Home नागपूर शिक्षणावर भाष्य करणाऱ्या तत्ववेत्या सावित्रीमाई!

शिक्षणावर भाष्य करणाऱ्या तत्ववेत्या सावित्रीमाई!

166

✒️प्रभाकर सोमकुवर(नागपूर)मो:-९५९५२५५९५२

      हजारो वर्षापासून मनुवादी विचार सरणीचे समाजातील भट भिक्षुक वर्ग शुद्र अति शुद्रांवर धर्माच्या नावाखाली अनेक जाचक प्रकारचे निबंध लादून त्यांचे शोषण करीत होते. त्यांनी निर्माण केलेली चातुवण्यांची चौकट म्हणजे शुद्र अतिशुद्र जातीच्या लोकांच्या गळयाभोवती आवळलेला पाश होता. फक्त मृत्युच त्यातुन सुटका करु शकत होता, एवढी भयानक शोषण प्रणाली त्यावेळी अस्तित्वात होती. अशा शोषणाविरुध्द व बुरसटलेल्या विचारांना मुठमाती देण्यासाठी आवाज बुलंद करुन बेडरपणे महात्मा फुलेंनी बंडाचे हत्यार उपसले, आक्रमक झाले. दिर्घकाळाच्या शोषणाने त्यांच्यावर एक प्रकारची सामाजिक व मानसिक गुलामगिरी लादलेली होती. मनुने स्त्रियांना शिक्षणास मज्जाव केला होता. त्यातुन हिंदु समाजातील स्त्रियांही सुटल्या नव्हत्या.

       समाज परिवर्तनाचे व्रत घेऊन विलक्षण बुध्दी चातुर्याने व धैर्यान दांभिक समाजाविरुध्द लढणाऱ्या आघाडीची शिलेदार म्हणून धुरा सांभाळणारी सावित्रीबाई फुले ही महाराष्ट्राच्या संक्रमण काळातील पहिलीच भारतीय महिला. पहिली शिक्षिका, पहिली समाजसेविका, ज्यांनी निद्विस्त समाजाला चेतवून गुलामगिरी विरुध्द बंड करुन उठायचे व गुलामगिरी राबविणारे त्यावेळचे सनातनवादी ब्राम्हण व त्यांनी निर्मिलेल्या धर्मग्रंथावर कठोर प्रहार करण्याचे ठरविले आणि नेमके तेच त्यांनी केले. त्यांचा लढा ब्राम्हण जाती विरुध्द किंवा धर्माच्या शाश्वत मुल्यांविरुध्द नव्हता तर ब्राम्हणवाद व त्याचा पुरस्कार करणा-या धर्मग्रंथाविरुध्द होता. स्त्रियांना व शुद्रांना विद्या नाकारणाऱ्या दृष्टप्रवृत्ती विरुध्द होता. कुणालाही न जुमानता अविरत सुरु होता. सावित्रीबाई या केवळ पाटया टाकणाऱ्या शिक्षिका नव्हत्या तर शिक्षणावर भाष्य करणाऱ्या तत्ववेत्या होत्या. शिक्षणाचे मोल व महत्व साध्या व सोप्या पध्दतीने त्यांनी सांगितले होते.

       भारतीय समाज व्यवस्था चातुवर्ण्य व जातीमध्ये विभक्त झाली होती. ब्राम्हणांचे वर्चस्व आणि त्याच बरोबर होम-हवन, पूजा-पाठ मंत्र-तंत्र त्यामुळे भारतीयांची हिनकस अंधश्रध्दा मोठ्या प्रमाणात वाढली होती, तशी ती आजही फोफावत आहे. असोत विषमतेचे दृष्टिकरण झाले होते. विशिष्ट वर्णाची, वर्गाची मक्तेदारी ज्ञानाच्या क्षेत्रात बळकट झाली होती. तिला पोखरुन काढणे हा प्रणच त्यांनी स्वीकारलेला होता. या धाडसीवृत्तीमुळेच त्यांनी चंग बांधला व पुण्यातील बुधवारपेठेत भिडयांच्या वाडयात सनातनी, ब्राम्हणाच्या बालेकिल्यात 8 मुलीच्या प्रवेशांनी पहिली शाळा सुरु करुन भारतातील नव्या युगाचा प्रारंभ केला. स्वी व शुद्रांतिशुद्रांना शिक्षण देणे व सत्यशोधक चळवळीचा प्रचार व प्रसार आपल्या अंगी असलेल्या भाषा प्रभुत्वाने व विध्वतेने करुन गोरगरीबांना व रसातळातील जनतेला वर कसे आणायचे, हाच संकल्प क्रांतीसूर्य ज्योतीबा, धैर्यशील क्रांती ज्योती सावित्रीबाईनी मनात रुजविला होता. “विद्यादान” या आपल्या विचार प्रवर्तक निबंधात सावित्रीबाई म्हणतात- आळस, परावलंबन इत्यादि दुर्गुण न वाढविण्यास व मनुष्याच्या अंगचे सदगुण वाढण्यास असा जर कोणता धर्म असेल तर तो विद्यादान होय. विद्या देणारा व विद्या घेणारा असे दोघेही धर्माच्या योगाने खरीखुरी सुज्ञ माणसे बनतात. त्यामुळे मनुष्यातील पशुत्वाचा लोप होतो. विद्या देणारा धैर्यशील, निर्भय बनून विद्या घेणारा सामर्थ्यशाली व शहाणा बनतो. शुद्रानिशुद्रांबद्दल कळवळा व शिक्षणाविषयी प्रेम या व्यतिरिक्त अनेक अलौकिक गुणांचा चतुस्व संगम सावित्री फुले यांच्या व्यक्तिमत्वात ठासून भरलेला होता.

       भाषा चातुर्य, धैर्यता, सेवावृत्ती व सोबतच अलौकिक प्रतिमेची देणगी ही सावित्रीबाईना लाभलेली होती. “काव्यफुले” हा कवितासंग्रह प्रकाशित करुन त्यांनी आपल्या प्रगल्भ प्रतिभा संपन्नतेची साक्ष पटवून दिली. “बालकांना सदुपदेश” या कवितेत त्या उपदेश करतात. “प्रातःकाळी करी बाळा शौचादी, मुरवमार्जन होऊनीया शुचिभुत, बंदु माता पिता जन, विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहून, तिचा साठा जयापाशी तो ज्ञानी मानती जन. क्षणानंतरचे काम या क्षणी कर ठोकुन, झाले हो काम की नाही व पुसे मृत्यु कारण” सावित्रीबाई भारतातील बहुजन समाजातीलच नव्हे तर अभिजन समाजातील प्रथम स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून ठरल्या गेल्या. त्यामुळे सनातन्यांनी कलीयुग आले, धर्म बुडाला, कली मातला असा हल-कल्लोळ करावयास सुरवात केली. तरीही त्यांनी धीर सोडला नाही कोणत्याही चांगल्या कार्याची प्रथम उपेक्षा, अवहेलना होते नंतर त्याबद्दल कुतुहल निर्माण होते व शेवटी त्याचा स्वीकार होतो, तसेच या कार्याचे झाले.

        ख्रिस्ती मिशनऱ्या पेक्षा एनदेशियांची शाळा बरी असे लोकांना वाटले रोडावलेली संख्या पुन्हा वाढली. वाढता प्रतिसाद बघता बघता पुणे व आसपासच्या परिसरात 18 शाळा काढल्या. शाळा काढतांना अनंत अडचणी, सामाजिक प्रतिकुलता, आर्थिक चणचण, अशा सर्व संकटावर मात करुन त्याकाळी त्यांनी या शाळा नेटाने चालविल्याचे देशातील एकमेव उदाहरण होय. आव्हानांमुळे आयुष्य रंजक बनते, तर ती पेलल्यानंतर अर्थपूर्ण.

         या सर्व शाळा सुरु करणे, त्यामध्ये मुला-मुलींना आणण्याचे काम करणे, आलेल्यांना शाळेत टिकवून धरणे आणि शाळांसाठी शिक्षक शिक्षिका मिळवणे ही कामे अतिशय जिकरीची व अवघड होती. या क्रांती कार्यात मातृवत असणाऱ्या सगुणाबाई क्षिरसागर व ज्योतीबांचे जीवलग मित्र उस्मान शेख यांच्या भगिनी ज्ञानज्योती फातीमा शेख त्यांनी मोलाची मदत केली. या दोघींचे अध्यापन कार्य सर्व दृष्टीने उठावदार व गुणवत्तापूर्ण असे एक स्त्री म्हणुन ऐन तारुण्यात सनातनाच्या वस्तीत शिक्षिका म्हणून काम करतांना त्यांचा जो माणुसकीला काळीमा फासणारा छळ झाला, जी विटंबना झाली, आणि तरीही त्यांनी आपले स्विकृत कार्य धैर्याने, जिद्दीने, कळकळीने व कौशल्याने केले त्यास जगाच्या इतिहासात तोड नाही.

        “शिक्षण” या कवितेतुन प्रकट झालेला विचार हा तेवढाच मौल्यवान आहे. शुद्रांना सांगण्या जोगा आहे. शिक्षण मार्ग हा शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हाटते पहा, शुद्र आणि अतिशुद्र अज्ञानाने पछाडले. आपल्या स्वार्थासाठी विषम समाज रचना करणाऱ्या धुर्त धर्म पंडित व सनातन्याचा धिक्कार करतांना त्या म्हणतात विषम समाज रचती समाजाची रीती, धुर्ताची ही निती, अमानव, इतिहासाकडे उघड्या डोळयांनी बघून त्यापासुन बोध घेवूनच आपण आपल्या मार्गाची दिशा ठरवावी. नाहीतर आपण, गुलामगिरीतून बाहेर पडणार नाही. या विचाराने त्यांनी देशाचा प्राचीन मध्यमयुगान कालखंडाचा इतिहास सांगून पेशवे कालीन किडल्या सडल्या समाजाचे विदारक चित्रण काव्यरुपात वर्णीले आहे. पेशवाईतील समाजस्थिती व स्त्रीवर्गाच्या परिस्थितीचे वर्णन करतांना त्या म्हणतात पुढे पेशवाईने राज्य केले, अनचार देखी, अतिशुद्र भ्याले. स्वंधुकी थुकाया मडके गळी ते, खुणा पुसाया ढुंगणी झाप होई.

        स्वार्थी मानवाने स्वतःचे स्वरुप व्यक्त करण्यासाठी त्यायोगे आपले व आपल्या वंशाचे हित व्हावे म्हणून निर्माण केलेले पाखंडी तत्वज्ञान आहे. दुसऱ्या मानवांस अस्पृश्य मानने हे मनुष्यत्वाचे लक्षण नाही. म्हणुन अस्पृश्यतेचा प्रत्येक व्यक्तिने धिक्कार करण्यातच व्यक्तिचे, समाजाचे व मानवी संस्कृतीचे परमकल्याण आहे. समाजक्रांतीचा वृक्ष फुलांफळांनी बहरलेला बघायचा असेल तर ज्योतीबांच्या विचारांना नष्ट होऊ देता कामा नये त्या विचाराचे जतन करुन त्याचा प्रचार व प्रसार करायला पाहिजे असे आपल्या ओजस्वी भाषणांत सावित्रीबाई सांगत असत. क्रांतीज्योती सावित्रीमाईस १९५ व्या जयंती निमित्त मानाचा मुजरा !!