

पंडित नेहरू । आज जन्मदिन ।
करांनी वंदन । कोटी कोटी ॥
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १८८९ सालातील नोव्हेंबर मासाच्या १४ तारखेला अलाहाबाद (प्रयागराज), उत्तर प्रदेश येथे झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे नामांकित वकील आणि राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते. त्यांच्या आईचे नाव स्वरूपराणी नेहरू होते. नेहरूंनी प्राथमिक शिक्षण घरी खासगी शिक्षकांकडून घेतले. वयाच्या १५ व्या वर्षी ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. त्यांनी हॅरो येथे शिक्षण घेतले आणि नंतर केंब्रिज विद्यापीठातून नैसर्गिक विज्ञानात पदवी प्राप्त केली. ते सन : १९१२ मध्ये बॅरिस्टरची पदवी घेऊन भारतात परतले. भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरुवात केली, पण त्यांचे मन राजकारणात रमले. दि.७ फेब्रुवारी १९१६ रोजी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी झाला. त्यांना इंदिरा प्रियदर्शिनी (इंदिरा गांधी) नावाची एक कन्या होती, जी नंतर भारताची पंतप्रधान झाली.
सन : १९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्या विचारांनी खूप प्रभावित झाले. त्यांनी आपल्या कुटुंबाची संपत्ती आणि विदेशी वस्तूंचा त्याग करून स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली आणि खादी स्वीकारली. ते होम रुल लीग, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग व भारत छोडो आंदोलनात सक्रीय सहभागी होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांना अनेकवेळा तुरुंगवास भोगावा लागला.
सन : १९२९ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष बनले. याच अधिवेशनात काँग्रेसने ‘पूर्ण स्वराज्या’चे ध्येय निश्चित केले. दि.७ ऑगस्ट १९४२ ला
त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात ‘भारत छोडो’ची क्रांतिकारी घोषणा केली. अहमदनगर किल्ल्यातील तुरुंगवासात असताना त्यांनी प्रसिद्ध ग्रंथ ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ .(भारताचा शोध) लिहिला. याच ग्रंथावर दूरदर्शन मालिका तयार केली होती, ती सर्वांनाच आवडली होती हे विशेष.
पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एकूण ९ वेळा तुरुंगवास भोगावा लागला, ज्यात सर्वात मोठा आणि शेवटचा तुरुंगवास अहमदनगर जिल्ह्यात होता.
दि.१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र्य मिळाल्यावर ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनले. त्यांनी १९४७ पासून १९६४ पर्यंत १७ वर्षे पंतप्रधान असताना देशाची सेवा केली. त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ म्हणून ओळखले जाते.पंडित नेहरूंनी लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. भारताच्या पंचवार्षिक योजना आणि अनेक मोठ्या औद्योगिक व वैज्ञानिक संस्थांच्या स्थापनेत त्यांचे फार मोठे योगदान आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी अलिप्ततावादी चळवळीचे नेतृत्व केले .
पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले खूप आवडत असल्याने, त्यांना प्रेमाने ‘चाचा नेहरू’ म्हणून ओळखले जाते.
त्यांचा जन्मदिन १४ नोव्हेंबर हा देशभरात ‘बालकदिन’ म्हणून साजरा केला जातो.त्यांच्या मते, मुले देशाचे भविष्य आहेत आणि त्यांना योग्य शिक्षण व प्रेम मिळाले पाहिजे. आज बालकदिनी शाळा आणि विविध संस्थांमध्ये मुलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मुले या कार्यक्रमांमध्ये खूप उत्साहाने भाग घेऊन आनंदित होतात.
बालकदिन हा मुलांचे हक्क, काळजी आणि शिक्षण याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा दिवस आहे. हा दिवस मुलांना त्यांच्या बालपणाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि विशेष अनुभव देण्यासाठी समर्पित आहे. बालकदिनाच्या माध्यमातून पंडित नेहरूंचे बालप्रेम आणि देशाच्या भविष्यासाठी त्यांचे महत्त्व याचे नेहमी स्मरण केले जाते. बालकदिनी बालकांना विविध प्रकारचे मार्गदर्शन करून त्यांच्यात जागृती निर्माण केली पाहिजे. बालसंस्कार व बाल जीवनावर बोलणाऱ्या वक्त्यांना निमंत्रित करून बालकदिनी असलेल्या कार्यक्रमांमध्ये बालकांना योग्य ते मार्गदर्शन केले पाहिजे. उदा. चांगल्या मूल्यांची जोपासना, आदर आणि नम्रता, घरातील मोठ्यांचा,
शिक्षकांचा आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीचा आदर करणे.’धन्यवाद’ आणि ‘सॉरी’ यांसारख्या शब्दांचा उपयोग नेहमी करणे, नेहमी खरे बोलणे व प्रामाणिकपणा हे सर्वात महत्त्वाचे मूल्य बालकांना शिकविले पाहिजे. गरजूंना मदत करा आणि इतरांबद्दल सहानुभूती ठेवा.शिक्षण हे बालकांच्यां उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे. मन लावून अभ्यास करा आणि रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा.नियमितपणे पुस्तके वाचा.पालकांनी आपल्या बालकांना बालवाङ् मय ,थोर पुरुषांची गोष्टी रूप चरित्रे असलेली पुस्तके वाचायला दिली पाहिजे. मनात येणारे प्रश्न बालकांनी विचारले पाहिजे आणि जगाबद्दलचे बालकांच्या मनातील कुतूहल जिवंत ठेवले पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे अर्थात विविध प्रकारचे खेळ खळून शारीरिकदृष्ट्या सक्रीय राहिले पाहिजे.
यासाठी मोबाईल पासून व दूरदर्शन पासून बालकांना दूर ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे दोन गोष्टी साध्य होतील. बालकांचे डोळे निरोगी राहतील आणि शरीरही निरोगी राहील आणि अभ्यासाला वेळ मिळाल्यामुळे त्याची वर्गात हुशार विद्यार्थ्यां मध्ये गणना होईल. बालकांना जंक फूड टाळून पौष्टिक आहार घेणे शिकविले पाहिजे. इंटरनेट वापरताना अनोळखी लोकांशी बोलणे टाळावे. कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा फोटो कोणाशीही शेअर करू नका हे बालकाला सांगितले पाहिजे. काही चुकीचे वाटल्यास बालकांनी लगेच पालकांना किंवा शिक्षकांना सांगितले पाहिजे.स्वतःच्या कामांच्या जबाबदारीची जाणीव बालकांना पालकांनी करून दिली पाहिजे . त्यांचे दप्तर, त्यांचे कपडे आणि त्यांच्या वस्तूंची काळजी कशी घ्यावी हे बालकांना शिकविले पाहिजे.झाडे लावा, पाणी जपून वापरा आणि परिसरातील स्वच्छता राखा. या सर्व गोष्टी बालकांना लहानपणी शिकविल्या गेल्या तर ते तशा प्रकारचे वर्तन पुढील जीवनात करतील व इतरांना सुद्धा अशाच प्रकारचे मार्गदर्शन करतील.
पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे की ‘मुले बागेतील कळीप्रमाणे आहेत आणि देशाचे भविष्य आहेत’. हे लक्षात ठेवा आणि देशाचे चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला भविष्यात काय व्हायचे आहे याची मोठी स्वप्ने बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर बौद्धिक आणि शारीरिक परिश्रम करा.तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा.कोणतीही गोष्ट अशक्य नाही.प्रयत्न करत राहिल्यास यश नक्की मिळते.बालक दिन हा आनंदाचा,शिक्षणाचा आणि हक्कांचा दिवस आहे. तुम्ही आनंदी रहा आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
अशा या बालकांवर आणि भारतावर प्रेम करणाऱ्या पंडित नेहरू यांना सन : १९५५ मध्ये भारताचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करण्यात आले.दि.२७ मे १९६४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले;तेव्हा संपूर्ण भारत दुःख सागरात बुडाला होता.असे बालकांवर आणि भारतावर मनापासून प्रेम करणारे आधुनिक भारताचे शिल्पकार माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना १३६ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ॥ आणि बालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ॥
बालक दिनाच्या । हार्दिक शुभेच्छा ॥
मनस्वी सदिच्छा । सर्वांनाच ॥

✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)मो:-८०८७७४८६०९







