद्धेचा अभ्यास म्हणजे आत्मकल्याणाचा मार्ग होय. जैन धर्मातील समकीतचे सात प्रकार सांगण्यात आले आहेत परंतु त्यातील क्षायिक, औपशमिक आणि क्षयोपशम हे महत्त्वपूर्ण ठरतात. समकीत म्हणजे मोक्षमार्गातील पहिली पायरी आहे. यात ‘श्रद्धान’चे चार प्रमुख प्रकार स्पष्ट करून सांगितले गेले. त्यात पहिला, परमार्थ जाणावा. दुसरा, त्याचे जाणकार बनावे म्हणजे या तत्त्वांचा गहन अभ्यास करावा. तिसरा, परमार्थ समजल्यावर त्याची सेवा करावी, आपले ज्ञान वृद्धिंगत करावे. चौथा, ज्यांनी समकीतचा त्याग केला किंवा वमन केले, त्यांची संगत टाळावी; त्यांच्यालेखे हिंसा हाच धर्म असतो, अशांच्या संगतीत कधीच येऊ नये याविषयी सोदाहरण सांगण्यात आले. सत्संगाने आत्मा शुद्ध होतो व मोक्षाकडे वाटचाल होते असे सांगण्यात येऊन समकीतची महतता अधोरेखित करण्यात आली.
प.पू. उन्नतीप्रभाजी म.सा. यांनी आजच्या प्रवचनात जिनवाणी केवळ ऐकण्यापुरती मर्यादित न ठेवता ती जीवनात आत्मसात करावी. जिनवाणी ऐण्याने केवळ हा जन्मच नव्हे तर येणारा जन्म ही सुधारतो. जीवनात जिनवाणी म्हणजे आत्मा जागृत करणारा मार्ग आहे. उदाहरण देताना सांगितले गेले की, लाख रुपयांचा मोबाईल असला तरी चार्जर नसेल तर तो निरुपयोगी ठरतो, जिनवाणीचे देखील असेच आहे. जिनवाणीचे तीन प्रमुख फायदे सांगण्यात आले. दुःखी जीवासाठी सुखदायक ठरते, आत्म्याला शीतलता प्रदान करते. आत्मोत्कर्ष साधण्यासाठी उपयुक्त ठरते. आत्म्याचे खरे सुख प्राप्त करायचे असेल तर जिनवाणीचे ज्ञान आणि आचरण अत्यावश्यक आहे. आत्मोन्नतीचा खरा चार्जर ‘जिनवाणी’च आहे असे उपस्थितांना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात आले.

 

 

(शब्दांकन – किशोर कुळकर्णी, मो. 94227 76759)