

भाऊ ज्ञानदीप । विद्यार्थी वर्गाचे ।
शिवाजी संस्थेचे । जन्मदाते ॥
ज्ञानाची ही गंगा । कृषकांच्या दारी ।
शिक्षण पायरी । घरोघरी ॥
सर्वसामान्य माणसाचे जीवन स्वकष्टाने अमृतमय करणारे जनक्रांतीचे लोकमहर्षी,श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कल्पवृक्षाची स्थापना करून ज्ञानाग्नी प्रज्वलित करून, ज्ञानदीप चेतवून शेतीच्या दारात ज्ञानाची गंगा पोहोचविणारे थोर शिक्षण महर्षी,अस्पृश्यता निवारण बील मध्यप्रांत वऱ्हाडचे मंत्री असताना कायदे कौन्सिलमध्ये पास करून घेणारे तसेच प्रत्यक्ष जीवनात आचरणातून अस्पृश्यता निवारण करणारे अस्पृशोद्धारक,’वैदिक वाड्.मयात धर्माचा उगम व विकास’ या प्रबंधाचे लेखन करणारे थोर लेखक,मातीमधून शास्त्राच्या फुलबागा फुलविणारे,रंजल्या गांजल्या कृषकांचे दैवत झालेले कृषिक्रांतीचे अग्रदूत कृषिपंडित, शिक्षणाने केवळ उपजीविकेचे प्रश्न सुटत नाहीत तर जीवनातील जटिल प्रश्न सोडविण्याची शक्ती प्राप्त होते अशी शिक्षणविषयक विचारधारा असल्यामुळे संपूर्ण समाजाला विद्येची दालनं मुक्त करणारे शिक्षणमहर्षी, ‘प्रशंसनीय व बहुजनांकरिता कार्य करणारे मी विदर्भातील एकच व्यक्ती ओळखतो ती म्हणजे डॉ.पंजाबराव देशमुख’ असे गौरवोद्गार पंडित जवाहरलाल नेहरु यांनी ज्यांच्याविषयी काढले ते कर्मयोगी,धन,दौलत,वैभव,
समृद्धी,मान,सन्मान या सर्वांचा लोककल्याणासाठी त्याग करणारे,स्वयंप्रयत्नातून एका नव्या युगाची निर्मिती करणारे एक थोर युगपुरुष डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या दि.१० एप्रिल २०२६ रोजी असलेल्या ६१ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥
डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे बालपण अतिशय साधे पण संस्कारक्षम होते.त्यांच्या संघर्षाची आणि समाजकार्याची बीजे त्यांच्या बालपणातच पेरली गेली होती.
डॉ.पंजाबराव देशमुखांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ रोजी अमरावती जिल्ह्यातील पापळ या ग्रामात झाला.त्यांचे वडील शामराव आणि आई राधाबाई हे शेतकरी कुटुंबातील होते. शेती हाच त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार होता.डॉ.पंजाबराव देशमुख यांचे बालपण पूर्णपणे ग्रामीण भागात आणि शेतकरी वातावरणात गेले.यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या अडीअडचणी, दारिद्र्य आणि शिक्षणाचा अभाव यांचा जवळून अनुभव आला.त्यांच्यावर त्यांच्या आई राधाबाईंचे आणि वडील शामरावजींचे खूप मोठे संस्कार होते.त्यांनी कष्टाची आणि प्रामाणिकपणाची शिकवण पंजाबरावांना बालपणीच दिली होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मूळ गावी पापळ येथे झाले. त्याकाळी शिक्षणाची सोय आजच्यासारखी सोपी नव्हती. गावात चौथीपर्यंत शाळा होती. शिकल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी त्यांना बाहेर पडावे लागले.त्यांनी कारंजा लाड आणि त्यांचे पुढील माध्यमिक शिक्षण अमरावती येथील प्रसिद्ध हिंदू हायस्कूलमधून पूर्ण झाले.
सन : १९१८ मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली.लहानपणापासूनच ते अभ्यासात हुशार आणि चौकस बुद्धीचे होते.बालपणी समाजात असलेली जातिव्यवस्था आणि शिक्षणापासून वंचित राहिलेला बहुजन समाज पाहून त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण होत असे.शेतकरी कुटुंबात जन्मल्यामुळे ‘शेतकऱ्याचा मुलगा शिकला पाहिजे’ ही जिद्द त्यांच्यात शालेय वयातच निर्माण झाली होती.त्यांच्या बालपणापासूनच ते अत्यंत कष्टाळू होते.त्यांनी शिक्षणासाठी दिलेला लढा हा आजही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मानला जातो.
मॅट्रिक नंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला.त्यानंतर उच्चशिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले, जिथे त्यांनी एडिनबर्ग विद्यापीठातून एम.ए. केले आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून D.Phil ही पदवी मिळविली. त्यांच्या प्रबंधाचा विषय ‘वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम व विकास’ हा होता.बॅरिस्टर ही पदवी त्यांना इंग्लंडमध्येच मिळाली .
डॉ .पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक,शिक्षणतज्ज्ञ आणि कृषकक्रांतीचे प्रणेते होते. त्यांचे सामाजिक कार्य प्रामुख्याने बहुजन समाजाचा उद्धार,अस्पृश्यता निर्मूलन,शिक्षण प्रसार आणि शेतकरी कल्याण होते .
बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी दि.१ जुलै १९३२ रोजी अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज ही संस्था विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक मोठी शैक्षणिक संस्था असून ती हजारो विद्यार्थ्यांना आज शिक्षण देत आहे.आज या भाऊसाहेबांनी पेरणी केलेल्या शैक्षणिक रोपट्याचा वटवृक्ष झालेला पाहून भाऊसाहेबांचे स्वप्न साकार झाले आहे असे वाटते.
डॉ.पंजाबराव देशमुख अर्थाने ‘शेतकऱ्यांचा कैवारी’ म्हटले जाते.त्यांनी शेतकऱ्यांच्या संघटनासाठी ‘भारत कृषक समाज’ या संस्थेची स्थापना केली. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री म्हणून त्यांनी पद भूषवले.कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी जे कायदे केले ते शेतकऱ्यांना वरदान ठरले.
कृषीमंत्रीपदी । योजना आखून।
कृषक जीवन। सुखमय ॥
कृषकांचे राजा । शेतकरी दाता।
भूषण भारता । पापडचे ॥
त्यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. सन : १९५९ मध्ये दिल्ली येथे त्यांनी जागतिक कृषी प्रदर्शन भरवले,ज्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना जागतिक शेती पद्धतींची ओळख झाली.
भाऊसाहेबांनी जातिभेदाविरुद्ध आयुष्यभर लढा दिला.सन : १९२७ मध्ये अमरावती येथील अंबादेवीचे मंदिर दलितांसाठी खुले करण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला.गरीब आणि दलित मुलांच्या निवासासाठी त्यांनी अमरावती येथे ‘श्रद्धानंद छात्रालय’ सुरू केले, जेणेकरून शिक्षणासाठी जातीचा अडथळा येऊ नये. जेवण आणि निवासाची सोय झाल्यामुळे खेड्यापाड्यांतील शेतकरीपुत्रांना शहरात येऊन शिक्षण घेणे शक्य झाले.या वसतिगृहात त्यांनी जात-पात न मानता सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला.
डॉ.पंजाबराव देशमुख भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे सदस्य होते. संविधानात मागासवर्गीयांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.विदर्भ प्रांतातून त्यांनी सामाजिक न्यायासाठी सातत्याने आवाज उठवला.”शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि तो सुखी झाला तरच देश सुखी होईल,” हा त्यांचा मूळ विचार होता.त्यांच्या या अतुलनीय कार्यामुळेच त्यांना ‘विदर्भाचा हिरा’ मानले जाते.
“जागतिक कृषी । प्रदर्शनी शुभ ।
कृषकांना लाभ । जीवनात ॥
भाऊंचे कार्य । थोर अनमोल ।
वाणी बहुमोल । विकासाची॥
असे त्यांचे सामाजिक कार्य फार मोठे होते.
शिक्षण’ हाच उद्धाराचा मार्ग डॉ.पंजाबराव देशमुखांचे ठाम मत होते की, जोपर्यंत शेतकरी आणि बहुजन समाज शिक्षित होत नाही, तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना खालील गोष्टींवर भर दिला .केवळ पुस्तकी ज्ञान न देता शेतीवर आधारित तांत्रिक शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.केवळ मुलांनीच नाही, तर मोठ्यांनीही साक्षर व्हावे यासाठी त्यांनी प्रौढ शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले.१९३० ते १९३३ या काळात त्यांनी मध्य प्रांताचे शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले. या काळात त्यांनी प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारासाठी महत्त्वाचे कायदे केले.ग्रामीण भागातील गरजा लक्षात घेऊन उच्च शिक्षणाची सोय व्हावी, ही त्यांची संकल्पना होती.”ज्यांच्या हातात नांगर आहे, त्यांच्या मुलांच्या हातात पुस्तक हवे,” हे भाऊसाहेबांचे ब्रीदवाक्य होते.
“भाऊंचे जीवन । संघर्षाचा मार्ग ।
शिक्षणाचा स्वर्ग । विदर्भात ॥
डॉ.पंजाबराव देशमुखांनी केवळ शिक्षण संस्था काढल्या नाहीत, तर शिक्षणाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन समाजाला दिला. त्यांच्या कार्यामुळेच आज विदर्भातील हजारो कुटुंबे सुशिक्षित झाली आहेत.शिक्षणमहर्षी,कृषिमहर्षी अस्पृशोधारक,शेतकऱ्यांचे कैवारी,शिक्षणतज्ज्ञ,एक थोर युगपुरुष डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना ६१ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥
भाऊंच्या कर्मांना। करितो नमन ।
करांनी वंदन । स्मृतिदिनी ॥
✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)मो:-८०८७ ७४८६०९







