चिमूरच्या स्मशानभूमीतील कठडे व नदीच्या पुलावरील कठडे चोरट्यांकडून लंपास

110

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9423608179

चिमूर(दि.5ऑक्टोबर):- या काळात चोरी करणारे कोणती वस्तू चोरून नेतील याचा काही नेम नाही. श्रम, कष्ट, मेहनत न करता चोरी करून कसे जगता येईल याचे मार्ग काही लोकांनी शोधले आहेत.

          चिमूर या क्रांतीभूमीतून मोटरसायकल, स्कुटी गाड्या, लोहालोखंड, गिट्टी, रेती, विटा,पैसे व सोने चोरीच्या घटना आतापर्यंत पुष्कळ झालेल्या आहेत. परंतू चिमूरच्या उमा नदीजवळ स्मशानभूमी मासळ रोडवरून नेरीकडे जाणाऱ्या बायपासजवळ बांधण्यात आलेली आहे. इथे मृत व्यक्तीची प्रेते जाळण्याची जी जागा आहे, तिथे लाकडे टाकण्यासाठी लोखंडी कठडे होते तेदेखील चोरट्यांनी चोरून नेले.

      जनतेच्या सोईसुविधेसाठी स्मशानभूमी बांधण्यात आलेली आहे. परंतू मृत व्यक्तीला जाळण्यासाठी असलेले लोखंडी कठडेही चोरट्यांना कमी पडले याचे जनतेत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या दिवसात लोकांना त्रास होवू नये म्हणून स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

          एवढेच नाही तर चिमूरवरून मासळकडे जाणाऱ्या रस्त्यावर उमा नदीवर पुल बांधण्यात आलेला आहे. पुलाच्या वरच्या भागाला लोखंडी पाईपचे कठडे होते की, जेणेकरून पुलावर अपघात झाला तरी वाहने नदीत पडू नये ती सुरक्षित राहावी. परंतू चोरट्यांची नजर इथेही गेली व त्यांनी नदीच्या पुलावरील लोखंडी पाईपही चोरून नेले. अनेक दिवसापासून चिमूरला चोरीच्या घटना पुष्कळ झाल्यात. छोट्या चोऱ्यांची तक्रार कुणीही करीत नाही. परंतू सोने, पैसे, मोटरसायकली, स्कुटी चोरून नेल्याच्या तक्रारी पोलीस स्टेशनला होतात. परंतू अजुनही चोरांचा थांगपत्ता लागत नाही.

        स्मशानभूमी व उमा नदीच्या पुलावरील लोखंडी पाईप ही तर सार्वजनिक सरकारी म्हणजेच जनतेचीही संपत्ती आहे पण याची तक्रार कोण करणार? किमान या बाबीकडे संबंधित विभागाचे लक्ष आहे किंवा नाही कुणास माहित? तात्पर्य असे की,चिमूर गावात आता चोरट्यांची प्रवृत्ती बळावली आहे.