

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.14फेब्रुवारी):- करिअर कट्टा, ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे महिलांसाठी तीन दिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन दि. ९ ते ११ फेब्रुवारी २०२६ दरम्यान करण्यात आले. ही कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडली.
या कार्यशाळेसाठी प्रमाणित प्रशिक्षक श्री. गोविंद बी. मानासे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी संवादात्मक पद्धतीने विविध सत्रांचे आयोजन करून विद्यार्थिनींना मुलाखत तयारी, गटचर्चा तंत्र, व्यावसायिक नीतिमत्ता, प्रभावी संवाद कौशल्ये, नोकरीच्या संधी तसेच व्यावसायिक सादरीकरण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष सराव, गटक्रियाकलाप आणि चर्चांच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदवत व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्व आत्मसात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ. सुनंदा एस. आस्वले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, पदवी प्राप्त असूनही अनेक मुलींमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आढळून येते. अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थिनींना स्वतःतील ताकद व मर्यादा ओळखून करिअरच्या नव्या संधी शोधण्यास प्रोत्साहन मिळते.
कार्यक्रमाचे संयोजक डॉ. मृणाल आय. वऱ्हाडे (करिअर कट्टा) यांनी सांगितले की, सामाजिक व सांस्कृतिक अडथळ्यांमुळे अनेक मुलींना आवश्यक माहिती व मार्गदर्शन मिळत नाही. या प्रकारच्या उपक्रमांमुळे त्यांच्या व्यावसायिक विकासाला चालना मिळते.
कार्यक्रमाचे संचालन श्री. विवेक एस. माणिक यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. नीलेश आर. ठवकर यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.







