Home चंद्रपूर धम्म क्रांतीसाठी विहारांचे सशक्तीकरण ही काळाची गरज – अँड.भूपेश पाटील

धम्म क्रांतीसाठी विहारांचे सशक्तीकरण ही काळाची गरज – अँड.भूपेश पाटील

101

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमूर(दि.30जानेवारी):- १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दीक्षेच्या सोहळ्यात जे भाषण दिलं त्यावरून सम्राट अशोक आदर्श बुद्ध विहार स्पर्धेची संकल्पना सुचली. १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला धम्म योग्य रीतीने चालला पाहिजे यासाठी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाची निर्मिती केली. त्यांनी बौद्ध बनण्यासाठी तीन महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या होत्या.परंतू आपण त्याकडे दुर्लक्ष केले.आपण फक्त राजकारण केलं. आपण धम्मासाठी वेळ दिला असता तर प्रत्येक गावचं बौद्ध विहार सशक्त झालं असतं. बाबासाहेबांनी लिहून ठेवलेले ग्रंथ बुद्ध विहारांतून वाचली गेली तरच सामाजिक बदल होतील. त्यातून आर्थिक, राजकीय बदल होतील. बौद्धांच्या सर्वांगिण विकासासाठी गावातील बुद्ध विहारांचं सशक्तीकरण करावं लागेल. बाबासाहेबांनी विहारांसाठी जे स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नातील विहारे निर्माण झाली तरच सशक्त बौद्ध निर्माण होतील,असे प्रतिपादन वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड. भूपेश पाटील यांनी केले.वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या चक्रवर्ती सम्राट अशोक आदर्श बुद्ध विहार स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ येथील मिलन सभागृहात संपन्न झाला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी चिमूरच्या नगराध्यक्षा गीता लिंगायत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पारशिवनीचे नगराध्यक्ष दीपक शिवरकर,राहुल घुसे, अँड. भूपेश पाटील, डॉ. सीमा पाटील,पराग अंबादे उपस्थित होते.राज्याचे न्याय व विधी राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले नगराध्यक्ष दीपक शिवरकर यांना तालुक्यातील बुद्ध विहार समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सचिवालयाने बिहार सरकारच्या सचिवलयाला प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.नगराध्यक्ष गीता लिंगायत, दीपक शिवरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चिमूर तालुक्यातील ९५ बुद्ध विहारांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.स्पर्धेत सहभागी सर्व बुद्ध विहारांना २२ प्रतिज्ञाचे फलक भेट देण्यात आले.या स्पर्धेत प्रथम क्रमांक

दीपंकर बुद्ध विहार नेरीने प्राप्त केला.संगणक संच,२२ प्रतिज्ञा फलक,सन्मानपत्र देऊन या बुद्ध विहाराचा गौरव करण्यात आला. धम्मपाल बुद्ध विहार पिपर्डा आणि बुद्ध विहार शिवणपायली यांना प्रत्येकी ५००० रुपयांचा धनादेश,२२ प्रतिज्ञा फलक,सन्मानपत्र असा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार विभागून देण्यात आला.जेतवन बुद्ध विहार विहीरगाव आणि लूंबिनी बुद्ध विहार चिमूर यांना ग्रंथ संच,२२ प्रतिज्ञा फलक, सन्मानपत्र असा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार विभागून देण्यात आला.बुद्ध विहारातील विशेष उपक्रमांसाठी विशेष पुरस्कार देण्यात आले. यात प्रामुख्याने अंगुलीमाल स्वाभिमानी संकल्प प्रेरणा पुरस्कार सम्यक पंचशील बुद्ध विहार भिसी,जेतवन बुद्‌ध विहार विहिरगांव,धम्मपाल बुद्ध विहार पिपर्डा यांना देण्यात आला.माता रमाई महिला स्वयंसिद्‌धा पुरस्कार अरहंत अंगुलीमाल बुद्ध विहार पुयारदंड,महामुनी बुद्ध विहार नेरी यांना सांची स्तूप प्रतिकृती प्रेरणा पुरस्कार मैत्रेय बुद्ध विहार भिसी,धम्मपाल बुद्ध विहार पिपर्डा, जेतवन बुद्ध विहार विहिरगांव यांना राजगृह प्रेरणा पुरस्कार महाबोधी बुद्ध विहार गुजगव्हाण यांना संकल्प प्रेरणा पुरस्कार परिवर्तन बुद्ध विहार वडसी यांना देण्यात आला.

त्रैमासिक तपोभूमीच्या वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान कार्य गौरव विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

समारंभाचे प्रास्ताविक, संचालन वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे सचिव सुरेश डांगे यांनी केले. आभार रामदास कामडी यांनी मानले. समारंभाला बुद्ध विहार पदाधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.