

✒️अहिल्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर(दि.25एप्रिल):-शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सतराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, आजवर झालेल्या साहित्य संमेलनाध्यक्षांनी केलेल्या भाषणांचे “शब्दसंचित” या नावाने ग्रंथरूपाने प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे व खजिनदार भगवान राऊत यांनी दिली.
शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी संपादित केलेल्या या ग्रंथामध्ये राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनातील विविध अध्यक्षांच्या भाषणांचा समावेश करण्यात आला आहे.
या “शब्दसंचित” ग्रंथात चित्रपट गीतकार व कविवर्य बाबासाहेब सौदागर, कथाकार नामदेवराव देसाई, प्राचार्य शिवाजीराव देवढे, काव्यनगरीकार डी. एम. कांबळे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ लेखक डॉ. संजय कळमकर, कविवर्य प्रा. फ. मु. शिंदे, चित्रपट गीतकार कवी प्रकाश घोडके, लोककवी प्रशांत मोरे, माजी आमदार कविवर्य लहू कानडे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. इंद्रजीत भालेराव, प्राचार्य डॉ. अशोकराव शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, ज्येष्ठ पत्रकार ॲड. डॉ. बाळासाहेब बोठे, निवृत्त सनदी अधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजीवनी तडेगावकर यांच्या मनोगतांचा समावेश आहे.
आजपर्यंतचे स्वागताध्यक्ष, उद्घाटक, उद्घाटन व समारोपाचे प्रमुख पाहुणे या सर्वांचा नामोल्लेख ग्रंथसूचीमध्ये करण्यात आला आहे.
मराठी साहित्याचे अभ्यासक, विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी “शब्दसंचित” हा ग्रंथ महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार असून, सतराव्या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
या बैठकीस संस्थापक सचिव सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, प्रा. डॉ. तुकाराम गोंदकर, भगवान राऊत, ज्ञानदेव पांडुळे, प्रा. डॉ. अशोक कानडे, राजेंद्र पवार, बबनराव गिरी, शाहीर भारत गाडेकर, मकरंद घोडके, राजेंद्र चोभे, प्रा. डॉ. अनिल गर्जे, सुभाष सोनवणे, स्वाती ठुबे, जयश्री झरेकर, शर्मिला गोसावी, प्रशांत सूर्यवंशी, हरिभाऊ नजन, बाळासाहेब शेंदुरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.







