Home महाराष्ट्र प्रा.एम.एम. सुरनर यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

प्रा.एम.एम. सुरनर यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

83

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.16मार्च):-येथील पीएम श्री मन्नाथ नगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी प्रबोधनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.एम.एम.सुरनर यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्त्व, संस्कारांची गरज आणि जीवनात यश मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या मूल्यांविषयी प्रभावी विचार मांडले.कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख जगनाडे तसेच आंधळे उपस्थित होते.यावेळी केंद्रातील सर्व शिक्षक-शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना प्रा.सुरनर यांनी सांगितले की,विद्यार्थी हा शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू असायला हवा. विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवून शिक्षण दिल्यास शिक्षण प्रक्रिया अधिक सुलभ व परिणामकारक होते. पुस्तकातील ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार व क्षमतांनुसार शिक्षण देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.विद्यार्थी हा अनुकरणप्रिय असल्याने समाजातील विविध घटकांमधून त्याला विविध प्रकारचे ज्ञान मिळू शकते.

संस्कार, शील आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातूनच देशाचे उज्ज्वल भविष्य घडते, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी त्यांनी विविध प्रेरणादायी प्रसंग व कथांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महान संशोधक थॉमस एडिसन आणि त्यांच्या आईची प्रेरणादायी कथा सांगत प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सुप्त गुण दडलेले असतात.

त्या गुणांचा शोध घेऊन त्यांचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे हे खऱ्या विद्यार्थ्याचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नागनाथ लटपटे यांनी केले,तर सूत्रसंचालन जोशी यांनी केले. आभार प्रदर्शन राजकुमार सुळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.