

प्रवीण बागड़े
नागपुर
मो.क्र. ९९२३६२०९१९
————————————————
आजच्या समाजात एक वेदनादायी वास्तव दिसून येते. या बदलत्या जीवनशैलीत घराची सजावट, सौंदर्यवर्धन आणि दिखाऊपणा याला मोठे महत्त्व दिले जात आहे. घर-सजावटीसाठी बुद्धांच्या मूर्ती मोठ्या उत्साहाने विकत घेतल्या जातात. या सजावटीत अनेकदा भगवान बुद्धांच्या मूर्तींचा समावेश केला जातो. घराच्या ड्रॉइंगरूममध्ये, बागेत किंवा ऑफिस टेबलावर बुद्धाची मूर्ती ठेवली की शांती आणि सकारात्मकता मिळेल, असे मानले जाते. दुर्दैवाने या मूर्तींच्या खऱ्या अर्थाचा, त्यांच्या आध्यात्मिक संदेशाचा विचार अनेकदा होत नाही. शोपीस म्हणून घेतलेल्या या मूर्ती कालांतराने तुटल्या, मळकटल्या किंवा नकोशा झाल्या की त्या सरळ कचराकुंडीत टाकल्या जातात. अशा मूर्ती कचराकुंडीत टाकणे म्हणजे संस्कृतीहीनतेचे लक्षणच म्हणावे लागेल. हे दृश्य अत्यंत वेदनादायी आणि अपमानकारक आहे. हा केवळ मूर्तींचा नव्हे, तर बुद्धांच्या शिकवणीचा अपमान आहे.
भगवान बुद्ध हे केवळ बौद्ध धर्माचे प्रवर्तक नव्हते, तर ते संपूर्ण मानवजातीसाठी शांततेचा मार्ग दाखवणारे महापुरुष होते. भगवान बुद्ध हे शांततेचे, करुणेचे आणि समतेचे जागतिक प्रतीक असुन त्यांनी करुणा, दया, समता, मैत्री आणि अहिंसा यांचे तत्त्वज्ञान मांडले. त्यांच्या शिकवणींनी केवळ भारतालाच नाही, तर जगभरातील लाखो-कोट्यवधी लोकांना जीवनाचा खरा मार्ग दाखवला. त्यांची प्रतिमा ही केवळ सजावटीची वस्तू नसून जीवनातील विवेक व मूल्यांची आठवण करून देणारे प्रतीक आहे.
अशा थोर व्यक्तिमत्त्वाच्या मूर्तीला ‘सजावटीचा शोपीस’ मानणे आणि त्याचा अनादर करणे ही आपली सांस्कृतिक अधोगतीच म्हणावी लागेल. हे मान्य करावे लागेल की अंधश्रद्धा, फेंगशुई किंवा ‘लक’ यासाठी मूर्ती ठेवली जाते. परंतु खरेतर मूर्ती ठेवण्यामागे श्रद्धा आणि आदर असणे आवश्यक आहे. शोपीस म्हणून मूर्ती ठेवून तिचा अपमान करणे म्हणजे भगवान बुद्धांच्या विचारांचा, तत्त्वज्ञानाचा आणि इतिहासाचा अपमान होय.
समाजाने या बाबतीत संवेदनशील होणे आवश्यक आहे. मूर्ती तुटली तर ती योग्य धार्मिक संस्थांना सुपूर्द करावी किंवा सन्मानपूर्वक विसर्जित करावी. माध्यमे, शाळा व सामाजिक संघटनांनीही जनजागृती करणे गरजेचे आहे. बुद्धांचा खरा सन्मान मूर्ती ठेवण्यात नसून त्यांच्या करुणा, दया आणि विवेक या शिकवणी आचरणात आणण्यात आहे. म्हणूनच लक्षात ठेवू या. भगवान बुद्ध शोपीस नाहीत आणि त्यांच्या प्रतिमा कचराकुंडीकरिता तर अजिबातच नव्हेत. त्यांच्या प्रतिमेचा सन्मान राखणे हेच आपल्या संस्कृतीचे खरे लक्षण आहे. तर चला, बुद्धांना कचराकुंडीपासून वाचवू या; आणि त्यांच्या शिकवणीला आपल्या हृदयात स्थान देऊ या.



