मराठा समाजाला आधी मिळालेले आरक्षण नकोय का? ते रद्द करायचे का? ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सवाल उपस्थित करतानाच सुशिक्षित नेतृत्वाने बोलण्याचा सल्ला द्यावा

107

 

नाशिक शांतारामभाऊ दुनबळे

नाशिक -: मराठा समाजासाठी स्वतंत्र१० टक्के आरक्षण आधीच दिलेले आहे, तसेच ईडब्ल्यूएसच्या आरक्षणातील १० टक्क्यांपैकी ८० टक्के वाटा मराठा समाजालाच मिळतो, त्याशिवाय ओपनमधील ५० टक्क्यांतील बहुतांश वाटा मराठा समाजाला मिळत असताना ही सर्व आरक्षणे तुम्हाला नको आहेत का ? आधीची मिळणारी ही सर्व आरक्षणे रद्द करायची आहेत का ? की केवळ ओबीसींमध्येच आरक्षण हवे आहे, त्याचे उत्तर मराठा समाजाने द्यावे. तेदेखील ज्यांना आरक्षण म्हणजे काय ? हे समजते अशा सुशिक्षित नेतृत्वानेच द्यावे, असा उपरोधिक टोला भुजबळ यांनी जरांगे यांना लगावला.
ओबीसींच्या आरक्षणप्रश्नी लातूरच्या एका ओबीसी युवकाने आत्महत्या केल्याने लातूर दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी साधलेल्या संवादात भुजबळ बोलत होते. मराठा समाजात अनेक माजी मुख्यमंत्री, अनेक आजी-माजी केंद्रीय मंत्री, राज्यातील विद्यमान मंत्री, खासदार, आमदार असे बरेच जण सुशिक्षित आणि समाजाशी नाळ जोडलेले नेते असल्याने त्यांच्यापैकी कुणी ही यावर बोलावे. जे शिकलेले आहेत, त्यांनीच उत्तर द्यावे,ज्यांना समजत नाही, अशिक्षित आहे त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा नाहीअसे मंञी भुजबळ यांनी सांगितले
राजकीय आरक्षणामध्ये गाव, खेडे पातळीवर सरपंच पद ओबीसींसह अन्य मागास समाजाला मिळते. तरीदेखील ते कुणाला द्यायचे हे ठरविण्याचे काम हे तेथील स्थानिक मराठा समाजाचे नेतृत्वच करीत असते, हे गावगाड्यातील वास्तव आजही कायम आहे. तरीदेखील ओबीसीतच आरक्षणाचा हिस्सा कशासाठी हवा आहे? याबाबत मराठा समाजातील जाणकार, अनुभव, सुशिक्षित नेत्यांनी जाहीरपणे बोलावे, असेही भुजबळ यांनी सांगितले.
देशातील वरिष्ठ जातींमधून विविध राज्यांमध्ये आंदोलने झाल्यानंतर त्यांना मोदी सरकारने १० टक्के स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतर ती आंदोलने शांत झाली. महाराष्ट्रात मात्र मराठ्यांना त्या १० टक्क्यांशिवायही अन्य लाभ मिळत आहेत. ब्राह्मण समाज अवघा दोन, तीन टक्के असल्याने ईडब्ल्यूएसमध्ये लाभ घेण्याचे त्याचे प्रमाणही अत्यल्प असून त्या १० टक्क्यांतही सर्वाधिक लाभ हा मराठा समाजाला मिळत आहे, हे वास्तव आहे. सर्व शैक्षणिक प्रवेशांतूनही ही आकडेवारी दिसुन येत आहे असे शेवटी भुजबळ यांनी स्पष्ट केले