मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान स्पर्धेकरिता राजुरा तालुका सज्ज

52

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

– राजुरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ६५ ग्रामपंचायतींना सुवर्णसंधी- डॉ. भागवत रतनबाई आनंदराव रेजीवाड, गटविकास अधिकारी यांनी केले सूक्ष्म नियोजन

 

 

 

राजुरा (१६ सप्टेंबर )
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद येथून आभासी पद्धतीने दिनांक १७ सप्टेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची अधिकृतपणे घोषणा करणार आहेत. शाश्वत विकास ध्येय स्थानिकीकरणाच्या थीम्स नऊ प्रमुख क्षेत्र आहेत. गरिबीमुक्त आणि उपजीविका वृद्धीस पोषक गाव , आरोग्यदायी गाव , बालस्नेही गाव , जलसमृद्ध गाव, स्वच्छ आणि हरित गाव, पायाभूत सुविधायुक्त गाव , सामाजिक न्याय आणि सुरक्षित गाव , सुशासनयुक्त गाव , महिला स्नेही गाव अशा थीम, प्रमुख क्षेत्रे असणार आहेत. या अभियानाचे मूल्यमापन करताना सुशासन युक्त पंचायत १६ गुण, सक्षम पंचायत (स्वनिधी व लोकवर्गणी ) १० गुण, जलसमृद्ध , स्वच्छ व हरित गाव १९ गुण, मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण ६ गुण , गावपातळी वरील संस्था सक्षमीकरण १६ गुण , उपजीविका विकास , सामाजिक न्याय २३ गुण, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे ५ गुण, नाविन्यपूर्ण उपक्रम ५ गुण असे एकूण १०० गुणाचे मुख्य घटक विषय निहाय गुणांकन होणार आहे. राजुरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील ६५ ग्राम पंचायतींना या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. प्रत्येक गावात नोडल अधिकारी नेमून ग्राम पंचायत व पंचायत समिती मध्ये समन्वय साधला जाणार. तालुका व जिल्हास्तरावर कार्यशाळा घेऊन सरपंच, ग्रामसेवक यांना या अभियानाच्या अनुषंगाने करावयाच्या विविध बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. भागवत रतनबाई आनंदराव रिजीवाड गटविकास अधिकारी पंचायत समिती राजुरा यांनी दिली आहे. तालुका स्तर ते राज्य पातळीवर मोठया रक्कमेचे बक्षिस असल्याने शासनाने ग्राम पंचायतिना सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच समृद्ध व संपन्न गावं निर्माण होण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही स्पर्धा अधिक महत्त्वाची ठरणार आहे.