Home अमरावती परीक्षेला जाता जाता विद्यार्थ्यांशी हितगुज….

परीक्षेला जाता जाता विद्यार्थ्यांशी हितगुज….

219

१० फेब्रुवारी २०२६ ला वर्ग बारावीची व २० फेब्रुवारी २०२६ ला दहावीची बोर्ड परीक्षा सुरू होत आहे. परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा !

         परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवण्याच्या सूचना अगदी लहान असतात;पण त्या पाळल्या न गेल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांचे भरपूर नुकसान होते,म्हणून हे परीक्षेला जाता-जाता थोडक्यात विद्यार्थ्यांशी केलेले हितगुज.

       पालकांच्या वाचनात हा लेख आल्यास त्यांनी आपल्या पाल्याला आणि ओळखीच्या विद्यार्थ्यांना वाचायला जरुर द्यावा. त्यांच्या गुण वृद्धीसाठी हमखास उपयोगात येईल.

        वस्तुंची यादी : – पेपरच्या चार तासांपूर्वी परीक्षेला न्यावयाच्या सर्व वस्तुंची यादी एका कागदावर लिहा. उदा, उत्तर पत्रिका आखण्यासाठी बारा इंच स्केल व सहा इंची स्केल पेन्सिल,खोडरबर,कंपास, प्रवेश पत्र, घड्याळ,सुव्यवस्थित तीन-चार निळ्या शाईचे पेन इ.

      पेपरच्या दिवशी : – पेपरच्या दिवशी चित्त शांत ठेवा.पेपरच्या तीन तास अगोदर हलकासा आहार घ्या.पूर्ण जेवण करून पेपरला जाऊ नये. कारण परीक्षा हॉलमधील प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो.

      पाणी व लघुशंका : -पेपर सुरू होण्याच्या दीड तास अगोदर पाणी घ्या व परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी लघुशंका आटोपून घ्या, कारण परीक्षा हॉलमधील प्रत्येक्ष क्षण गुणवाढीसाठी महत्त्वाचा असतो हे लक्षात घ्या .

      झोप : – पेपरपूर्वीच्या रात्री पाच किवा सहा तास झोप घ्या. कारण अधिकच्या जागरणाने उत्तरपत्रिका लिहिताना पेंगण्याचा त्रास होईल.

      पाण्याची बॉटल : – दहावी बारावीच्या परीक्षा या उन्हाळ्यात असतात . आपल्याला परीक्षा देताना तहान लागली असता आपल्याजवळ पाण्याची बॉटल नसेल तर आपण पर्यवेक्षकाला तसे सांगतो व पाणी देणारा येईपर्यंत आपण त्याची वाट पाहतो . कारण आपला घसा सुकलेला असतो लिहायला मन लागत नाही कारण पिण्याच्या पाण्याकडे सर्व लक्ष असते अशावेळी मानसिक अवस्था बिघडू शकते आणि परीक्षा हॉलमध्ये मिळालेल्या ग्लास मधील पाणी पूर्ण प्यावे.अर्धवट पाणी पिऊन डेक्सवर ग्लास ठेवला व डेक्सला धक्का लागला व तो पडला तुमची उत्तरपत्रिका पाण्यात भिजू शकते,म्हणून भरलेली पाण्याची लहान बॉटल सोबत घेऊन जा. हवे तेव्हा पाणी प्या व सुरक्षित राहा.

        वेळेची विभागणी : – १०० गुणांच्या पेपरसाठी एका गुणाला ९९ सेकंद याप्रमाणे गुणविभागणी केल्यास १०० गुणाला ९९०० सेकंद लागतात. म्हणजे १६५ मिनिट, उरलेल्या १५ मिनिटांचा उपयोग पाच मिनिट सर्वप्रथम प्रश्नपत्रिका वाचून महत्त्वाचे येणारे प्रश्न -उपप्रश्न लक्षात घ्यायला व १० मिनिट शेवटी स्वतःची उत्तर पत्रिका स्वतः तपासायला अर्थात पेपरमध्ये कोरे पान सोडले काय? त्यावर प्रश्न नंबर लिहिला काय ?त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला येत असेल तर लिहावे.येत नसल्यास डावीकडून उजवीकडे रेषा आखून तेथे पीटीओ लिहून पुढचे पान बघावे.पुढे पेपर बघताना अर्धे पान कोरे असेल तर तेथे सुद्धा डावीकडून उजवीकडे रेषा आखावी. पीटीओ लिहावे असा पूर्ण पेपर तपासावा,तसेच हस्व दीर्घ बघणे. प्रश्नानंतर उत्तर संपल्यावर रेषा ओढणे, मुद्दे व महत्त्वाचे शब्द अधोरेखित करणे इ.

        विद्यार्थी व परीक्षा हॉल : – परीक्षा हॉलमध्ये एखाद्याची कॉपी पकडल्यास तिकडे तुम्ही लक्ष देऊ नये अर्थात मन विचलित होऊ देऊ नका. सतत लिहित राहा.लिहिताना अधून-मधून स्वतःच्या डेस्क-बेंच खाली बघा. कोणी कॉपी वगैरे तेथे फेकून दिली असल्यास तुमची समजून तुम्हाला धोका होऊ शकतो हे लक्षात ठेवा.

        हुशार विद्यार्थ्यांना भान आवश्यक : – नियमित अभ्यास करणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना खूप आठवते,म्हणून त्यांनी उत्तरे लिहिताना खूप लिहित न बसता गुण व वेळ यांचे भान ठेवूनच लिहावे कारण उत्तम गुणांसाठी पूर्ण पेपर सोडविणे आवश्यक असते. हे त्यांनी लक्षात ठेवावे.

      वळणदार हस्ताक्षर गुणवाढीसाठी आवश्यक : – उत्तरे लिहिताना अक्षर खूप लहान नंको किंवा खूप मोठे नको .अक्षरं वळणदार व एकसारखे असावे.परीक्षकाला ओळखू येतील,असे असावे. दोन शब्दांमधील अंतर करंगळी एवढे असावे,अक्षरे शिरोरेषेला चिकटलेली असावी,अक्षराची वेलांटी, उकार, मात्रा अक्षराच्या निम्मे असावी व अक्षराच्या आकाराला चिकटलेली असावी, अक्षराची जाडी व उंची समान असावी हे वळणदार हस्ताक्षरांचे नियम विद्यार्थ्यांनी आचरणात आणल्यास गुणांमध्ये वृद्धी होऊ शकते.

       उपप्रश्न पाठोपाठ लिहिणे आवश्यक : – एका प्रश्नातील विचारलेले सर्व उपप्रश्न एका पाठोपाठ एक लिहावे. एखाद्या प्रश्नातील ‘अ’ पाचव्या पानावर आणि ‘ब’ पंधराच्या पानावर अशी उत्तरे लिहू नये तसेच आपल्या उत्तरपत्रिकेतील प्रश्नाच्या उत्तरांचा क्रम सुद्धा प्रश्नपत्रिकेप्रमाणेच असावा .अशी क्रमाने उत्तरे लिहिल्यास तपासणीसाला पेपर तपासायला सोपे जाईल हे लक्षात ठेवावे .

             शीर्षकाचे महत्त्व : कोणत्याही विषयाच्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना प्रथम प्रश्नामधूनच शीर्षक तयार करावे व ते उत्तर लिहिताना प्रारंभी मधोमध लिहून अधोरेखित करावे व त्याला दुहेरी अवतरण चिन्ह द्यावे.

     परिच्छेद व अधोरेखनाचे महत्त्व : – दीर्घ अथवा निबंधात्मक प्रश्नांची उत्तरे सोडविताना प्रस्तावनेतील आणि प्रत्येक परिच्छेदातील एक महत्त्वाचा शब्द अधोरेखित करावा ,म्हणजे उत्तर पत्रिका सुटसुटीत व नीटनेटकी दिसेल व गुण वाढतील.

                 प्रवेशपत्र वाचा : – शाळेतील वर्ग शिक्षकांनी प्रवेश पत्र दिल्यावर त्यावरील फोटो, नाव, क्रमांक, विषय,उत्तरे लिहिण्याची भाषा इ. वाचा. बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करावी.

       परीक्षा केंद्रावर पोहचणे : – बारकोड व होलोक्रॉफ्ट स्टिकर पद्धतीमुळे पेपरच्या वेळेच्या अर्धा तास अगोदर तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळेल म्हणून विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या पाऊण तास अगोदर परीक्षा केंद्रांवर पोहोचावे. स्वतःचा रोल नंबर कुठे आहे ते बघा. वेळ असल्यास विषय सूत्राच्या डायरीवरून नजर फिरवा. स्वतःच्या स्मरणशक्तीवर विश्वास ठेवा.

            अर्ध्या तासानंतर प्रवेश निषेध: – परीक्षा केंद्रावर पोचण्यासाठी अधिक वेळ करू नका. कारण अर्ध्या तासानंतर प्रवेश निषेध असतो.

             उत्तर पत्रिकेवरील सूचना वाचा : – उत्तर पत्रिका मिळाल्यानंतर उत्तरपत्रिकेतील सूचना काळजीपूर्वक वाचा व पेपर सोडविताना आचरणात आणा.

        रोल नंबर व इतर नोंदी :- रोल नंबर व इतर नोंदी काळजीपूर्वक प्रवेश पत्रावरूनच लिहा. बैठक क्रमांक अक्षरात व आकड्यात, इंग्रजी व मराठीत लिहिण्याचा अगोदरच सराव करा.  

          उपस्थिती पत्रकातील स्वाक्षरी : – पर्यवेक्षक देतील त्या उपस्थिती पत्रावर तुमच्या क्रमांकासमोर प्रवेश पत्रातील स्वाक्षरी प्रमाणेच स्वाक्षरी करा.

          उत्तरपत्रिकेत पत्ता, फोन नं. न लिहिणे -: उत्तरपत्रिकेत ओळखीच्या खाणाखुणा पत्ता, फोन नंबर इत्यादी लिहू नये.” जा जा रे पेपर मास्तर के पास । आयेंगी दया तो कर देंगे पास ॥” असं काहीही लिहू नये.

               कॉपीचा निषेध : – दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी फार मोठ्या प्रमाणात काटेकोरपणे होणार आहे .विद्यार्थ्यांचा असा पक्का विचार असावा की, कॉपी करून पास होण्यापेक्षा मी नापास होणे पसंत करीत, कारण कॉपी करणारा पुढे उच्च शिक्षणाच्या स्पर्धेत टिकू शकत नाही.

” कॉपीमुक्त अभियान आलं।

 लयी बेस झालं ॥

 मायासारखं पोट्ट ।

अभ्यासाले लागलं ॥

 

म्हून म्हणतो तुमाले ।

सोळा कॉपी करनं ॥

यशस्वी करा बोर्डाचं ।

कॉपीमुक्त अभियान ॥

       हे महत्त्वाचे आहे,म्हणूनच हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे .

        मेरिटचे गुपित : – वरील सर्व सूचनेत मेरिटचे गुपित जसे आहे, तसेच पूर्ण पेपर उत्तम सोडविणे व पूर्ण पेपरमधील पूर्ण प्रश्नांची उत्तरे उत्तम सोडविण्यातही आहे.हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे .

     या सर्व सूचनांचे माझ्या प्रिय विद्यार्थी वाचकांनी आचरण केल्यास परीक्षेत भरपूर यश मिळेल. अशा प्रकारचे आचरण विद्यार्थी वाचक करतील या आशेत या हितगुजाला मी पूर्णविराम देतो. परीक्षेकरिता पुनःश्च हार्दिक शुभेच्छा !

 ✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)मो:-८०८७७४८६०९