Home महाराष्ट्र इराण अमेरीका युध्दा निमीत्त ज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार यांचे मनोगत !!

इराण अमेरीका युध्दा निमीत्त ज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार यांचे मनोगत !!

155

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

हे इराण युद्ध अमेरिकेला वाटते तितके सोपे जाणार नाही. हे युद्ध अजून लांबले तर आश्चर्य वाटायला नको. कदाचित जी अवस्था रशिया – युक्रेन युद्धात रशियाची झाली आहे, तीच अवस्था या युद्धात अमेरिकेची होऊ शकते. इस्राएल राहिला या बाबतीत बाजूला. मात्र अमेरिकेला यातून बरेच धडे नव्याने मिळेल. 

सद्दाम हुसेनचा इराक त्या मनाने बराच सोपा होता अमेरिकेसाठी ! मात्र इराण म्हणजे इराक नाही..! 

१९९१ साली झालेल्या खाडी युद्धात सद्दाम हुसेनला नमवणे अमेरिकेला सोपे झाले होते. कारण एकेकाळी सद्दाम हुसेन याला शस्त्र पाठवणारा अमेरिकाच होता. त्यामुळे सद्दाम कडे नक्की कोणते शस्त्रे आहेत, याचा अचूक अंदाज आणि त्यायोगे सद्दामची युद्ध नीतीची अमेरिका अंदाज बांधू शकत होती. 

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इराकची भौगोलिक स्थिती ! संपूर्ण इराक हा वाळवंटी प्रदेश असल्यामुळे जास्त सरळ वातावरण आणि भौगोलिक अडसर जास्त नव्हता. 

सोबतच ६० ते ६५ टक्के शिया मुस्लिम आणि सद्दामचे अनंत अत्याचार सहन करत त्याच्या छातीवर नाचायला तयार असणारे “कुर्द” अमेरिकेच्या मदतीला तिथे जमिनीवर उपलब्ध होते. अमेरिकन पायदळ सैन्याला याचा बराच फायदा झाला हे उघड गुपित आहे.

या उलट परिस्थिती इराण मध्ये आहे. इराणमध्ये जेव्हा पासून इस्लामिक क्रांती झाली तेव्हा पासून इराणची तयारी ही अमेरिकेसोबत लढण्याची म्हणूनच सुरू आहे. इराणने इस्रायल आणि अमेरिकेचा विध्वंस याच एका रस्त्यावर आपली नजर ठेवली आहे. 

आपली सगळी राजकीय व्यवस्था आणि सैन्य व्यवस्था फक्त आणि फक्त याच अमेरिकेसोबत लढण्यासाठी तयार केलेली आहे. इराणला युक्रेन सारखी बहरून मिळणाऱ्या मदतीवर युद्ध करण्याची गरज नाही. निदान अजून १० – १५ दिवस आपल्या असलेल्या युद्धक सामग्रीतून तो अमेरिका आणि अरब राष्ट्रांना हैराण करू शकेल इतकी ताकद त्याच्या कडे नक्कीच आहे. 

त्याचमुळे खोमेनीचा मृत्यू झाल्यावर पण, अजून इराणमधील राजकीय व्यवस्था बऱ्यापैकी शाबूत आहे. ती आपल्या पद्धतीने निर्वेध काम करत आहे असे सध्यातरी दिसत आहे. इराण सरकार विरोधात इराणी लोकांनी कितीही निदर्शने केलेली असली, तरी आजच्या घडीला इराणी जनता मोठ्या प्रमाणावर बाहेर येत सरकार विरोधात ठाम भूमिका घेत असल्याचे चित्र अजून तरी नाही. 

याचे कारण इराणच्या ऐतिहासिक सांस्कृतिक इतिहासात आहे. अजून एक लक्षात घेणे आवश्यक आहे की, येत्या दोन – तीन दिवसात इराणी हल्ल्यात अमेरिकेला एक किंवा दोन मोठे हादरे मिळाले तर..इराणमधील अंतर्गत राजकारण अमेरिकन आणि इस्रायलच्या मनाविरुद्ध पालटून पुन्हा खोमेनीच्या राजवटीच्या बाजूने उभे राहू शकते. 

इराणची भौगोलिक परिस्थिती पण अमेरिका आणि इस्रायलासाठी धोक्याची घंटा आहे. अमेरिकन पायदळाला इराणी जमिनीवर बराच विरोधाचा सामना करावा लागू शकेल. यात इराणी नॅशनल गार्ड्स, इराणी सेना, निमलष्करी आणि पोलिस सेवा आणि काही प्रमाणात जनतेकडून पण हा विरोध इराणी जमिनीवर होऊ शकतो. लक्षात घ्या हिजबुल्लाह आणि हुती बंडखोरांना “गनिमी कावा” पद्धतीने लढायचे प्रशिक्षण याच इराणी सैन्याने दिले आहे. 

मात्र अमेरिका येथे इराणमध्ये अडकली तर त्याचा फायदा अजून कोण घेऊ शकतो? तर चीन आणि उत्तर कोरिया…! आता पुढील विचार करा..