‘शंका’ हे तर सम्यकत्वाला मलीन करणारे दूषण…

40

 

 

 

जळगाव – जीवनात ‘प्रकृती’, ‘विकृती’ आणि ‘संस्कृती’ या तीन शब्दांची अनुभूती प्रत्येकाने घेतलेली असते. सम्यक दर्शन (समकित) ला मलीन किंवा दूषित करणाऱ्या पाच गोष्टी जैन आगममध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. त्यात शंका, मोह, अहंकार, दुर्बुद्धी आणि आसक्ती यांचा समावेश आहे. त्यात पहिले स्थान शंकेला जाते. “समकिती” या शब्दाला अडथळा आणणाऱ्या दोषांची चर्चा आजच्या धर्मप्रवचनात करण्यात आली. प्रकृती म्हणजे आत्म्याची मूलभूत अवस्था, जी कर्मांच्या प्रभावाने आच्छादित होते. विकृती म्हणजे मोह, राग, द्वेष यामुळे आत्म्याची शुद्धता भ्रष्ट होते. संस्कृती म्हणजे संयम, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र यांचा संगम, जो आत्मशुद्धीचा मार्ग दर्शवतो. गायीचे दूध म्हणजे प्रकृती, त्या दुधात लिंबू किंवा तुरटी टाकणे ही विकृती आणि त्याच दुधापासून विविध प्रकारची मिठाई बनविणे ही संस्कृती असते. अशा सहज सोप्या शब्दात प.पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा. यांनी समजावून सांगितले. यात शंका आणि जिज्ञासा यातील अर्थ देखील समजावून सांगितला. त्यासाठी एक उदाहरणही देण्यात आले. कुठल्यातरी सार्वजनिक कार्यक्रमात सासू व सून दोघीही गेल्या होत्या. घरातील सदस्यांची आपसात चर्चा सुरू होती ‘माझी सून तर मिरची आहे, मुलगा मीठ आहे, मुलगी लापसी तर जावई साखर आहे’ हे ऐकून सून गैरसमज करते. त्यादिवशी ती स्वयंपाकही करत नाही. सासूने स्वयंपाक केलेला असतो, परंतु मिरची-मीठ न टाकता पदार्थ बनवते. त्याचे कारण मुलगा विचारतो, त्यावर ती म्हणते, दररोज आपण लापसी गोड पदार्थ खातो का? दररोजच्या आहारात मिरची-मीठ अनिवार्य असते, तसेच माझी सून व मुलगा माझ्यासाठी अनिवार्य आहेत. सुनेने केलेला गैरसमज, शंका दूर झाल्याने शांती व आनंद प्राप्त होतो. शंका परिवार व समाजात अस्थिरता, अशांती निर्माण करणारी ठरते असेही सांगितले.
सुख असो वा दुःख, कोणत्याही परिस्थितीत समभाव ठेवणे म्हणजे शांती प्राप्त करणे होय. समभाव असणे म्हणजे हाच जन्म नव्हे तर येणारा जन्मही सुधारणा करणारा ठरतो. शिष्य संताकडे मनःशांती कशी मिळते हा प्रश्न घेऊन आला. त्यांनी नगरशेठकडे पाठविले. शेठ आपल्या व्यवसायात व्यस्त आहेत, ते मनःशांती बाबत काय सांगतील हा विचार करत तो निघणार, तोच मुनीम वाईट बातमी घेऊन येतो की आपला माल असलेले जहाज बुडाले, फार मोठे नुकसान झाले. त्यावेळी शेठ यांनी दुःख व्यक्त केले नाही. काही वेळाने जहाज बुडाले, परंतु माल सुरक्षित असल्याने नुकसान टळले हा निरोप मिळतो. या दोन्ही गोष्टींनी त्यांची शांती ढळली नाही. कोणत्याही परिस्थितीत स्थितप्रज्ञ असणे म्हणजे शांती प्राप्त होणे होय, असे प.पू. नीलेशप्रभाजी म.सा. यांनी प्रवचनात सांगितले.

 

 

(शब्दांकन – किशोर कुळकर्णी, मो. 94227 76759)