Home अमरावती विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर-ग्रंथवेडे प्रज्ञावंत

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर-ग्रंथवेडे प्रज्ञावंत

104

 दि.14 एप्रिल 2026 रोजी असलेल्या न्यायपंडित,सर्व शास्त्रात दिग्विजयी ठरलेले,सर्व विद्यासंपन्न विश्वरत्न – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विनम्र वंदन ॥

बाबासाहेबांचे । ग्रंथ हेच गुरू ।

वाचन ते सुरू । रात्रंदिन ॥

ग्रंथ शिकविती । न्याय आणि नीती ।

पुस्तकांशी प्रीती । भीमराव ॥

       विश्वरत्न -भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथप्रेम हे असे जगावेगळे होते. त्यांचे हे ग्रंथप्रेम जागतिक स्तरावर अजोड मानले जाते. त्यांना केवळ ‘भारतरत्न’ किंवा भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणूनच ओळखले जात नाही तर एक ‘ग्रंथवेडे प्रज्ञावंत’ म्हणूनही ओळखले जाते. 

शरीर ना मन । ग्रंथविना घर ।

अज्ञानाची भर । पडतसे ॥

      ग्रंथ नसलेले घर म्हणजे शरीर व मन नसलेले घर होय. म्हणूनच डॉ.​बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईतील दादर येथे ‘राजगृह’ नावाचे घर बांधले, ते प्रामुख्याने त्यांच्या पुस्तकांसाठी होते.

​त्यांच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात ५०,००० हून अधिक पुस्तके होती.​त्या काळी हे जगातील सर्वात मोठे खाजगी ग्रंथालय मानले जात होते.​घराचा नकाशा तयार करताना त्यांनी पुस्तकांसाठी सर्वाधिक जागा आरक्षित केली होती, ज्यावरून त्यांच्या ग्रंथवेडाची प्रचिती येते.​ते दिवसातील १८ ते २२ तास सतत वाचन करीत असत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये असताना त्यांनी आठ वर्षांचा अभ्यासक्रम अवघ्या दोन वर्षे तीन महिन्यात पूर्ण केला. हे केवळ त्यांच्या अफाट वाचनशक्तीमुळे शक्य झाले.अर्थशास्त्र,कायदा, समाजशास्त्र,इतिहास,धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान अशा अनेक विषयांवर त्यांनी वाचनामुळेच प्रभुत्व प्राप्त केले होते.परदेशात असताना ते जेवणाचे पैसे वाचवून त्या पैशांतून पुस्तके खरेदी करीत असत.अनेकदा ते दुपारचे जेवण न करता ग्रंथालयात बसून वाचन करत.त्यांच्यासाठी पुस्तके ही केवळ वस्तू नव्हती, तर ते त्यांचे प्राण होते.​”ग्रंथ हेच माझे गुरू आणि ग्रंथ हेच माझे जीवन आहे,” असे ते मानत असत.​

          एकदा राजगृहातील ग्रंथालयात वाचन करत असताना त्यांना समजले की, एका दुर्मिळ पुस्तकाची पाने कोणीतरी फाडली आहेत,तेव्हा त्यांच्या नयनात अश्रू आले होते. पुस्तकांना इजा होणे ही त्यांच्यासाठी वैयक्तिक वेदना असे.

      डॉ.बाबसाहेब आंबेडकरांना जुन्या आणि दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह करण्याचा छंद होता. न्यूयॉर्क किंवा लंडनला गेल्यावर ते सर्वात आधी जुन्या पुस्तकांच्या दुकानांना भेट देत असत.ग्रंथासोबत ते प्रवास करीत असत कारण ग्रंथ हेच त्यांचे ​प्रवासातील सोबती होते . बाबासाहेब जेव्हा जेव्हा प्रवास करीत,तेव्हा तेव्हा त्यांच्यासोबत पुस्तकांनी भरलेली एक मोठी पेटी असायची. प्रवास रेल्वेचा असो की विमानाचा असो,त्यांचे वाचन कधीच थांबत नसे.

रिते न होणारे । शब्दांचे भंडार ।

ज्ञानाचा सागर । पुस्तकच ॥ 

अशी त्यांची ग्रंथबाबतची विचारसरणी होती .

     आपण सर्वसामान्य माणसे घरासाठी कर्ज काढतो पण पुस्तकासाठी कर्ज काढणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथवेड हे जगावेगळे होते. अनेकदा आर्थिक टंचाई असतानाही त्यांनी कर्ज काढून पुस्तके विकत घेतलेली आहेत.

​लेखणीतून क्रांती घडते असा त्यांचा ठाम विश्वास होता.

            ​डॉ.आंबेडकरांचे ग्रंथवेड केवळ वाचनापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी स्वतः अनेक अजरामर ग्रंथांची निर्मिती केली होती. त्यांच्या वाचनाचा अफाट व्यासंग त्यांच्या पुस्तकांतून दिसून येतो .The Buddha and His Dhamma (बुद्ध आणि त्यांचा धम्म),​Who Were the Shudras? (शूद्र पूर्वी कोण होते?),​The Problem of the Rupee (रूपयाचा प्रश्न),​Castes in India (जातीची उत्पत्ती आणि विकास ),The

Untouchables, Thuoghts on Pakistan इत्यादी त्यांचे ग्रंथ जगभर प्रसिद्ध आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व साहित्य महाराष्ट्र शासनाने ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्ज अँड स्पीचेस ” या नावाने अनेक खंडांमध्ये प्रकाशित केले आहे. त्यानी दिलेला “शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा महान संदेश त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ग्रंथवेडातूनच समाजाला दिलेला आहे. “ज्यांच्या हातात पुस्तके असतात, ती माणसे कधीही गुलाम होऊ शकत नाहीत,” हा विचार त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखविला. 

भीमाचे जीवन । शब्दांनी घडले ।

शब्दांनीच केले । जागृतही ॥

    आजच्या टीव्ही आणि मोबाईलच्या युगात

त्यांचे ग्रंथवेड हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आणि वाचकासाठी एक महान प्रेरणा देणारे आहे. आज 14 एप्रिल 2026 रोजी असलेल्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विनम्र वंदन ॥

✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)मो:-८०८७७४८६०९