

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७
या देशातील बहुसंख्या मुसलमान हे मूळचे हिंदूच आहेत. त्यांना हिंदू धर्मात आणण्याची म्हणजेच घरवापसी करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशा आशयाचे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गोरखपूर येथे केल्याचे वृत्त आहे. त्यांच्या या वक्तव्याचा एम आय एम ने निषेध केला असून मोहन भागवत हे अजमल कसाबचा अजेंडा पुढे चालवत असल्याची टीका एम आय एम चे नेते इम्तियाज जलील यांनी केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदा १०० वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने सर्वसंघचालक डॉ. मोहन भागवत देशभर फिरून समाजातील विविध घटकांशी संवाद साधत आहेत, आणि संघाची भूमिका मांडत आहेत. त्यातीलच एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
वस्तुतः मोहन भागवत हे काही बोलले त्यात चुकीचे काहीही नाही. तरीही एम.आय.एम सारख्या संघटनेचे नेते त्यांच्यावर टीका करत आहेत. अर्थात ते राजकारण आहे. त्यामुळे त्यांना टिका करावी लागणारच हे उघड आहे.
आपल्या देशात साधारणपणे आठव्या किंवा नवव्या शतकात मुस्लिम आले, ते आक्रमणकारी म्हणून. त्यांनी इथे येऊन काही प्रदेशांवर आक्रमण करून ते ताब्यात घेतले आणि तिथे आपली राज्ये वसवली. ज्या ज्या राज्यांमध्ये त्यांनी सत्ता मिळवली तिथे तलवारीच्या जोरावर आणि धाकदपटशा दाखवून त्यांनी बहुसंख्य हिंदूंना मुसलमान बनवले. ही परंपरा त्यांनी दीर्घकाळ चालू ठेवली. ज्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला नाही अशा राजांचे त्यांनी हाल हाल करून ठार मारले. शीख धर्माचे एक प्रसारक गुरु गोविंदसिंग आणि त्यांचे दोन सुपुत्र यांना भिंतीत चिणून ठार मारण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराजांचेही त्यांनी कसे हाल केले हा इतिहास सर्वश्रुत आहे. ज्या टिपू सुलतानवरून सध्या महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे, त्या टिपू सुलतानाने देखील आपल्या राजवटीत काही लाख हिंदूंना बळजबरीने मुसलमान बनवले होते अशी नोंद इतिहासात सापडते.
हे मुस्लिम आक्रमणकारी तेवढ्यावरच थांबले नव्हते, तर त्यांनी हिंदूंची श्रद्धास्थाने असलेली मंदिरे देखील फोडली, आणि तुमचा देव स्वतःचेच रक्षण करू शकत नाही, तर तुमचे काय करणार असे सांगत त्यांनी हिंदूंना हालहाल करून मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला होता. अयोध्येत प्रभू रामचंद्राची जन्मभूमी असलेले राम मंदिर बाबर बादशहाच्या सरदाराने पाडून तिथे बाबरी मशीद उभारली होती. हाच प्रकार काशी विश्वेश्वर, सोमनाथ इथे देखील केला होता. आग्र्याचा ताजमहाल आणि दिल्लीचा कुतुब मिनार इथे देखील आधी मंदिरेच होती असे काही इतिहासकार सांगतात. हे बघता मुस्लिमांनी कशा पद्धतीने इथे आपल्या वसाहती जमवल्या आणि आपला धर्म तसेच आपली प्रजा वाढवली हे स्पष्ट होते. जर इतिहास शोधत गेलो तर आजचे अनेक मुस्लिम हे मूळचे हिंदूच होते याचे पुरावेही सापडतात. बॅरिस्टर अंतुले हे मूळचे कुलकर्णी होते असे काही जाणकार सांगतात, तर आम्ही आधीचे दळवीच होतो असे काँग्रेस नेते हुसेन दलवाई सांगतात.
मात्र हे मूळचे हिंदू असलेले आणि नंतर धर्म परिवर्तन करावे लागलेले मुस्लिम मूळ मुस्लिमांपेक्षा जास्त कडवे झाले असे दिसून येते. एक हिंदी म्हण आहे “नया मुल्ला ज्यादा जोर से बांग देता है”. तसेच हे धर्म परिवर्तन करून मुस्लिम झालेले मूळचे हिंदू आपण किती कडवे मुस्लिम आहोत हे दाखवण्याची स्पर्धा करू लागले आणि त्यातच आपल्या देशात मुस्लिमांचे धर्मांधपण जास्त वाढले. त्यात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी त्यांना अल्पसंख्यांक ठरवून जास्त अतिरेकी उत्तेजन दिले. त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळत गेली.
स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात द्विभार्या प्रतिबंधक कायदा आला. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला एकच लग्न करता येऊ लागले. जर एक पत्नी जिवंत असेल तर तिच्याशी रीतसर घटस्फोट न घेता दुसरे लग्न करता येत नसे. मात्र या कायद्यातून मुस्लिमांना सूट दिली गेली. त्याचप्रमाणे देशात कुटुंब नियोजन सुरू झाले तेव्हा तीन अपत्यांच्यावर मुले नको असे सांगण्यात आले. मात्र त्यातूनही मुस्लिमांना सूट दिली गेली. त्यामुळे या देशात मुस्लिमांची संख्या वाढली. त्यात तुलनेत कायदे पाळणारे हिंदू असल्यामुळे आणि त्यांना कोणतीही सूट न मिळाल्यामुळे त्यांची लोकसंख्या घटत गेली, आणि लोकसंख्येचा असमतोल देखील तयार होऊ लागला आहे.
जो प्रकार मुस्लिमांच्या बाबत झाला, तोच प्रकार ख्रिश्चनांच्या बाबत देखील झाला आहे. आपल्या देशात साधारणतः १२ व्या किंवा १३ व्या शतकात ख्रिस्ती लोक व्यापाराच्या निमित्ताने आले. त्यांनी आपल्या सोबत काही धर्मप्रचारक देखील आणले असावेत. त्यामुळे त्यांनी इथे व्यापारासोबतच ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसारही सुरू केला. मात्र मुस्लिम जसे तलवारीच्या जोरावर प्रचार करत होते तसा इथे प्रकार नव्हता. हे लोकांच्या भोळेपणाचा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना फसवत होते आणि त्यांना प्रलोभने दाखवून ख्रिस्ती बनवत होते. तामिळनाडू मध्ये ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी काही संस्कृत अभ्यासकांच्या मदतीने संस्कृत वेदातील ऋचा अभ्यासून त्या धर्तीवर बायबलमधील सूत्रे संस्कृत कवितेच्या रूपात रचली आणि वेदातील ऋचांप्रमाणेच ते संस्कृतात गाऊन हिंदुधर्मीयांना भुलवत होते, आणि त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारायला समजावत होते, अशी माहिती संस्कृत विद्वान कै. डॉ. नि. र. वऱ्हाडपांडे यांनी काही वर्षांपूर्वी एका भाषणात दिली होती. त्यामुळे भारतात ख्रिस्ती धर्म देखील असाच वाढत गेला आणि इथे देखील लोकसंख्येचा असमतोल वाढू लागला. आज भारतात जे काही ख्रिस्ती बांधव आहेत ते बहुतेक सर्व मूळचे हिंदूच आहेत. आजही ख्रिस्ती धर्मोपदेशकांचा अशाप्रकारे धर्मप्रसार आणि धर्म परिवर्तन करणे सुरूच आहे. इथेही नव्याने ख्रिस्ती धर्मात आलेले ख्रिस्ती हे जास्त कडवे आहेत. हिंदू धर्मात असताना कधी मंदिरात न जाणारे आता ख्रिस्ती झाल्यावर मात्र दर रविवारी न चुकता सकाळी चर्चमध्ये जाऊन येतात. हे वास्तव ठिकठिकाणी बघता येते.
त्यामुळे आज धार्मिक विद्वेषाचे वातावरण फक्त निर्माण होते आहे, असे नाही,तर ते वाढते देखील आहे. त्यामुळेच मोहन भागवतांनी या देशातील सर्व बांधव हे मूळचे हिंदूच आहेत हा मुद्दा प्रकर्षाने मांडायला सुरुवात केली आहे. त्यात चुकीचे काहीही वाटत नाही, आणि मूळचे जे हिंदू होते त्यांना जर हिंदू धर्मात आणण्याचे प्रयत्न होणार असतील तर त्यातही काही चुकीचे वाटत नाही.
आपल्या देशात काही शतकांपासून असे धर्म परिवर्तन करून दुसऱ्या धर्मात गेलेले मूळचे हिंदू बांधव आपल्या मूळ हिंदू धर्मात यावे यासाठी विश्व हिंदू परिषद धर्म जागरण मंच अशा हिंदुत्ववादी संघटनांनी गेल्या काही वर्षापासून पद्धतशीर प्रयत्न सुरू केले आहेत, आणि त्यांना यश देखील मिळते आहे काही अभ्यासकांच्या मते हिंदू धर्मात विविध जाती आहेत. त्यात अनेक पोट जाती आणि इतर अनेक भेद आहेत. शाखा गोत्र प्रवर इत्यादी प्रकार आहेत. अशावेळी अन्य धर्मातून हिंदू धर्मात आलेल्या मंडळींचे कुळ कोणते हा देखील भविष्यात प्रश्न निर्माण होईल, असे काही अभ्यासक मानतात. मात्र काही अभ्यासकांच्या मते अजूनही तीर्थक्षेत्री जुन्या कुळांचा इतिहास सापडतो. त्यामुळे तुम्ही कोणत्या कुळातील होतात याचा इतिहास मिळाला तर तुमचे ते कुळ निश्चित होऊ शकते. या संदर्भात पुण्याचे धर्म जागरण मंचाचे कार्यकर्ते डॉ. श्रीरंग गोडबोले यांचा बराच अभ्यास आहे. त्यांच्यासारखेच अनेक अभ्यासक इथे सापडू शकतात. त्यामुळे जर थोडे शिस्तबद्ध प्रयत्न केले तर या प्रश्नाचे देखील समाधान मिळू शकते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटना याबाबतीत जाणकारांचा गट तयार करून निश्चित मार्ग काढू शकते.
त्यामुळेच डॉ. भागवत म्हणतात तशी घर वापसी आता मोठ्या प्रमाणात व्हायला हवी. जर आज मूळचे हिंदू असलेले इतर धर्मात गेलेले असतील, मात्र त्यांची जीवनशैली हिंदूच असेल, तर त्यांना परत हिंदू धर्मात घ्यायला हवे. इतिहासातील नोंदीं नुसार चौदाव्या किंवा पंधराव्या शतकात काश्मीरमधील काही राजांनी असे प्रयत्न केले होते. मात्र त्यावेळी काही धर्ममार्तंडांनी त्याला विरोध केला होता. आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन अशी घरवापसी जर झाली तर अनेक समस्या सुटू शकतात.
आपल्या देशात धार्मिक तेढ मोठ्या प्रमाणात आहे. त्यातही हिंदू आणि मुस्लिमांचा संघर्ष हा कायम चिंतेचा विषय राहिला आहे. जर या पद्धतीने प्रयत्न झाले आणि व्यापक प्रमाणात घरवापसी झाली तर आपल्या देशातील हिंदू मुस्लिम ख्रिस्ती यांच्यातील संघर्षांच्या समस्या सुटू शकतील असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे हा देश एकसंघ होऊन अधिक बळकट होऊ शकेल हे निश्चित.
मात्र इम्तियाज जलील यांच्या मते भागवतांच्या या उद्योगामुळे देश विभाजित होऊ शकतो. यातून विघटनाची भावना वाढीला लागू शकते. मात्र इम्तियाज जलील यांचे हे मत वरील सर्व पार्श्वभूमीवर निराधारच वाटते. आपल्या देशात इंग्रज येण्यापूर्वी भारत हा एक विशाल देश होता. अगदी इराण पर्यंत या देशाच्या सीमा पसरल्या होत्या. मात्र मुस्लिम आले आणि त्यांनी तलवारीच्या जोरावर धर्मांतर करून इथे मुस्लिम धर्म वाढवला. तसाच ख्रिस्ती धर्म प्रसारकांनीही इथे ख्रिस्ती धर्म वाढवला.
त्यातून आधी मुस्लिमांनी सत्ता मिळवली होती, मग ख्रिस्ती धर्मियांनी देखील या देशावर इंग्रजांची सत्ता बसवली. इंग्रजांनीच हळूहळू या देशाचे तुकडे केले आणि जिथे जिथे तुकडे झाले तिथे तिथे मुस्लिम लोकसंख्या जास्त असल्यामुळे ते मुस्लिमांचे प्रदेश म्हणून तुकडे केले गेले आहेत. त्यात जुना ब्रह्मदेश म्हणजेच आजचा म्यानमार देखील आहे. बांगलादेश श्रीलंका पाकिस्तान आणि इराण देखील आहे, इतकेच काय तत्कालीन सिलोन म्हणजेच आजची श्रीलंका देखील आहे . प्राचीन काळात हे सर्व भारताचे भूभाग होते. त्यामुळे इथले सर्व आज परधर्मात असलेले मूळ हिंदू जर पुन्हा हिंदू धर्मात आले तर या देशाचे झालेले तुकडे पुन्हा जोडण्यासाठी मदतच होईल हे निश्चित. त्यामुळेच मोहन भागवतांच्या वक्तव्याची अजमल कसाबशी तुलना करणे हा इम्तियाज झालेली यांचा धर्मांध वाह्यातपणा इतकेच त्याचे वर्णन करता येऊ शकते.
इम्तियाज जलील हे एम आय एम चे कडवे कार्यकर्ते आहेत. त्यांना या देशात मुस्लिमांची सत्ता प्रस्थापित करायची आहे. त्यांचेच नेते असलेले असदुद्दीन ओवेसी यांनी लवकरच या देशात ही हिजाबधारी महिला पंतप्रधान होईल असा आशावाद व्यक्त केला आहे. त्यावरूनच त्यांचे मनसुबे स्पष्ट होतात. हे बघता इम्तियाज जलील यांचे हे विधान त्याच मार्गाने वाटचाल करणारे आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. 
त्यामुळेच डॉ. मोहन भागवत यांचे हे विधान प्रत्येक देशभक्त हिंदू नागरिकाने स्वागत करून वास्तवात कसे आणता येईल याचाच प्रयत्न करायला हवा. तेच या देशातील प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाच्या दृष्टीने हिताचे आहे.







