

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.12ऑक्टोबर):-आधुनिक काळात शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे.पाटी आणि पेन्सिलची जागा कंम्प्युटर आणि माऊसने घेतली.वर्गात सुध्दा डिजिटल बोर्ड आले आहेत.कारण, काळ बदलला, तंत्रज्ञान वाढले. पण, तरीही विद्यार्थ्यांच्या मनावर छाप पाडणारी व्यक्ती आजही शिक्षकच आहे. ज्या हाताने अक्षरज्ञान दिलं, त्या हातानेच मूल्यज्ञानही दिलं आहे. म्हणूनच शिक्षक केवळ भविष्य घडवत नाहीत, ते संस्कारांचा वारसा टिकवून ठेवतात. त्यामुळे शिक्षक म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील धडे शिकवणारा व्यक्ती नाही, तर तो विद्यार्थ्यांच्या मनात विचार, विवेक आणि मूल्यांची ज्योत प्रज्वलित करणारा दीपस्तंभ असतो, असे गौरवोद्गार आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी काढले.
शहरातील साई वृंदावन लॉन्स येथे (दिनांक 12 ऑक्टोबर रविवार) रोजी आयोजित आमदार रत्नदीप आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.याप्रसंगी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातंर्गत अनेक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, पदवीधर शिक्षक, गटसाधन व्यक्ती, विषयतज्ज्ञ आणि अंगणवाडी सेविकांना आमदार रत्नदीप आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधून गुंजेगाव आदर्श शिक्षण पॅटर्नचे माजी मुख्याध्यापक तथा ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटराव ढेले यांचे अनुभवी आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झाले.गावखेड्यातल्या मुलांना चांगले संस्कार व शिक्षण देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या शिक्षकांचा हेवा वाटतो. तरीही, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन मुलांना कौशल्यपूर्ण शिक्षण द्या, असेही आवाहन आ.डॉ.गुट्टे यांनी उपस्थित शिक्षकांना केले.
पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, आजच्या काळात ज्ञान मिळवणं सोपे आहे, पण माणूस घडवणे कठीण झाले आहे, आणि हे कठीण काम शिक्षक अतिशय सहजतेने करतात. वर्गातल्या फळ्यावर लिहिलेले अक्षर कदाचित पुसले जाते, पण शिक्षकाने विद्यार्थ्याच्या मनावर उमटवलेली शिकवण आयुष्यभर कोरली जाते. हा प्रभाव कोणत्याही पदवीपेक्षा, पदापेक्षा मोठा आहे. त्यामुळे कोणताही शिक्षक हा केवळ अध्यापन करणारा व्यक्ती नसतो, तर तो समाजाचा निर्माता असतो. एका पिढीच्या विचारांना दिशा देऊन तो पुढील पिढीच्या संस्कारांचा पाया घालतो. म्हणूनच शिक्षण क्षेत्र हे केवळ व्यवसाय नसून एक धर्म, एक कर्तव्य, आणि एक साधना आहे.
शिक्षक म्हणजे एक अदृश्य शिल्पकार. आपण फक्त मूर्ती दिसली की शिल्पकाराला ओळखतो. पण, त्या मूर्तीला आकार देणाऱ्या हातांचे कौतुक बहुधा विसरतो. शिक्षकांचे सुद्धा तसेच काम असतं. प्रत्येक विद्यार्थ्याला हळूहळू घडवत राहणे, त्याला आत्मविश्वास देणं, त्याच्या डोळ्यांमध्ये, मी काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण करणे. त्यामुळे आजचे शिक्षक केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित राहिलेले नाहीत.ते जीवनशास्त्र शिकवतात, संयम आणि सहअस्तित्वाचं अर्थ सांगतात.अनेकदा शिक्षक स्वतःच्या अडचणी बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी धाव घेतात.त्यांच्या या समर्पणाला कोणतेही पारितोषिक किंवा पुरस्कार मोजमाप ठरू शकत नाही. म्हणून आजचा पुरस्कार म्हणजे केवळ एक सन्मान नाही,तर समाजाने आपल्या आधारस्तंभाला दिलेली कृतज्ञतापूर्वक सलामी आहे,असेही आ.डॉ.गुट्टे यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोन्शीकर,गटविकास अधिकारी उदयसिंह सिसोदिया, एकात्मिक बालविकास अधिकारी मधुकर कदम,एकात्मिक बाल विकास अधिकारी मनीषा काळे, पालम गटशिक्षणाधिकारी सुभाष आम्ले, गंगाखेड शिक्षणाधिकारी शशिकांत मुंडे, पूर्णा शिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर यांच्यासह मित्र मंडळाचे जिल्हा संपर्कप्रमुख बालाजी मुंडे सर्व अंगणवाडी सेविका,गटसाधन केंद्र विषयतज्ञ, गटसमन्वयक,प्राथमिक,पदवीधर, माध्यमिक,उच्च माध्यमिक, क्रिडा शिक्षक,केंद्रप्रमुख,शिक्षण विस्तार अधिकारी व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







