Home अमरावती श्री गुरुनानक देवजी आणि श्री गुरुग्रंथसाहिब

श्री गुरुनानक देवजी आणि श्री गुरुग्रंथसाहिब

157

श्री गुरुनानक देवजी हे शिख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले गुरू आहेत. त्यांचा जन्म १४६९ मध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी झाला. श्री गुरुनानक देवजी यांना ५५६ व्या ( प्रकाश गुरपुरबा ) जयंती निमित्त विनम्र अभिवादन ॥

श्री गुरुनानक देवजी यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील तलवंडीया गावात झाला.या गावाला आज ननकाना साहिब म्हणून ओळखले जाते.या गावाचे नाव त्यांच्याच नावावरून ननकाना साहिब असे पडले आहे.त्यांच्या वडिलांचे नाव कल्याण चंद दास बेदी (मेहता काळू जी) आणि आईचे नाव माता तृप्ता देवी होते.

           श्री नानक देवजी लहानपणापासूनच शांत, चिंतनशील आणि आध्यात्मिक विचारांचे होते.त्यांनी बाह्य अंधश्रद्धा आणि कर्मकांडांना विरोध केला.सत्य, सेवा आणि ईश्वराप्रती भक्ती यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांचा विवाह माता सुलखनी यांच्याशी झाला होता. त्यांना श्रीचंद आणि लख्मीचंद असे दोन सुपुत्र होते.

त्यांनी सुमारे १५२१ पर्यंत भारत, अफगाणिस्तान,फारस (इराण) आणि अरब देशांमध्ये प्रवास (उदासियाँ) केला.या प्रवासातून त्यांनी आपल्या उपदेशांचा प्रसार केला.जातीभेद, उच्च-नीच भेद आणि सामाजिक असमानता दूर करण्याचा संदेश त्यांनी दिला. त्यांनी ‘नाम जपना’, ‘किरत करनी’ (प्रामाणिकपणे काम करणे) आणि ‘वंड छकना’ 

(गरजूंना मदत करणे) या तीन मूलभूत तत्त्वांचा उपदेश दिला.

         श्री गुरूनानक देवजी यांनी रचलेली भजने आणि कविता ‘गुरुग्रंथ साहिब’ या शीखांच्या पवित्र धर्मग्रंथात समाविष्ट आहेत.गुरुग्रंथसाहिबची पायाभरणी करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.त्यांच्या उपदेशांना ‘गुरुबानी’ असे म्हटले जाते.ते कबीर आणि सिकंदर लोदी, बाबर,हुमायूं यांच्या समकालीन होते.त्यांच्या जयंतीला ‘गुरुपूरब’ किंवा ‘प्रकाश उत्सव’ म्हणून साजरा केले जाते.हा शिख बांधवांचा अत्यंत पवित्र सण आहे,जो मोठ्या उत्साहात साजरा होतो.गुरुद्वारामध्ये या दिवशी ‘शबद कीर्तन’ आणि विशेष प्रार्थना आयोजित केली जाते.त्यांनी आपल्या शिष्यांसाठी ‘लंगर’ (सामुदायिक स्वयंपाकघर) ही प्रथा सुरू केली.जिथे जात,धर्म न पाहता सर्व लोक एकत्र भोजन करतात.

या प्रथेमुळे सामाजिक समानता आणि बंधुत्वाची भावना वृद्धिंगत होते.अंधश्रद्धा आणि बाह्य प्रदर्शनाऐवजी त्यांनी सत्याला महत्त्व दिले.त्यांनी नेहमीच निष्काम सेवेचे आणि परोपकाराचे महत्त्व पटवून दिले.

त्यांच्या विचारांचा भारतीय समाजावर आणि धर्मावर मोठा प्रभाव पडला आहे.गृहस्थ जीवनात राहूनही परमार्थ साधता येतो,हे त्यांनी सिद्ध केले.त्यांच्या शिकवणी आजही लाखो लोकांसाठी प्रेरणास्रोत आहेत. त्यांचे वास्तव्य असलेले कर्तारपूर (सध्या पाकिस्तानमध्ये आहे.) हे ठिकाण त्यांच्यासाठी पवित्र आहे.श्री गुरुनानक देवजी यांनी दि.२२ सप्टेंबर १५३९ रोजी कर्तारपूर येथे देह ठेवला.त्यांचे समाधी स्थळ गुरुद्वारा दरबार साहिब,कर्तारपूर,पाकिस्तान येथे स्थित आहे.त्यांच्या शिकवणी सर्व मानवजातीसाठी प्रेरक आणि मार्गदर्शक आहेत.

        श्री गुरुनानक देवजी यांच्या शिख धर्माचे तत्त्वज्ञान एकेश्वरवाद,समानता आणि सत्कर्म या मूलभूत सिद्धांतांवर आधारित आहे. हे तत्त्वज्ञान आध्यात्मिक विकास आणि दैनंदिन नैतिक आचरणाची सांगड घालते.त्यांचा मूर्तीपूजा किंवा कर्मकांडावर विश्वास नाही.

 प्रामाणिकपणे जीवन जगण्याचा उपदेश त्यांनी केला.कोणतेही शोषण किंवा फसवणूक न करता प्रामाणिकपणे व परिश्रमपूर्वक आपली उपजीविका केली पाहिजे.या धर्मानुसार भौतिक जीवन आणि व्यक्तिगत मालमत्ता हे आध्यात्मिक ध्येयाच्या आड येत नाहीत परंतु ते नीतिमत्ता आणि सत्कृत्ये यांच्या आधारावर मिळवलेले असावेत.आपल्या कमाईतून गरजूंना मदत करणे आणि निःस्वार्थ सेवा करणे हे महत्त्वाचे मानले आहे.यातून मानवजातीची सेवा करण्याची आणि बंधुत्वाची भावना वाढते. श्री गुरुनानकांनी जातिव्यवस्था, धर्म आणि लिंगावर आधारित भेदभाव पूर्णपणे नाकारला.सर्व मानव संघ या मूल्यांचा त्यांनी प्रचार केला.त्यांनी सर्व मानवांना समान मानले आणि समाजाची अस्मिता जागृत करून समतेची शिकवण दिली.सत्य हे सर्वोच्च सद्गुण आहे पण सत्यपूर्ण जीवन त्याहूनही उच्च आहे,असे श्री गुरुनानक देवजी यांनी सांगितले.सहिष्णुता,दया,करुणा आणि इतरांबद्दल आदर या नैतिक मूल्यांवर त्यांनी भर दिला. मनुष्याने अहंकाराचा त्याग करणे याला महत्त्व दिले.आध्यात्मिक जीवन आणि धार्मिक घरगुती जीवन (ऐहिक जीवन) एकमेकांशी जोडलेले आहे .ते एकमेकांविरुद्ध नाहीत.

श्री गुरुनानक देवांचे तत्त्वज्ञान हे’संत-शिपाई’ (योद्धा संत) या आदर्शाला महत्त्व देते.जिथे व्यक्ती आध्यात्मिक गुणांची जोड धैर्याने कृती करण्याच्या तयारीसह देते.

           शिख धर्माचा पवित्र धर्मग्रंथ असलेल्या श्री गुरुग्रंथ साहिबचे तत्त्वज्ञान हे अनमोल आहे.ते एकता,समानता आणि सत्यपूर्ण जीवनशैली या मूलभूत तत्त्वांवर आधारित आहे. हा ग्रंथ केवळ धार्मिक शिकवण नाही, तर जगभरातील शिखांसाठी शाश्वत गुरू आणि आध्यात्मिक मार्गदर्शक आहे.गुरुग्रंथसाहिबचे प्रमुख तत्त्वज्ञान एक ओंकार अर्थात ईश्वर एक आहे म्हणजे एकेश्वरवादी आहे.ईश्वर एक, सर्वव्यापी,अमर,निराकार,भीती आणि द्वेषापासून मुक्त आणि स्वयंभू आहे.तो सृष्टीचा निर्माता (‘करतार पुरख’) आहे.

         मानवतेची समानता आणि बंधुता अर्थात हा ग्रंथ सर्व मानवजातीची समानता घोषित करतो.जात,पंथ,धर्म,लिंग किंवा सामाजिक दर्जा यावर आधारित कोणताही भेदभाव पूर्णपणे नाकारला जातो.”सर्व मानवजातीला एक माना” हा उपदेश याच तत्त्वज्ञानाचा भाग आहे.गुरुसाहिब ग्रंथात सत्य सर्वात श्रेष्ठ आहे परंतु सत्यपूर्ण जीवन त्याहूनही श्रेष्ठ आहे.केवळ धार्मिक विधी करण्याऐवजी प्रामाणिकपणे जीवन जगणे (किरत करनी) आणि मानवतेची नि:स्वार्थ सेवा करणे (वंड छकना – वाटून घेणे/सेवा करणे) यावर भर दिलेला आहे. शिख धर्माचे तत्त्वज्ञान गृहस्थाश्रमाचे समर्थन करते आणि संन्यास किंवा कर्मकांडांचे खंडन करते. गुरुग्रंथसाहिब गुरुचे महत्त्व अधोरेखित करते.गुरू हा शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ईश्वराच्या मार्गावर नेणारा – सत्याच्या मार्गावर नेणारा आध्यात्मिक मार्गदर्शक आहे.

           दहावे गुरू गोविंद सिंग यांनी ‘गुरुग्रंथसाहिब’ या ग्रंथालाच अंतिम आणि शाश्वत गुरू म्हणून घोषित केले,ज्यामुळे हा ग्रंथ शिखांसाठी देहधारी गुरू मानला जातो.या पवित्र ग्रंथात केवळ शिख गुरूंच्याच रचना नाहीत तर संत कबीर,संत नामदेव,संत गुरू रविदास,शेख फरीद अशा विविध हिंदू आणि मुस्लिम संतांच्या रचनांचाही समावेश आहेत.यामुळे हा ग्रंथ सर्वसमावेशक आणि जागतिक संदेश देतो,जो विविध पार्श्वभूमीच्या लोकांना एकत्र आणतो.गुरुग्रंथसाहिबचे तत्त्वज्ञान सत्य,प्रेम,नम्रता आणि मानवतेची सेवा या मूल्यांवर आधारित अर्थपूर्ण आणि नैतिक जीवन जगण्याचे मार्गदर्शन करते.श्री गुरुनानक देवजी यांना यांच्या आज कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी असलेल्या ५५६ व्या ( प्रकाश गुरपुरबा ) जयंती निमित्त विनम्र अभिवादन ॥

✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)मो:-८०८७७४८६०९