आधार खचल्याने नगर परिषद जलवाहिनी धोक्यात

44

 

 

 

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

– वेळीच उपाययोजना न केल्यासनागरिकांना पाणीपुरवठा बंद पडण्याची शक्यता

 

राजुरा (१७ सप्टेंबर)-राजुरा शहरातील भवानी नाल्याजवळून कोलगावकडून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर गंभीर धोका निर्माण झाला आहे. जलवाहिनीचा आधार देणारा पिल्लर पूर्णपणे खचल्याने संपूर्ण जलवाहिनी झुकली असून ती कोणत्याही क्षणी कोसळू शकते. या धोक्यामुळे राजुरा शहरासह परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने या स्थितीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास हजारो नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार हे स्पष्ट आहे. नगर परिषदेकडून कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली ही जलवाहिनी आज दुर्लक्षामुळे धोक्यात आली आहे. भवानी नाल्यासारख्या नैसर्गिक प्रवाहावर बांधलेले पिल्लर वेळोवेळी तपासले गेले नाहीत, योग्य देखभाल केली गेली नाही, याचा परिणाम आज सर्वांसमोर आहे. नागरी सुविधा देण्यासाठी उभारलेल्या मूलभूत यंत्रणेच्या बाबतीत असा निष्काळजीपणा हा थेट नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणणारा ठरतो. पाणीपुरवठा विस्कळीत झाला, तर रुग्णालये, शाळा, सार्वजनिक ठिकाणे आणि घरगुती जीवन पूर्णपणे ठप्प होणार आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाला ॲक्शन मोड वर काम करावे लागणार आहे.