

समाजात एखादी व्यक्ती, संस्था किंवा विचारधारा शांतपणे, न बोलता आपले काम करत असते तो पर्यंत ती फारशी कुणाच्या नजरेत येत नाही. पण ज्या क्षणी त्या कामाचा परिणाम दिसू लागतो, लोकांच्या जीवनात बदल घडू लागतो, प्रश्न विचारले जाऊ लागतात, तेव्हा त्या प्रभावाची पहिली किंमत द्यावी लागते बदनामीच्या स्वरूपात. कारण प्रभाव हा केवळ प्रगतीचा सूचक नसतो; तो विद्यमान सत्ताकेंद्रांना, सोयीस्कर व्यवस्थेला आणि जडलेल्या हितसंबंधांना दिलेला थेट आव्हान असतो. इतिहास साक्षी आहे, प्रभावी माणसाची बदनामी ही अपघात नसून नियोजनबद्ध प्रक्रिया असते, कारण प्रभाव म्हणजे अस्वस्थ करणारी जाणीव. प्रभावी व्यक्ती किंवा विचार समाजाला अस्वस्थ करतो. तो लोकांना प्रश्न विचारायला शिकवतो, स्वीकारलेली गुलामी नाकारायला भाग पाडतो, आणि “हे असेच का?” असा मूलभूत प्रश्न उभा करतो. ही अस्वस्थता अनेकांना नकोशी असते. कारण प्रश्न विचारणारा समाज म्हणजे हुकूमशाही, अन्याय आणि शोषणासाठी धोक्याची घंटा. म्हणूनच ज्या क्षणी तुमचा प्रभाव वाढू लागतो, त्या क्षणी तुमच्याविरोधात संशय निर्माण केला जातो, तुमच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उभे केले जाते, आणि हळूहळू तुमची प्रतिमा मलिन करण्याचे उद्योग सुरू होतात.
आजच्या काळात बदनामी ही तलवारीसारखी समोरून चाल करून येत नाही; ती विषासारखी हळूहळू शरीरात भिनते. कुजबुज, अफवा, अर्धसत्य, अतिशयोक्ती, जुने संदर्भ तोडून मांडणे ही बदनामीची आधुनिक हत्यारे आहेत. सोशल मीडियाच्या युगात तर बदनामीला वेग आणि व्याप्ती दोन्ही मिळाले आहेत. एका क्लिकवर तुमच्यावर आरोप, एका पोस्टवर तुमचा चारित्र्यहनन, आणि एका व्हिडिओत तुमच्या संपूर्ण कार्याचा अपलाप. सत्य तपासण्याची तसदी न घेता लोक निर्णय देतात. कारण सत्य शोधणे मेहनतीचे काम आहे, तर बदनामी स्वीकारणे सोपे. नेमकी प्रभावी माणसेच लक्ष्य कां होतात? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. समाजात अनेक चुकीच्या गोष्टी घडत असतात, अनेक भ्रष्ट, अपयशी, अनैतिक लोक वावरत असतात, पण त्यांच्यावर फारशी टीका होत नाही. मग बोट का रोखले जाते ते नेहमी काम करणाऱ्यांवरच? कारण निष्क्रिय माणूस कुणाचाच शत्रू नसतो. तो व्यवस्थेला धोका नसतो. पण प्रभावी व्यक्ती ही व्यवस्थेच्या कमतरतांचा आरसा दाखवते. ती सांगते “हे शक्य आहे, बदल होऊ शकतो.” आणि ही शक्यता अनेकांच्या स्वार्थाला घातक ठरते. म्हणूनच बदनामीचा हेतू एकच असतो, विश्वास तोडणे. लोकांचा विश्वास ढळला, की प्रभाव आपोआप कमी होतो. काम कितीही चांगले असले, तरी संशयाची सावली पडली की समाज मागे सरकतो. इतिहासातील प्रत्येक परिवर्तनाची हीच कथा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर असोत, महात्मा गांधी असोत, महात्मा फुले असोत किंवा आधुनिक काळातील कोणताही समाज परिवर्तनवादी, प्रत्येकाच्या वाट्याला बदनामी आलीच. कुणाला देशद्रोही ठरवले गेले, कुणाला धर्मविरोधी, कुणाला समाजविघातक, तर कुणाला सत्तालोलुप.
परंतु इतिहासाने एक गोष्ट स्पष्ट केली, बदनामी क्षणिक असते, प्रभाव टिकून राहतो. कारण बदनामी शब्दांवर उभी असते, तर प्रभाव कृतींवर. बदनामी ही अपयशाची कबुली असते. जेव्हा तुमच्या विचारांना तर्काने, तुमच्या कामाला पर्यायाने, आणि तुमच्या प्रश्नांना उत्तराने पराभूत करता येत नाही, तेव्हा शेवटचा उपाय म्हणजे व्यक्तीवर हल्ला. हा हल्ला म्हणजेच बदनामी. म्हणजेच बदनामी ही प्रत्यक्षात तुमच्या अपयशाची नाही, तर तुमच्या विरोधकांच्या अपयशाची कबुली असते. त्यांना तुमच्याशी वैचारिक लढाई जिंकता आली नाही, म्हणून त्यांनी चारित्र्यहननाचा मार्ग स्वीकारला. इथेच प्रभावी माणसाची कसोटी लागते. बदनामीला घाबरून तो माघार घेतो का? की सत्याच्या मार्गावर ठाम राहतो? अनेकजण इथेच थकतात. कारण बदनामी वेदनादायी असते. ती केवळ प्रतिमेवर नाही, तर मनावर, नात्यांवर आणि आत्मविश्वासावर आघात करते. पण जो माणूस स्वतःच्या हेतूंवर प्रामाणिक असतो, त्याला एक गोष्ट माहीत असते “आज नाही, उद्या नाही, पण एक दिवस सत्य उघड होणारच.” फक्त प्रभावी व्यक्तींनीच नाही, तर समाजानेही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण अफवांवर विश्वास ठेवतो का? अर्धसत्य स्वीकारतो का? की प्रश्न विचारतो? कारण बदनामी फोफावते ती प्रेक्षकांच्या मौनामुळे. जर समाज सजग झाला, विवेक वापरू लागला, तर बदनामीचे उद्योग आपोआप निष्प्रभ ठरतील. अन्यथा प्रत्येक नव्या विचाराचा गळा दाबला जाईल आणि समाज स्थैर्याच्या नावाखाली कुजत राहील.
म्हणूनच एक गोष्ट स्पष्टपणे सांगावी लागेल की, क्षेत्र कुठलेही असो, तुमचा प्रभाव पडू लागला की बदनामी अटळ आहे. ती भीतीदायक वाटू शकते, त्रासदायक असू शकते, पण ती तुमच्या अपयशाची खूण नाही; ती तुमच्या यशाची चाहूल आहे. इतिहास कधीही बदनामी करणाऱ्यांच्या नावाने ओळखला जात नाही; तो नेहमी प्रभाव टाकणाऱ्यांच्या नावाने लिहिला जातो. म्हणूनच बदनामीच्या गदारोळातही जेव्हा तुम्ही शांतपणे, ठामपणे आणि प्रामाणिकपणे काम करत राहता, तेव्हाच खरा परिवर्तनाचा अध्याय सुरू होतो. कारण शेवटी एकच सत्य उरते, बदनामीची वादळे थांबतात, पण प्रभावाची दिशा इतिहास ठरवतो.
✒️प्रवीण बागडे(नागपूर)मो:-९९२३६२०९१९







