Home चंद्रपूर ….आता पशुधनाच्या नुकसानीचीही भरपाई ‘तुरंत’मिळणार?-आमदार बंटी भांगडिया व मुख्य वनसंरक्षक रामानुजम यांच्या...

….आता पशुधनाच्या नुकसानीचीही भरपाई ‘तुरंत’मिळणार?-आमदार बंटी भांगडिया व मुख्य वनसंरक्षक रामानुजम यांच्या उपस्थितीत बैठकीत निर्णय

153

▪️वनकर्मचाऱ्यांची गस्त, चावडी चर्चा, सीसीटीव्ही व कंपाउंडिंगचा निर्णय

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.8नोव्हेंबर):चिमूर तालुक्यात सध्या वाघ-मानव संघर्ष तीव्र झाला असून अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागला तर पशुधनावरही वाघाचा ताव बसला आहे. आतापर्यंत जीवितहानीस भरपाई दिली जात असली, तरी पशुधनाच्या नुकसानीवर तात्काळ मदत मिळत नव्हती. आता या नुकसानीची भरपाई ‘तुरंत’ देण्यात येणार असल्याने पशुपालकांना दिलासा मिळणार आहे.

शुक्रवारी आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्या उपस्थितीत मुख्य वनसंरक्षक रामानुजम यांच्या सोबत झालेल्या सभेत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या शंकरपूर, आंबोली, शिवरा,चिचाळा शास्त्री, आंबोली, मासळ, तुकूम, सातारा, बामणगाव,कोलारा, टेकेपार या गावांमध्ये वाघाने धुमाकूळ घातला आहे. अनेक शेतकऱ्यांचे पशुधन ठार झाले असून नागरिकांचा वनविभागावरील संताप रस्त्यावर आला आहे.

या पार्श्वभूमीवर मदनापूर येथे घेतलेल्या बैठकीत वाघाचे हमले विशिष्ट भागात होत असल्याने त्या गावांना तार कंपाउंडने संरक्षित करण्याचा, तसेच वनकर्मचाऱ्यांनी गस्त वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

गावकऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी ‘चावडी चर्चा’ उपक्रम सुरू करण्यात येईल. वाघ अचानक दिसल्यास काय करावे, कसे वागावे याचे मार्गदर्शन वन अधिकारी देतील, असे ठरले.

या बैठकीस प्रादेशिकचे डीएफओ डॉ. कल्याणकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे, ठाणेदार दिनेश लबडे, वनपारिशेत्र अधिकारी योगिता मडावी, तसेच भाजप पदाधिकारी राजू देवतळे, मनीष तुम्पल्लीवर, कमल असावा, गजानन गुळधे, शंकरपूरचे प्रफुल कोलते, खडसंगीचे प्रमोद श्रीरामे, भिसीचे घनशाम डुकरे, मासळ विभागाचे प्रवीण गणोरकर, चिचाळा शास्त्री चे अरविंद राऊत, मनिष नाईक, प्रशांत चिडे, बंटी वनकर, कलीम शेख, अरविंद बावणकर, राकेश शेरकी व वन्यजीवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

————————

चिमूर बैठकीतील ठळक निर्णय

पशुधनाच्या नुकसानीची भरपाई ‘तुरंत’ देण्याचा निर्णय

जंगलालगतच्या गावात तार कंपाउंड उभारले जाणार

३० नवीन एसटीपीएफ कॅम्प स्थापन करून गस्त वाढविणे

रोजंदारी कर्मचारी गस्त करून फटाके फोडून वाघाला दूर ठेवतील

सीसीएफ यांना वाघ जेरबंद करण्याचे अधिकार देण्याचा प्रस्ताव.

गावागावात वनपाटील नेमणूक

जंगलातील गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत.

वनविभागाचे हे निर्णय केवळ बैठकीपुरते न राहता प्रत्यक्षात अंमलात आले, तरच ‘वाघ वाचवा, पण माणूसही जगू द्या’ हा तोल राखला जाईल.