

भारताच्या शेजारी देशात भयानक अराजकता माजली आहे. श्रीलंका आणि बांगलादेशांत जे घडले तेच नेपाळमध्ये घडत आहे. नेपाळच्या के पी शर्मा ओली सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्यावर तेथील तरुणाईने ( जेन झी ) मोठा उठाव केला. हा उठाव इतका मोठा होता की नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांना पदावरून पाय उतार व्हावे लागले. त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांना आंदोलकांनी पळू पळू मारले. त्यांची धिंड काढली. नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले. राजकीय नेत्यांची घरे जाळली. सरकारी कार्यालयाला आगी लावल्या. नेपाळची संसद आणि सर्वोच्च न्यायालय जाळून खाक केले. या आंदोलनात ५१ नागरिक मरण पावले तर १३०० हून अधिक नागरिक जखमी झाले. नेपाळमध्ये जे घडले तेच श्रीलंकेमध्ये तीन वर्षापूर्वी घडले. बांग्लादेशातही मागील वर्षी तेच घडले. श्रीलंका आणि बांगलादेशच्या पंतप्रधानांना सत्ता सोडून परदेशात पळ काढावा लागला. त्याचीच पुनरावृत्ती नेपाळमध्ये झाली. नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली हेही देश सोडून पळून गेले त्यामुळे नेपाळच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांनी नेपाळच्या हंगामी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून भारतात आश्रय घेतल्यावर तिथे राजकारणाबाहेरील व्यक्ती असलेल्या मोहम्मद युनूस यांच्याकडे बांगलादेशचे हंगामी पंतप्रधानपद सोपवण्यात आले. मोहम्मद युनूस हे नोबेल पुरस्कारविजेते व्यक्ती आहे. त्यांनी बांगलादेशची सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्वत्र त्याचे स्वागत करण्यात आले. भारतानेही त्याचे स्वागत केले त्यांच्या कार्यकाळात बांगलादेश आणि भारताचे संबंध दृढ होतील असा विश्वास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता मात्र झाले उलटेच. मोहम्मद युनूस बांगलादेशचे लष्कर आणि मुलतत्ववाद्यांच्या नादी लागून भारतविरोधी कारवाया करू लागले. चीन आणि पाकिस्तानच्या कच्छपी लागून ते भारताला शत्रू मानून भारताच्या खोड्या काढू लागले. आता नेपाळची सूत्रेही राजकारणाबाहेरील व्यक्तीकडे गेली आहेत त्यामुळे नेपाळमध्येही बांगलादेशची पुनरावृत्ती होते की काय अशी शंका येते. नेपाळमध्ये सत्तेची सूत्रे आता राजकारणाबाहेरच्या व्यक्तीकडे गेली असली तरी राजकीय तरबेज व्यक्तीला देशाबाहेर घालवण्या इतपित तिथे उलथापालथ घडली आहे.( …की घडवली गेली ? ) राजकीय छक्के पंजे, गुंतागुंतीचे डावपेच नीटसे माहीत नसलेल्या नेपाळच्या या नव्या पंतप्रधानांना तेथील लष्कर व अन्य लोक कळसूत्री बाहुली बनवून ठेवणार नाहीत कशावरून ? बांग्लादेशात आपण हे पाहिले आहे. नेपाळमधील या अराजकतेमागे बाह्य शक्तीचा हात आहे हे लपून राहिले नाही. श्रीलंका, बांगलादेश, नेपाळनंतर कोण ? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. काही जण याचे उत्तर भारत असे देत आहे. श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ प्रमाणे भारत ही अराजकतेच्या वाटेवर आहे असे बिंबवण्याचे प्रयत्न चालू आहे. जे श्रीलंका, बांग्लादेश आणि नेपाळमध्ये घडले तेच भारतातही घडवण्यासाठी काही मूलतत्ववादी, अतिरेकी, देशद्रोही घटक व येथील पाताळयंत्री राजकारणी उतावीळ असल्याचे दिसते. जागतिक पटलावर भारताचे वाढते वर्चस्व सहन न होणाऱ्या हित शत्रूंचा भारतातही अराजकता माजवून भारताला कुमकुवत करण्याचा डाव आहे मात्र त्यांचा हा डाव यशस्वी होणार नाही कारण भारतातील नागरिक सुज्ञ असून लोकशाही मानणारे आहेत. भारतीय लोकशाही जगातील सुदृढ लोकशाही आहे. कुमकुवत लोकशाही असलेल्या देशातच अराजकता माजत आहे. भारताची लोकशाही कमकुवत नाही तर ती सुदृढ आहे. भारतासारख्या सुदृढ लोकशाही असलेल्या देशात कधीही अराजकता माजू शकत नाही. संविधान हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. अनेक जाती, धर्म, पंथ, भाषा, संस्कृती असूनही आपला देश एकसंध आहे तो केवळ आपल्या संविधानामुळे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळेच आपला देश एकसंध आहे. भारतासोबत स्वातंत्र्य झालेल्या शेजारील देशात अनेकदा उठाव, बंड झाले. काही देशात लोकशाही जाऊन हुकुमशाही आली. काही देशावर लष्कराने ताबा मिळवला आपल्या देशात मात्र अजूनही लोकशाही आहे म्हणजेच लोकांचे राज्य आहे. जोवर या देशात बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान आहे आणि जोवर आपल्या देशात लोकशाही आहे. जोवर देशात लोकशाही आहे तोवर या देशात अराजकता मानणार नाही.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५



