Home अमरावती शब्दांमधील क्रांती काव्य संग्रह प्रकाशन सोहळा थाटात

शब्दांमधील क्रांती काव्य संग्रह प्रकाशन सोहळा थाटात

42

▪️इंजिनियर उमेश शहारे, विद्रोही अविनाश गोंडाणे, प्रवीण कांबळे,प्रा.देवानंद पाटील यांची उपस्थिती

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.29एप्रिल):-प्रा. डॉ.हंसराज रंगारी यांच्या चिंतन आणि मननातून साकारलेल्या, शब्दांमधील क्रांती या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा,रविवार दिनांक २६एप्रिल रोजी भीमटेकडी परिसर येथे , बुद्ध उपासक संघ अमरावती द्वारा आयोजित करण्यात आला होता. 

         कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.उमेश शहारे(इंजिनियर) हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मा. सिम्रेला देशमुख, मा.निर्मला बोरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. दीपक डांगे, मा. शिवा प्रधान, मा.विद्रोही अविनाश गोंडाणे,शब्दास्त्र प्रमुख प्रवीण कांबळे,प्रा.देवानंद पाटील, मा.प्रतिभा प्रधान, मा.पद्माकर मांडवधरे या मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.

तद्नंतर प्रा. डॉ.हंसराज रंगारी लिखित शब्दांमधील क्रांती काव्य संग्रहाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेशजी शहारे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख अतिथी सिम्रेला देशमुख या म्हणाल्या की,शब्दांमधील क्रांती हा काव्य संग्रह जरी असला तरी यात मानवतेचे प्रतिबिंब दिसून पडते असे त्या म्हणाल्या तर निर्मला बोरकर या आपले विचार व्यक्त करतांना म्हणाल्या, शब्दांमधील क्रांती या काव्य संग्रहाच्या माध्यमातून प्रा. डॉ.हंसराज रंगारी यांनी बुद्ध,फुले,शाहू आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जणू काही शिदोरीच आपणापुढे ठेवली आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.  

जेष्ठ कवी शिवा प्रधान यांनी , शब्दांमधील क्रांती हे शीर्षक बोलके आहे असे म्हणत कविता संग्रहाचे कौतुक केले तर शब्दास्त्र प्रमुख प्रवीण कांबळे म्हणाले,हा कविता संग्रह निराशावादी माणसामध्ये आशावाद पेरणारा आहे असे विचार ठेवत असतांना ,मी आणि कवी मित्र जरी असलो तरी आम्ही चळवळीत काम करणारे साथीदार आहोत एवढे मात्र निश्चित! असे गौरवोद्गार काढले.

यावेळी अविनाश गोंडाणे,दीपक डांगे,प्रा.देवानंद पाटील,प्रतिभा प्रधान,पद्माकर मांडवधरे यांनी समायोजीत विचार मांडले.कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेशजी शहारे हे अध्यक्षीय अध्यक्ष स्थानावरून बोलतांना म्हणाले ,कवी आणि साहित्यिक यांनी सत्याचा शोध घेत,चळवळीसाठी आपली लेखणी 

झिजविली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने चळवळ गतिमान होईल . या प्रसंगी प्रा.डॉ.हंसराज रंगारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सुशांत मेश्राम यांनी केले तर आभार सिद्धार्थ गोंडाणे यांनी मानले.