

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.15सप्टेंबर):-पालम शहरातील बालाजी नगर परिसरात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता झालेल्या दुर्दैवी घटणेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी नगर येथील शेख शफीक शेख मुसा (31) यांची पान टपरी होती. त्यांनी ती बैलगाडीत ठेवून घरी आणल्यानंतर खाली घेत असताना टपरी घसरून बैलगाडीवरील लोखंडी दांडी विजेच्या तारेला लागली. यात काम करणारे सिद्धार्थ नरहरी वावळे (35, रा. जवळा, ता. पालम), शेख शफीक शेख मुसा (31) व शेख शौकत शेख मुसा (40, रा. बालाजी नगर, पालम) यांना विजेचा तीव्र धक्का बसला. तिघांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या अपघातात शेख फरहान शेख महेबूब (16), असेफ शेखेर शेख (18) व शेख असलम शेख गुड्डू (रा. आयेशा कॉलनी, पालम) हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या साई हॉस्पिटल, लोहा येथे उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे पालम शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



