Home नागपूर महात्मा ज्योतिबा फुले : समतेच्या क्रांतीचा अखंड दीप

महात्मा ज्योतिबा फुले : समतेच्या क्रांतीचा अखंड दीप

78

भारताच्या सामाजिक इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही; ते पुढील अनेक पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरते. महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले हे असेच एक युगपुरुष. ११ एप्रिल हा त्यांचा जयंतीदिन केवळ स्मरणाचा सोहळा नाही; तो आपल्या समाजमनाला आरसा दाखवणारा, असमानतेच्या जखमा उघड करणारा आणि परिवर्तनाची नवी प्रेरणा देणारा दिवस आहे. ज्या काळात जातीव्यवस्था समाजजीवनाचा कणा मानली जात होती, त्या काळात फुले दाम्पत्याने त्या व्यवस्थेलाच थेट आव्हान दिले. शिक्षणावर मक्तेदारी, स्त्रियांचे दमन, शूद्र-अतिशूद्रांचे अमानवीय शोषण या सर्वांविरुद्ध त्यांनी उभा केलेला लढा हा मानवी अस्मितेचा लढा होता. “माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार” ही जाणीव त्यांनी समाजाच्या केंद्रस्थानी आणली.

       महात्मा फुले यांच्या कार्यातील सर्वात मोठा टप्पा म्हणजे शिक्षणाचा प्रसार. १८४८ मध्ये त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या काळात स्त्रीशिक्षण हा ‘पाप’ मानला जात होता. समाजाचा विरोध, अपमान, दगडफेक हे सगळे सहन करत त्यांनी शिक्षणाचा दीप विझू दिला नाही. कारण त्यांना ठाऊक होते, शिक्षण हीच खरी मुक्तीची किल्ली आहे. १८७३ मध्ये स्थापन झालेल्या ‘सत्यशोधक समाजा’ने धर्म आणि समाजव्यवस्थेच्या नावाखाली चालणाऱ्या अन्यायाला थेट प्रश्न विचारले. अंधश्रद्धा, कर्मकांड आणि जातिभेद यांना त्यांनी निर्भीडपणे आव्हान दिले. त्यांच्या विचारात धर्म म्हणजे माणसाचे कल्याण, समता आणि न्याय; म्हणूनच त्यांनी मानवतेला धर्माच्या केंद्रस्थानी ठेवले.

       ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथातून त्यांनी शेतकऱ्यांच्या शोषणावर कठोर प्रहार केला. आजही शेतकरी समस्यांचा विचार केला, तर फुले यांचे विचार अत्यंत सुसंगत वाटतात. जो समाज आपल्या अन्नदात्याचा सन्मान करत नाही, तो कधीच प्रगत होऊ शकत नाही, हा त्यांचा स्पष्ट संदेश होता.

        स्त्रीमुक्तीच्या लढ्यातही फुले यांचे योगदान ऐतिहासिक आहे. विधवांसाठी आश्रयगृह, बालविवाहाविरुद्ध लढा, स्त्रीशिक्षणाचा प्रसार या माध्यमातून त्यांनी स्त्रीला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. सावित्रीबाईंसोबत त्यांनी उभारलेली ही चळवळ आजच्या महिला सक्षमीकरणाची पायाभरणी ठरली. आजच्या काळात आपण स्वतःला आधुनिक म्हणतो; मात्र समाजात अजूनही जातीय भेदभाव, अंधश्रद्धा आणि असमानता दिसते. डिजिटल युगात माहिती वाढली, पण विवेक कमी झाला, अशीही स्थिती आहे. अशा वेळी फुले यांची ‘सत्यशोधक’ विचारसरणी अधिकच महत्त्वाची ठरते. फुले जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करतो; पण त्याच वेळी त्यांच्या विचारांची अंमलबजावणी होते का, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. केवळ मिरवणुका आणि घोषणांनी समाज बदलत नाही. शिक्षणात समानता, स्त्री-पुरुष समान हक्क आणि शेतकऱ्याला सन्मान हे प्रत्यक्षात उतरले, तरच फुले यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

       महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ इतिहासातील व्यक्तिमत्त्व नाहीत; ते एक जिवंत विचार आहेत. समतेचा, न्यायाचा आणि मानवतेचा. आज गरज आहे ती फुले ‘वाचण्याची’ नाही, तर फुले ‘जगण्याची’. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, शिक्षणाचा प्रसार करणे आणि समानतेसाठी लढणे, हीच खरी फुले विचारांची परंपरा आहे.

       शेवटी, एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा की, आपण फुले यांचे अनुयायी आहोत की फक्त त्यांचे स्मरण करणारे?

या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तरच आपल्या समाजाचा आणि देशाचा भविष्यकाळ ठरवणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा! 

✒️प्रवीण बागडे(नागपूर)मो:-९२३६२०९१९