महात्मा गांधीजींच्या विचारांची आजच्या काळात गरज : सुरेश केसरकर भरत रसाळे, प्रा. श्रीकृष्ण अडसूळ यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

39

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे देश निर्मितीमध्ये खूप मोलाचे योगदान आहे. त्यांच्या पुढाकाराने देशाला स्वातंत्र्य मिळाले. ते नेहमी सर्वसामान्य, उपेक्षित माणसाच्या बाजूचा विचार करत असत. खेड्याकडे चला ही त्यांची खूप महत्त्वाची घोषणा होती. आजच्या काळात महात्मा गांधीजी यांच्या विचाराची अतिशय गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर यांनी केले.
ते महात्मा गांधीजी नवविचारमंच यांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा, सन्मानाचा महात्मा गांधीजी राष्ट्रीय जीवन गौरव आणि राष्ट्रीय सन्मान पुरस्कार वितरण समारंभात राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे बोलत होते.
यावेळी कोल्हापूरमधील ज्येष्ठ पुरोगामी शिक्षक नेते भरत रसाळे आणि गोव्यातील ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत प्रा. श्रीकृष्ण अडसूळ यांना महात्मा गांधीजी राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार देऊन ज्येष्ठ समाजवादी नेते भरत लाटकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. रोख पाच हजार रुपये, गांधी टोपी, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पुरस्काराला उत्तर देताना भरत रसाळे म्हणाले, महात्मा गांधीजी देशाची गरज आहेत. आज गांधी विचारच प्रतिगामी शक्तींना रोखू शकतात. माझा सन्मान हा गांधी विचारांचा सन्मान आहे.
प्रा. श्रीकृष्ण अडसूळ म्हणाले, महात्मा गांधीजींचे विचार ध्येयनिष्ठ होते. सामान्य माणसांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे असे त्यांना वाटत असे. त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळणे हा माझ्या गांधीवादी कुटुंबाचा सन्मान आहे.
प्रकाशक अनिल म्हमाने म्हणाले, गांधी व्यक्ती नसून विचार आहे. गांधी विचारांना कितीही संपवण्याचा प्रयत्न केला तरी ते संपत नसतात. कारण गांधी विचार भारतीयांच्या मनामनात, नसानसास दडलेले आहेत. त्यामुळे गांधी विचार आजही जीवंत आहेत.
ॲड. करुणा विमल, अंतिमा कोल्हापूरकर यांची भाषणे झाली. मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने मराठवाड्यातील पूरग्रस्तांना सत्तर हजार रुपयांचा चेक यावेळी प्रदान करण्यात आला. कवी प्रा. भाऊसाहेब गोसावी लिखित इरी इरी फापरी या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ मान्यवरांच्या हस्ते यावेळी पार पडला.
प्रा. नानासाहेब लिगाडे, विश्वनाथ पाटील, राजेंद्र अहिवळे, काळुराम लांडगे, शंकर पुजारी, श्रीकृष्ण शिंदे, प्रा. संदीप वानखेडे, डॉ. दिगंबर कुलकर्णी, सुखदेव पखाले, दिपक राऊत, सुशांत पाटील, हरीहर खंडारे, सुनंद भामरे, नितीन अहिरे, नरेंद्र पाटील, दशरथ कांबळे, प्रार्थना देसाई, राजाराम खंदारे, डॉ. राजेंद्र नाडेकर, नागनाथ केकान, डॉ. वैशाली गुंजेकर, स्वाती पाटील यांना महात्मा गांधीजी राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रा. टी. के. सरगर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन अभिजीत मासुर्लीकर तर अर्हंत मिणचेकर यांनी आभार मानले.